|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन आजपासून

इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन आजपासून 

वृत्तसंस्था/ मुंबई

भारत व अन्य बारा देशांचे मिळून एकूण 250 बॅडमिंटनपटू इंडिया इंटरनॅशनल चॅलेंज स्पर्धेत जेतेपदासाठी संघर्ष करणार आहेत. बुधवारपासून या स्पर्धेला येथे प्रारंभ होत आहे.

या स्पर्धेसाठी एकूण 25,000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस ठेवण्यात आले असून येथील क्रिकेट क्लब ऑफ इंडियावर खेळविली जाणार असून पात्रता फेरीच्या लढती 20 नोव्हेंबरपासून व 21 पासून मुख्य स्पर्धेला सुरुवात होणार आहे. जेतेपदाची लढत 24 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त या वर्षी मलेशिया, थायलंड, इंडोनेशियाचे स्टार खेळाडू तसेच रशिया, अमेरिका, भुतानच्या नवोदित खेळाडू खेळताना दिसणार आहेत.

पुरुष एकेरीत रशियाचा ब्लादिमिर माल्कोव्ह, भारताचा अजय जयराम यांना पहिले व दुसरे मानांकन देण्यात आले आहे. या स्पर्धेत भारत, मलेशिया, थायलंडचे युवा आंतरराष्ट्रीय खेळाडू एकमेकांना आव्हान देताना दिसणार आहेत. महिला एकेरीत थायलंडची जागतिक 38 वी मानांकित बी. पोर्नटिप व भारताची मुग्धा आग्रे या अन्य खेळाडूंना जोरदार टक्कर देण्याची अपेक्षा आहे.

पुरुष दुहेरीत भारताच्या सुमीत रेड्डी व मनू अत्री यांना अग्रमानांकन देण्यात आले असून फिलिप च्यू व रेयान च्यू या अमेरिकन जोडीला दुसरे मानांकन मिळाले आहे. यांच्यातच खरी चुरस लागण्याची अपेक्षा आहे. महिला दुहेरीत एकतेरिना बोलोटोव्हा, ऍलिना दावलेटोव्हा या रशियन जोडीला अग्रस्थान दिले असून भारताच्या मेघना व पूर्वीशा या दुसऱया मानांकित जोडीकडून त्यांना कडवा प्रतिकार मिळण्याची आशा आहे. मिश्र दुहेरीत रशियाच्या रोडिऑन ऍलिमोव्ह व ऍलिना दावलेटोव्हा यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे.

माजी महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोन म्हणाले की, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटनपटू बऱयापैकी ठसा उमटवणारे प्रदर्शन करीत असल्याने या खेळामधील अनेकांचा रस वाढल्याचे दिसून येत आहे. सुटीच्या दिवशी हौस म्हणून एखादा गेम खेळला जायचा. पण आता या खेळाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात असून स्पर्धात्मक स्तरावर ही आवड जाऊन पोहोचली आहे. या स्पर्धेत मिळणारे मानांकन गुण ऑलिम्पिक पात्रतेसाठी विचारात घेतले जाणार आहेत. त्यामुळे स्पर्धा चुरशीची होणार यात कोणतीच शंका नाहे,’ असे त्यांनी सांगितले.

Related posts: