|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » स्वच्छ हवा मिशन राबवा!

स्वच्छ हवा मिशन राबवा! 

संसद सदस्यांची एकमुखी मागणी : गांधी परिवाराच्या सुरक्षेवरून काँग्रेस, द्रमुकचा हंगामा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभेमध्ये दुसऱया दिवशी मंगळवारी हवा प्रदूषण आणि जलवायू प्रदुषणावर चर्चा झाली. सदस्यांनी एकमुखाने ‘स्वच्छ हवा मिशन’ राबवण्याची वेळ आल्याचा मुद्दा मांडला आणि सरकारने त्यावर गंभीरतेने विचार करावा, अशी मागणी नोंदवली. तृणमूलच्या सदस्या डॉ. काकोली घोष दास्तीदार या तर मास्क घालूनच संसदेत दाखल झाल्या आणि हवा प्रदुषणावर टीका केली. तर गांधी परिवाराची सुरक्षा कमी केल्याच्या कारणावरूनही सदस्यांनी सरकारवर तोफा डागल्या.

याशिवाय संसदेमध्ये जेएनयूमधील फी वाढ, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती यावरही चर्चा करण्यात आली. शिवसेना सदस्य अरविंद सामंत यांनी आरे क्षेत्रामधील 2700 झाडे एकाच रात्री कापून भाजपने काय साधले? असा सवाल करत भाजपविरोधात पहिल्यांदाच आवाज उठवला.

लहान शेतकऱयांचे प्रबेधन करा

खासदार डॉ. घोष म्हणाल्या, आपण सध्या स्वच्छ भारत मिशन राबवत आहोत. त्याच्या जोडीलाच स्वच्छ हवा मिशन राबवू शकतो काय? लोकांना स्वच्छ हवेत श्वास घेण्याचा अधिकार आहे काय?, अशी सरकारला विचारणा केली. केवळ दोषारोप करण्यापेक्षा एकत्र येऊन मार्ग काढावा, अशी मागणी नोंदवली. पिकांचे अवशेष जाळण्याने प्रदूषण होत असेल तर लोकांना त्याबाबत प्रबोधन करा, असे सुचवले.

दिल्लीत 200 दिवस असते प्रदूषण

काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी मात्र हा मुद्दा नाकारला. दिल्ली सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार स्वच्छ आणि शुद्ध हवेबाबत उदासीन असल्याचा आरोप केला. पिकांचे अवशेष तर केवळ वर्षातील 50 दिवस जाळले जातात. दिल्लीत मात्र 200 दिवस प्रदूषण असते, याकडे लक्ष वेधले. ‘एअर ऍक्ट 1981’ अधिक व्यापक आणि प्रभावी पद्धतीने राबवण्याची आवश्यकता आहे. सरकारने गेल्यावर्षी ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम’ची आखणी केली होती. त्यासाठी 300 कोटीची तरतूद केली. पण याचे पुढे झाले काय, अवघ्या 300 कोटीत सर्व देशभरातील हवा स्वच्छ होईल का? सर्वोच्च न्यायालयानेही दोन्ही सरकारांना फटकारले आहे, तरीही अजून त्यांना जाग येत नाही का? अशा फैरी झाडल्या.

संयुक्त समिती स्थापन करा

तिवारी यांनी ऍक्शन प्लॅन अंमलात आणण्यासाठी आणि त्याकरता आर्थिक तरतुदीकरता संसदेची स्थायी समिती बनवावी. दिल्लीतील प्रदुषणाचा मुद्दा प्रतिवर्षी चर्चेत येतो. आता त्यावर गंभीरतेने विचार करून पावले उचलली जावीत. पिकांचे अवशेष जाळल्याने ही समस्या उद्भवत असेल तर त्याकरता केंद्र सरकारने तेथील राज्य सरकारांनी एकत्रित उपाय काढले पाहिजे. आम्ही याचे समर्थन करत नाही. परंतु छोटय़ा शेतकऱयांचा याबाबत नाईलाज असल्याचेही दिसून आले आहे. त्यावर उपाय योजावेत, अशी मागणी केली. मात्र त्यांना गुन्हेगार ठरवू नये. आधीच शेतकऱयांवर विविध घटकांकडून अन्याय होत आहे. त्यात याचीही भर घालू नका.

केवळ दिल्लीचा विचार केला तर 41 टक्के प्रदूषण हे वाहनांचे, 18.6 टक्के औद्योगिक वसाहती, 4 टक्के थर्मल पॉवर, 3.9 टक्के कचऱयापासून होत आहे. प्रदुषणाचा प्रश्न गंभीर आहे, सदस्यांनी एकत्रित येऊन मार्ग काढण्याची गरज मनीष तिवारींनी व्यक्त केली. ओडिशातील भाजपचे खासदार पिनाकी मिश्रा यांनीही चर्चेत भाग घेताना चीनप्रमाणे कठोर पावले उचलून प्रदूषण रोखण्याची गरज मांडली.

गांधी परिवाराच्या सुरक्षेवरून गोंधळ

काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेतल्याच्या कारणावरुनही जोरदार हंगामा झाला. काँग्रेस सदस्यांनी भाजप सरकारचा निषेध करत सभापतींकडे धाव घेतली. वेलमध्ये येत त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. तर डीएमके सदस्यांनी काँग्रेसला साथ दिली. गांधी परिवाराचे योगदान लक्षात घेत त्यांना एसपीजी सुरक्षा पूर्ववत करण्याची मागणी केली.

जेएनयूचा मुद्दाही उपस्थित

बसपचे सदस्य कुंवर दानिश अली यांनी जेएनयूमधील आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या बळाचा मुद्दा उपस्थित केला. नॅशनल कॉन्फरन्सच्या हसनैन मुसदी यांनीही त्यांचे समर्थन केले.

अरविंद सावंतांच्या फैरी

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खासदार अरविंद सावंत यांनी भाजप सरकारवर लोकसभेत विरोधी आसनावरून टीकास्त्र सोडले. देशाच्या आर्थिक राजधानीत एका रात्रीत 2700 झाडांची कत्तल होते आणि आपण प्रदूषण मुक्तीवर चर्चा करतो. वातावरण बदलत आहे आणि सरकारकडे यावर काही दीर्घकालीन नियोजन आहे काय? अशी विचारणा त्यांनी मंत्री प्रकाश जावडेकर यांना केली. प्रदुषणमुक्तीसाठी सरकार वीजेवरील, बॅटरीवरील गाडय़ा आणत आहे. मात्र हा इलेक्ट्रॉनिक कचरा कुठे फेकला जाईल, त्याच्या निर्मुलनासाठी सरकारकडे काही धोरण आहे, त्याचा कधी विचार केला आहे काय? असे विचारत पर्यावरण प्रदूषण आणि भविष्यकालीन धोरणावरुन सरकारपुढे प्रश्न उपस्थित केले.

Related posts: