|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जि.प.अध्यक्षपद ओबीसी महिला राखीव

जि.प.अध्यक्षपद ओबीसी महिला राखीव 

समिधा नाईक, माधुरी बांदेकर, उन्नती धुरी अध्यक्षपदाच्या शर्यतीत

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

लक्ष लागून राहिलेले सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (ओबीसी महिला) साठी आरक्षित झाले आहे. आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे लक्ष लागले असून खासदार नारायण राणे यांचे वर्चस्व असलेल्या सिंधुदुर्ग जि. प. तील सत्ताधारी गटातून समिधा नाईक, माधुरी बांदेकर आणि उन्नती धुरी यांची नावे पुढे आली आहेत.

मंगळवारी सकाळी 11.30 वाजता मंत्रालयामध्ये राज्यातील सर्व जि. प. अध्यक्ष पदांचे आरक्षण सोडत पद्धत्तीने काढण्यात आले. यामध्ये सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला म्हणजेच ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाले आहे. सिंधुदुर्ग जि. प. मध्ये 2007-2008 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण म्हणजे ओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडले होते. तसेच यापूर्वी इतर मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण खुले आरक्षण पडले होते. मात्र ओबीसी महिला आरक्षण पडले नव्हते. अखेर यावेळी ओबीसी महिलांसाठी जि. प. अध्यक्ष पदासाठी आरक्षित झाले आहे. महिनाभरात अध्यक्षपदाची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे

सिंधुदुर्ग जि. प. मध्ये नारायण राणे यांच्या गटाची सत्ता आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले, परंतु आता राणेंसोबत भाजपवासी झालेले 24 सदस्य आणि भाजपचे सहा सदस्य मिळून एकूण 30 जि. प. सदस्य राणेंसोबत आहेत. यामध्ये ओबीसी महिला प्रवर्गातून निवडून आलेल्या उन्नती धुरी (शेर्ले), माधुरी बांदेकर (सुकळवाड) आणि समिधा नाईक (वेतोरे) या तिघांची नावे शर्यतीत आहेत. त्याशिवाय राणेंचा गट भाजपवासी झाल्याने भाजपमधूनही निवडून आलेल्या ओबीसी महिला प्रवर्गातील श्वेता कोरगावकर (बांदा) यांनाही संधी मिळू शकते. तर विद्यमान जि. प. अध्यक्षा संजना सावंत या पूर्वाश्रमीचा संजना ढवण-सावंत या इतर मागास प्रवर्गातील महिला सदस्य असल्याने त्यांनाही पुन्हा अध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते.

दरम्यान काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या 30 पैकी 24 सदस्यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा व्हीप धुडकावल्याने त्यांचे न्यायालयीन प्रक्रियेत सदस्यत्व रद्द झाल्यास शिवसेना व काँग्रेसला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत संधी मिळू शकते. तसे झाल्यास काँग्रेसकडेच राहिलेल्या राजलक्ष्मी डिचवलकर (हरकूळ), तर शिवसेनेकडून वर्षा कुडाळकर (पिंगुळी), अनुप्रिती खोचरे (घावनळे) आणि पल्लवी झिमाळ (लोरे) या सदस्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याची संधी मिळू शकते. जिल्हाधिकाऱयांकडून लवकरच अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts: