|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत ओमानकडून पराभूत, विश्वचषक पात्रतेतून बाहेर

भारत ओमानकडून पराभूत, विश्वचषक पात्रतेतून बाहेर 

वृत्तसंस्था/ मस्कत

भारतीय फुटबॉल संघाचे 2022 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र होण्याचे स्वप्न भंगले असून येथे झालेल्या विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यात ओमानकडून 0-1 अशा गोलफरकाने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

33 व्या मिनिटाला मोहसिन अल घसानीने एकमेव विजयी गोल नोंदवला. या मोहिमेत ओमानकडून भारताला दुसऱयांदा पराभूत व्हावे लागले. यापूर्वी भारतात झालेल्या टप्प्यातही ओमानने भारतावर 2-1 असा विजय मिळविला होता. गेल्या सप्टेंबरमध्ये गुवाहाटीत हा सामना झाला होता. या पराभवानंतर भारत 5 सामन्यांतून 3 गुण घेत गट ई मध्ये चौथ्या स्थानावरच राहिले आहे. आशियाई चॅम्पियन्स कतार या गटात 13 गुणांसह अग्रस्थानावर आहे तर ओमान 12 गुण घेत दुसऱया स्थानावर आहे. दुसऱया स्थानावरील संघापेक्षा तब्बल 9 गुणांचे अंतर असल्याने भारताच्या तिसऱया फेरीत खेळण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. भारताचे या फेरीत अजून तीन सामने बाकी आहेत. सर्व सामने जिंकले तरी त्यांना आणखी 9 गुणांची भर घालता येईल. या गटात दुसरे स्थान मिळविणाऱया संघाला देखील तिसऱया फेरीत स्थान मिळण्याची शाश्वती नाही.

मात्र भारताला 2023 आशियाई चषक पात्रतेच्या तिसऱया फेरीत स्थान मिळविण्याची अजूनही संधी आहे. विश्वचषकाबरोबरच 2023 आशियाई चषक स्पर्धेसाठी देखील ही पात्रता फेरी आहे. आठ गटात तिसरे स्थान मिळविणारे संघ आणि चौथे स्थान मिळविणारे सर्वोत्तम चार संघ यांना आशियाई चषकासाठी पात्रता मिळते.

14 नोव्हेंबर रोजी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत राहिला होता. त्या संघातील तीन खेळाडूंना प्रशिक्षक स्टीमॅक यांनी या सामन्यात बदलले होते. मनविर सिंग, फारुख चौधरी, निशू कुमार यांना प्रितम कोटल, मंदार राव देसाई व सहल अब्दुल समद यांच्या जागी संधी दिली हाती. ओमानने पूर्वार्धात बर्चस्व ठेवले होते. पण त्यांना दान संधीचा लाभ घेता आला नाही.64 व्य मिनिटाला अल खलदीची फ्री किक भारतीय गोलरक्षक गुरप्रीतने सूर मारत अचूक थोपविली. भारताने काही वेळा ओमानच्या क्षेत्रात चढाया केल्या. पण त्या फारशा धोकादायक नव्हत्या. त्यामुळे यश मिळविता आले नाही. भारताचे उर्वरित सामने कतार (मायदेशात 26 मार्च), बांगलादेश (विदेशात 4 जून), अफगाणिस्तान (मायदेशात 9 जून) यांच्याविरुद्ध होणार आहेत.

Related posts: