|Thursday, December 12, 2019
You are here: Home » क्रिडा » रशिया, कॅनडा विजयी, क्रोएशिया पराभूत

रशिया, कॅनडा विजयी, क्रोएशिया पराभूत 

वृत्तसंस्था / माद्रीद

नव्या स्वरूपातील सुरू झालेल्या पहिल्या डेव्हिस चषक टेनिस अंतिम स्पर्धेत सोमवारी येथे झालेल्या लढतीत रशियाने माजी विद्यमान विजेत्या क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला. दुसऱया एका लढतीत कॅनडाने इटलीवर 2-1 अशी मात केली.

रशिया आणि क्रोएशिया यांच्यातील झालेल्या लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात रशियाच्या 17 व्या मानांकित कॅचेनोव्हने क्रोएशियाच्या कोरिकचा 6-7 (4-7), 6-4, 6-4 असा पराभव केला. दुसऱया एकेरी सामन्यात रशियाच्या रूबलेव्हने क्रोएशियाच्या गोजोवर 6-3, 6-3 अशी मात करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुहेरीच्या लढतीत रशियाच्या कॅचेनोव्ह आणि रूबलेव्ह यांनी क्रोएशियाच्या डोडिग आणि मेकटीकचा 7-6 (7-3), 6-4 असा पराभव करत क्रोएशियाचे आव्हान संपुष्टात आणले. नव्या स्वरूपात खेळविल्या जात असलेल्या पहिल्या डेव्हिस चषक अंतिम स्पर्धेत एकेरीचे दोन सामने प्रत्येकी 3 सेटस्मधील तसेच एक दुहेरीचा सामना खेळविला जात आहे. या स्पर्धेत अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेतील उपविजेता रशियाचा मेदव्हेदेव शारिरीक दमछाक झाल्याने सहभागी होवू शकला नाही. आता रशियाची ब गटातील दुसरी लढत नादालच्या स्पेन बरोबर होणार आहे. ही लढत जिंकली तर रशियाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविण्याची संधी मिळेल.

दुसऱया एका लढतीत कॅनडाने इटलीचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. पहिल्या एकेरी सामन्यात कॅनडाच्या पोस्पिसीलने इटलीच्या फॉगनेनीचा 7-6 (7-5), 7-5 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हने इटलीच्या बेरेटेनीचा 7-6 (7-5), 6-7 (3-7), 7-6 (7-5) असा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर झालेल्या दुहेरीच्या सामन्यात इटलीच्या बेरेटेनी आणि फॉगनेनी यांनी कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्ह आणि पोस्पिसील यांचा जवळपास तीन तासांच्या कालावधीत 6-2, 3-6, 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेत कॅनडाची पुढील लढत अमेरिके बरोबर होणार आहे. बुधवारी इटली आणि अमेरिका यांच्यात लढत होईल. ड गटात बेल्जियमने कोलंबिया विरूद्ध पहिले दोन्ही एकरी सामने जिंकले. त्यानंतर दुहेरीच्या सामन्यात बेल्जियमच्या फर्रा आणि कॅबेल यांनी कोलंबियाच्या गिले आणि विलिगेन यांच्यावर 6-7 (5-7), 6-4, 7-6 (7-3) अशी मात केली. बेल्जियमने कोलंबियाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. या नव्या स्वरूपाच्या डेव्हिस चषक अंतिम स्पर्धेत एकूण 18 देशांचा सहभाग असून ते सहा गटात विभागण्यात आले आहेत. 

Related posts: