|Sunday, December 8, 2019
You are here: Home » उद्योग » डाव‘पेचा’चे राजकारण

डाव‘पेचा’चे राजकारण 

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच दिवसागणिक अधिकच गडद होताना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची कथित महाशिवआघाडी अद्यापही साकार होऊ शकलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची विधाने, काँग्रेसची द्विधा मन:स्थिती यामुळे राज्याच्या राजकारणातील संभ्रम अधिकच वाढतो आहे. आधी महायुतीने, आता महाआघाडीने जनतेला वेठीस धरले असून, हा खेळ असाच सुरू असल्यास प्रमुख पक्षांविषयीचा असंतोष आगामी काळात टोकाला जाऊ शकतो. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील अत्यंत चाणाक्ष नेते मानले जातात. मुख्यमंत्रिपदापासून ते संरक्षणमंत्रिपदापर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषविणाऱया पवार यांचा राजकीय क्षेत्रातील दबदबा टिकून असला, तरी विश्वासार्हतेच्या स्तरावर पवार यांची पाटी कोरी आहे. सिंहासन पटकावण्यासाठी पवार यांनी केलेले ‘खंजिरी प्रयोग’ आजही अनेकांच्या ध्यानात असतील. याच राजनीतीतून सोयीस्कररीत्या मारलेल्या कोलांटउडय़ा, सोनिया गांधींची मनधरणी करून नंतर त्यांच्याच परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित करीत रोवलेली राष्ट्रवादीची मुहूर्तमेढ, त्यानंतर पुन्हा काँग्रेसशी जुळवलेले सूर व 2014 मध्ये पारंपरिक विरोधक भाजपाला न मागताच दिलेला पाठिंबा, असे कल्पनेपलीकडील राजकारण करण्यात त्यांचा हातखंडा आहे. सुरुवातीला आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करणार, असे सांगणाऱया पवारांनी सेना व भाजपाचे वाजल्यानंतर सत्तास्थापनेकरिता कोण हालचाली केल्या. काँग्रेस, सोनिया गांधींसोबत चर्चा केल्या. परंतु, तेच पवार शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनियांशी चर्चा झाली नसल्याचे सांगत ‘सत्तास्थापनेबाबत भाजपा-शिवसेनेलाच विचारा,’ असे म्हणत असतील, तर त्याला काय म्हणायचे? त्याअर्थी पवार यांचे राजकारण समजून घेण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील, हे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे वक्तव्य योग्यच म्हणावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पवार यांच्यातील संबंध तसे बऱयापैकी मधुर राहिले आहेत. मागे साखरेच्या कार्यक्रमातच पवार यांचे बोट धरून आपण राजकारणत आल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट करीत या नात्यातील गोडव्याचे अवघ्या देशाला दर्शन घडविले. आता पुन्हा मोदी यांनी ‘राष्ट्रवादीचे सदस्य कधीही राज्यसभेच्या वेलमध्ये दाखल झालेले नाहीत,’ अशा शब्दात एनसीपीवर स्तुतीसुमने उधळली आहेत. हा निव्वळ योगायोग म्हणायचा की साखरपेरणी, असा प्रश्न कुणालाही पडावा. त्यामुळे गु रुशिष्यामृतयोगाच्या जुळणीतून कुणाची शिकार तर होणार नाही ना, याकडेही लक्ष ठेवावे लागेल. काँग्रेस हा काही साधूसंतांचा पक्ष नाही. आजवर या पक्षानेही सत्तेसाठी अनंत तडजोडी केल्या. अशा पक्षाला शिवसेना अस्पृश्य वाटावी, यासारखा मोठा विनोद नाही. कधीकाळी एमआयएम वा मुस्लीम लीगशी समझोता करणाऱया या पक्षाने मुस्लिम बांधवांना काय वाटेल वा वाटते, याचा विचार करण्याची सातत्याने काळजी वाहिली. तीच काळजी हिंदू बंधूंची भावना काय असेल, याबाबत कधी बाळगल्याचे फार काही स्मरत नाही. त्यामुळेच काँग्रेसवर तुष्टीकरणाचा सातत्याने आरोप होतो. आताही शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याच्या रागातून केरळच्या काँग्रेस लॉबीने महाशिवआघाडीला विरोध केलेला पहायला मिळतो. काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांना शिवसेना चालते. मात्र, काँग्रेसच्या दरबारी राजकारण्यांना ती चालत नाही. यातून या पक्षाचा मागास दृष्टीकोनच ठळक होतो. काँग्रेसच्या या अशा धोरणांचाच भाजपाने नेमका फायदा उचलला असून, आपला जनाधार वाढवत नेला आहे. अलीकडे मुस्लीम समाजातील एक मोठा वर्ग एमआयएम वा तत्सम पक्षांकडे वळत आहे. दलित समाजाचेही धुवीकरण होत आहे. त्यामुळे काँग्रेसची मतपेटी विभागली आहे. हिंदूंना गृहित धरण्याचे धोरण सुरूच ठेवल्यास त्याचेही गंभीर परिणाम होतील. हा घोळ एकदाचा संपविण्याबाबत दोन ते तीन आमदार वगळता अन्य आमदारांनी नेतृत्वाला इशारा दिला आहे. भाजपाने पीडीपी, संयुक्त जनता दलाशी घरोबा केला. तो पटो, न पटो, त्यासाठी किमान निर्णयक्षमता दाखविली. काँग्रेसकडे ती धमकही नाही, हेच सद्यस्थितीतून अधोरेखित होते. मागील सत्रात तडजोडवादी भूमिका घेणाऱया सेनेचा सध्याचा पवित्रा आक्रमक आहे. केंद्रातील सत्तेवर पाणी सोडत या पक्षाने विरोधी बाकांवर बसणे पसंत केले आहे. परंतु, ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवशावर सेनेने हे शिवधनुष्य उचलले, त्यातून अचूकपणे सत्तास्थापनेचा वेध घेतला जाणार का, याबाबत संदिग्धता आहे. उलटपक्षी पवारांच्या भूमिकेमुळे सेनेची कोंडी झाली असून, पक्षाच्या गोटात अस्वस्थता दिसून येते. स्वाभाविकच यातून सेना व भाजपा जवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपा 3 व सेनेला 2 वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव असल्याचे वक्तव्य आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी केले आहेच. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत झालेला गोंधळ हे दोन पक्ष अंती एकत्र येऊन सोडविणार का, यासंदर्भातही औत्सुक्य असेल. राज्याला स्थिर व सक्षम सरकारची आवश्यकता आहे. किंबहुना, कुरघोडय़ा, डावपेचात सारे पक्ष मश्गूल दिसतात. आमचाच मुख्यमंत्री होणार, हे सेना-भाजपा या दोन्ही पक्षांचे तुणतुणे अजून सुरूच आहे. आघाडीवाल्यांच्या डबल ढोलकी व वेळकाढूपणाने वातावरण आणखी बिघडते आहे. चौकडीचे हे राजकारण चीड आणणारे आहे. उद्या या चारही पक्षांबद्दल लोकमनात असंतोष निर्माण झाला, तर सगळय़ांनाच त्याचा कमी-अधिक प्रमाणात फटका बसू शकतो. न जाणो मनसेसारख्या पक्षालाही या सुपीक वातावरणाचा फायदा होईल. राज्यात आज राष्ट्रपती राजवट आहे. किंबहुना, धोरणात्मक निर्णयांकरिता सत्तास्थापनेचा पेच लवकर सुटायला हवा, ही लोकेच्छा. त्यासाठी अर्थातच राजकीय पक्षांना प्रगल्भता दाखवावी लागेल. 

Related posts: