12 वर्षीय मुलीला पोलिसांनी रोखले

शबरीमला
केरळच्या शबरीमला येथे भगवान अयप्पा यांच्या दर्शनासाठी सद्यकाळात हजारोंच्या संख्येत भाविक दाखल होत आहेत. याचदरम्यान पोलिसांनी मंगळवारी 12 वर्षीय मुलीला मंदिरात जाण्याच्या मार्गातच रोखले आहे. मुलीचे वय 10 वर्षे असल्याचे सर्वप्रथम सांगण्यात आले होते, पण ओळखपत्र पडताळल्यावर मुलीचे वय 12 वर्षे असल्याचे स्पष्ट झाले होते. या मुलीसोबत तिचे वडिल आणि नातलगही आले होते. हे सर्वजण तामिळनाडूच्या बेलूर येथून दर्शनासाठी आले होते. दोन महिन्यांपर्यंत चालणारी वार्षिक तीर्थयात्रा ‘मंडल-मकरविलक्कू’चा हा पहिला आठवडा आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयोगटातील महिलांचा प्रवेश तसेच अन्य धर्माशी संबंधित प्रकरणांना उच्च घटनापीठाकडे वर्ग केले आहे. मागील वर्षी 28 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेशाची अनुमती देण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी व्यापक निदशंने केली होती.
पण यंदा सर्वोच्च न्यायालयाने 10 ते 50 या वयोगटातील महिलांच्या मंदिरातील प्रवेशासंबंधी स्वतःच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. केरळ सरकारने मंदिर आंदोलनाचा आखाडा करू इच्छित नसल्याने महिलांना मंदिर प्रवेशासाठी प्रोत्साहन देणार नसल्याची भूमिका घेतली आहे.