|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » दगडफेक प्रकरणी 765 जण अटकेत

दगडफेक प्रकरणी 765 जण अटकेत 

कलम 370 समाप्तीची पार्श्वभूमी : केंद्र सरकारने संसदेत दिली माहिती, स्थिती नियंत्रणात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरसंबंधी महत्त्वाची माहिती दिली आहे. कलम 370 हद्दपार करण्यात आल्यापासून काश्मीर खोऱयात एकूण 765 जणांना अटक करण्यात आली आहे. काश्मीर खोऱयात दगडफेकीच्या घटना तसेच शांतता भंग करण्याच्या गुन्ह्य़ांमध्ये सामील राहिलेल्या समाजकंटकांना अटक करण्यात आल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले आहे.

5 ऑगस्ट रोजी कलम 370 हद्दपार झाल्यापासून काश्मीर खोऱयातील स्थितीत सुधारणा झाली असून दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. 5 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दगडफेक तसेच कायदा-सुव्यवस्था भंग केल्याप्रकरणी 190 गुन्हे नोंद झाले आहेत. या प्रकरणी एकूण 765 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर 1 जानेवारी ते 4 ऑगस्ट या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये अशाप्रकारचे 361 गुन्हे नोंद झाले होते, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये स्थिती सुरळीत करणे आणि दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी सरकारने विविध प्रकारची पावले उचलली आहेत. खोऱयातील स्थिती सुरळीत करण्यास सरकारला बऱयाचअंशी यशही प्राप्त झाले आहे. काश्मीरमध्ये स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी समाजकंटकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच अनेक जणांना खबरदारीच्या कारणास्तव ताब्यात घेण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री रेड्डी यांनी दिली आहे.

18 फुटिरवाद्यांवर आरोपपत्र

विविध तपास यंत्रणांकडून करण्यात आलेल्या चौकशीतून महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. काश्मीर खोऱयातील अनेक संस्था आणि फुटिरवादी नेते हुर्रियतशी संबंधित असून ते खोऱयातील दगडफेकीच्या घटनांचे कट रचण्याच्या गुन्ह्य़ात सामील राहिले आहेत. एनआयएने अशा एकूण 18 जणांच्या विरोधात चौकशीनंतर आरोपपत्र दाखल केल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी संसदेला सांगितले आहे.

लाखो पर्यटक दाखल

काश्मीर खोऱयात यंदाच्या हंगामात पर्यटकांच्या आगमनाशी संबंधित एका प्रश्नाला रेड्डी यांनी उत्तर दिले आहे. मागील 6 महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीर प्रशासनानुसार राज्यात एकूण 34 लाख 10 हजार 2019 पर्यटक दाखल झाले आहेत. तसेच यातील 12 हजार 934 पर्यटक विदेशी नागरिक होते. याच कालावधीत राज्याला पर्यटनाच्या क्षेत्रातून सुमारे 25.12 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाल्याचे रेड्डी यांनी सांगितले आहे.

विदेशी वाहिन्यांचे प्रसारण…

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील केबल ऑपरेटर्सना इस्लामिक देशांच्या खासगी वाहिन्यांच्या प्रसारणाबद्दल इशारा दिला आहे. या इस्लामिक देशांमध्ये पाकिस्तान, तुर्कस्तान आणि मलेशियासह इराणही सामील आहे. काही केबल ऑपरेटर्स स्वतःच्या नेटवर्कवर बंदी घालण्यात आलेल्या खासगी वाहिन्यांचे प्रसारण करत असल्याचे निदर्शनास आल्याचे सरकारने म्हटले आहे. याप्रकरणी परवाना रद्द करण्यासह उपकरणे जप्त केली जाऊ शकतात. इराण, तुर्कस्तान, मलेशिया आणि पाकिस्तानच्या सर्व वाहिन्यांचे प्रसारण रोखण्यात यावे, असे सरकारने बजावले आहे.

Related posts: