|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » तिलारीचे पाणी 22 पर्यंत सुरळीत

तिलारीचे पाणी 22 पर्यंत सुरळीत 

कनिष्ठ अभियंता व्ही. एन. घाडगे यांचे पत्र : अधीक्षक अभियंता आज येणार तिलारीत : आश्वासनानंतर आंदोलन मागे

प्रतिनिधी / दोडामार्ग:

तिलारी प्रकल्पाच्या उजव्या तीर कालव्यातून पाणीपुरवठा होत नसल्याने केळी बागायतींचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱयांनी केला आहे. संतप्त शेतकऱयांनी तिलारी पाटबंधारे विभागावर मंगळवारी धडक मोर्चा नेला. यावेळी कनिष्ठ अभियंता व्ही. एन. घाडगे यांनी सदर कालव्यात 22 नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करू, असे पत्र दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी प्रगतशील शेतकरी भरत दळवी यांच्यासह प्रवीण गवस, विनायक गवस, प्रेमनाथ कदम, स्वप्नील दळवी, कानू दळवी, नरेश काळबेकर, राजन दळवी, गोपाळ गवस आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. तिलारी प्रकल्पाच्या उजव्या तीर कालव्यात मागील अतिवृष्टीत ठिकठिकाणी माती कोसळली. त्याची अद्याप दुरुस्ती न केल्याने घोटगे, घोटगेवाडी, परमे आदी गावांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी केळी बागा करपल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी पाणीपुरवठा करण्यासंदर्भात येथील शेतकऱयांनी निवेदन दिले होते. मात्र, कोणतीही कार्यवाही प्रकल्प प्रशासनाने केली नसल्याने मंगळवारी शेतकऱयांनी मोर्चा नेत धडक दिली. यावेळी कनिष्ठ अभियंता घाडगे यांना आपल्या मागण्या सांगत शेतकऱयांनी धारेवर धरले. अखेर त्यांनी 22 नोव्हेंबरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले.

   अधीक्षक अभियंता नाईक यांच्याशी चर्चा

  उर्वरित मागण्यांसाठी अधीक्षक अभियंता मिलींद नाईक बुधवारी तिलारीत येणार असल्याची माहिती घाटगे यांनी दिली व शेतकऱयांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी या आंदोलनासंदर्भात तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई वाढीव दराने देणे, चराठे येथे असणारे कार्यालय तिलारीतच सुरू करावे, गेली 35 वर्षे कालव्यांची न झालेली डागडुजी करावी, आदी बाबींकडे नाईक यांचे लक्ष वेधणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.

Related posts: