वणव्यामुळे सिडनीत धुराचे साम्राज्य

न्यू साउथ वेल्स राज्यातील जंगलांमध्ये आग : शहरातील लोकांना घरातच थांबण्याचा सल्ला
सिडनी
ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्सच्या जंगलांमध्ये महिन्याभरापूर्वी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविणे अद्याप शक्य झालेले नाही. या वणव्यामुळे राज्यातील काही मोठय़ा शहरांमधील प्रदूषण वाढले आहे. सिडनी शहरात मंगळवार सकाळपासूनच धूराचे साम्राज्य पसरले आहे. वेगवान वाऱयांमुळे जंगलांमधील धूर शहरांमध्ये पोहोचत असल्याने वायु गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. लोकांना घरातच थांबण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.
समाजमाध्यमांवर सिडनीत पसरलेल्या धूराची अनेक छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. हा धूर अद्याप काही दिवसांपर्यंत फैलावलेला राहणार आहे. सिडनीमध्ये सुमारे 50 लाख लोकांचे वास्तव्य आहे. अनेक भागांमधील प्रदूषणाची पातळी राष्ट्रीय मापदंडांपेक्षा 8 पट अधिक वाढली आहे. ऑस्ट्रेलियात वाढत्या तापमानामुळे जंगलांमधील लागलेली आग अधिकच भडकण्याचा धोका आहे. न्यू साउथ वेल्ससह क्वीन्सलँडमध्येही वणव्याने मोठे नुकसान झाले आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया राज्यातही आगीबद्दलचा इशारा देण्यात आला आहे.