|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एलईडी मासेमारीवर होणार कडक कारवाई

एलईडी मासेमारीवर होणार कडक कारवाई 

मासेमारी करणारा ट्रॉलर आणि सहकार्य करणारा ट्रॉलरही होणार जप्त : 18 नोव्हेंबरला आदेश निघाला

प्रतिनिधी / मालवण:

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेरील भारतीय विशाल आर्थिक क्षेत्रात ट्रॉलिंग, पर्ससीन आणि अथवा जाळी यांचा वापर करणाऱया यांत्रिक तसेच यंत्रचलित मासेमारी नौकांवर जनरेटर अथवा जनरेटरशिवाय चालणारी विनाशकारी मासेमारी पद्धती, ज्यात बुल व पेअरट्रॉलिंगचा समावेश आहे, तसेच पाण्याखाली/बुडित अथवा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते कृत्रिम दिवे/एलईडी लाईट, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतीही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी कृत्रिम साधने/उपकरणे बसवणे अथवा त्याच्या कार्यान्वयास प्रतिबंध करण्यात आला आहे. तरीही अशाप्रकारे मासेमारी होत असल्यास आता अवैध एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणारे गलबत व त्यास सहाय्य करणारे गलबत हे शासनाकडे जप्त (forfeit) करण्याची कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाच्यावतीने प्रधान सचिव अनुपकुमार यांनी दिले आहेत.

शासनाने आता मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिनस्त असणाऱया जिल्हा कार्यालयातील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी व सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांनी या अधिसूचनेमध्ये प्रतिबंध केलेली सामुग्री धारण करणारी मासेमारी नौका त्यांच्या कार्यक्षेत्रातील मासेमारी बंदर/मासळी उतरविण्याचे केंद्र/खाडी क्षेत्रातून समुद्रात जाण्यास सक्त प्रतिबंध करावा. तथापि, राज्याच्या जलधी क्षेत्रात (12 नॉटीकल मैल) अशा प्रकारे एलईडी लाईटद्वारे मासेमारी करताना आढळून आल्यास अनुज्ञापन अधिकाऱयाने या अधिसूचनेच्या तरतुदींचे उल्लंघन करणाऱया नौकेचा मासेमारी परवाना रद्द करण्याबाबत कारवाई करण्यात यावी व देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र निलंबित अथवा रद्द करण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे.

तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करा

अंमलबजावणी अधिकारी यांनी राज्याच्या जलधी क्षेत्रात बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱया नौकांना अवरुद्ध करून सदर अधिसूचनेच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे ठळकपणे नमूद करावे व संबंधित अभिनिर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे तात्काळ प्रतिवृत्त सादर करावे आणि जास्तीत जास्त शास्ती होण्यासाठी संबंधित अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडे सक्षम पाठपुरावा करण्यात यावा. गलबताचे नोंदणी प्रमाणपत्र व मासेमारी परवाना रद्द करण्याबाबत किंवा परत घेण्याबाबत संबंधित अभिनिर्णय अधिकारी यांच्याकडे प्रतिवृत्ताद्वारे सक्षम पाठपुरावा करण्यात यावा. अंमलबजावणी अधिकाऱयांच्या आदेशान्वये अवरुद्ध करण्यात आलेले मासेमारी गलबत हे गलबताच्या मालकाने शासन अधिसूचनांमधील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेतली नसल्याचे अभिनिर्णय अधिकाऱयांसमोर सक्षम व ठोस पुराव्यासह मांडण्यात यावे.

..तर अधिकाऱयांवर कारवाई

अवैध एलईडीच्या सहाय्याने मासेमारी करणारे गलबत व त्यास सहाय्य करणारे गलबत हे शासनाकडे जप्त (forfeit) करण्यासाठी सक्षमपणे मांडणी तहसीलदार यांच्यासमोर करण्यात यावी. तसेच शासन सुचनांची सर्व संबंधित मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱयांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. अंमलबजावणी करण्यात कसूर करणाऱया संबंधित जबाबदार अधिकाऱयांविरुद्ध आयुक्त, मत्स्य व्यवसाय यांनी शिस्तभंग विषयक कारवाई करावी, अशीही समज देण्यात आली आहे.

Related posts: