|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » गुलाबी चेंडूबरोबरच सुसज्ज व्यवस्थेचीही गरज

गुलाबी चेंडूबरोबरच सुसज्ज व्यवस्थेचीही गरज 

भारतातील पहिल्यावहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर राहुल द्रविडचे प्रतिपादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गुलाबी चेंडूवरील कसोटी क्रिकेट निश्चितच आकर्षण ठरेल, याबाबत माझ्या मनात संदेह नाही. पण, गुलाबी चेंडूबरोबरच आणखी काही व्यवस्था सुधारण्यावर भर देणे नितांत गरजेचे असून आसनव्यवस्था, मूलभूत सेवासुविधा, पार्किंग आदींचा यात प्राधान्याने समावेश होतो, असे भारताचा माजी कर्णधार व राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख राहुल द्रविड म्हणाला. जर दव या घटकावर नियंत्रण ठेवता आले तर गुलाबी चेंडूवरील कसोटी हे भारतातील वार्षिक मुख्य आकर्षण केंद्र ठरेल, असेही तो म्हणाला. भारत-बांगलादेश यांच्यात शुक्रवार दि. 22 पासून गुलाबी चेंडूवरील कसोटी खेळवली जाणार असून या पार्श्वभूमीवर तो बोलत होता.

‘दव असल्याने चेंडू ज्यावेळी खूपच ओलसर होतो, त्यावेळी गोलंदाजांना गोलंदाजी करणे कठीण जाते. स्विंग होणे तर अशक्यप्राय होते. पण, यामुळे प्रेक्षकांना स्टेडियमपर्यंत खेचणे शक्य होऊ शकेल. सध्या प्रेक्षक कसोटी पाहण्यासाठी स्टेडियमपर्यंत येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर मात करण्यासाठी काही उपाययोजना प्राधान्याने राबवणे आवश्यक आहे’, असेही द्रविडने नमूद केले.

पुण्यातील कसोटीबद्दल तक्रार

ऑक्टोबरमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात पुण्यात कसोटी खेळवली गेली, त्यावेळी क्रिकेट रसिकांनी तेथे मूलभूत सुविधांबद्दलही तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर द्रविडने स्वच्छतागृहे, आसनव्यवस्था, कार पार्किंग यावर आणखी लक्ष देण्याची गरज नोंदवली.

विविध वाहिन्यांवरील टीव्ही कव्हरेज व स्ट्रीमिंग सर्व्हिसेसमुळे बराच फरक पडतो. शिवाय, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारखे कसोटी सामन्यांचे निश्चित वेळापत्रक आपल्याकडे नसते. त्यामुळे, चाहते याची आगाऊ तयारी करु शकत नाहीत, असे द्रविड म्हणाला.

कसोटी कॅलेंडर महत्त्वाचे ठरेल

‘2001 मध्ये ईडन गार्डन्सवरील कसोटी सामन्याला 1 लाख चाहते हजर होते, असे आपण म्हणतो त्यावेळी काही गोष्टी सहजपणे विसरतो. त्यावेळी एचडी टीव्ही नसायचे. त्यामुळे, घरच्या घरी उत्कृष्ट कव्हरेज पहायला मिळत नव्हते. याशिवाय, त्यावेळी आतासारखे मोबाईलवर क्रिकेट पाहता येत नसायचे. त्यामुळे, ऍक्शन पाहायची असेल तर थेट स्टेडियम गाठणे, हाच पर्याय हाताशी असायचा. पण, आता परिस्थिती वेगळी आहे आणि ती आपल्याला स्वीकारायला हवी. ऍशेस सामने नेहमी चाहत्यांनी हाऊसफुल्ल असतात, असे आपण म्हणतो, पण, त्यामागील त्यांचे नियोजनही लक्षात घ्यायला हवे. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे कसोटी कॅलेंडर ठरलेले आहे. त्यामुळे, बॉक्ंिसग डे कसोटी डिसेंबरमध्येच होणार आणि जुलैमध्ये लॉर्ड्स कसोटी होणार, हे तेथे निश्चित असते. याचमुळे तेथील चाहत्यांना या दृष्टीने तिकीटे, प्रवास, राहणे या साऱयाची आगाऊ व्यवस्था करता येते. तशा बाबी आपल्याकडे व्हाव्यात, अशी अपेक्षा असेल तर सर्वप्रथम कसोटी कॅलेंडरची संकल्पना प्रत्यक्षात राबवावी लागेल, असे द्रविड विस्ताराने म्हणाला.

भारत-बांगलादेश यांच्यातील दुसरी व शेवटची कसोटी दिवस-रात्र स्वरुपात गुलाबी चेंडूवर दि. 22 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. त्याचे स्वागत करत आणखी काही आमुलाग्र सुधारणा होणे आवश्यक आहे,  याचा द्रविडने यावेळी आढावा घेतला. 

पारंपरिकऐवजी मनगटी फिरकी गोलंदाजी ओळखणे कठीण जाईल : हरभजन

नवी दिल्ली : ईडन गार्डन्सवर फ्लडलाईटमध्ये गुलाबी चेंडू थोडा जुना झाल्यानंतर मनगटी फिरकी गोलंदाज त्यावर अधिक परिणामकारक मारा करु शकतील, असा होरा आघाडीचा ऑफस्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केला. भारतीय संघ दिवस-रात्र स्वरुपातील पहिली कसोटी खेळणार असून त्या पार्श्वभूमीवर गुलाबी चेंडूवरील लढत कशी रंगेल, याची उत्सुकता आहे.

‘गुलाबी चेंडूला काळय़ा धाग्यांचे सीम असते आणि या सीमचा वापर करुन मनगटी फिरकी गोलंदाज खुबीने मारा करु शकतात’, असे हरभजन वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला. भारताकडे सध्या कुलदीप यादव हा मनगटी फिरकीपटू उपलब्ध आहे. पण, हरभजनने आपण निवडीच्या मुद्यावर काहीही बोलणार नाही, असे स्पष्ट केले.

‘हा संघव्यवस्थापनाच्या अखत्यारीतील भाग आहे आणि मी त्यावर काहीही बोलू इच्छित नाही. मात्र, फिरकी गोलंदाजीकडे चेंडू सोपवण्यापूर्वी भारताच्या मध्यमगती गोलंदाजांचा सामना करणेही बांगलादेशसाठी आव्हानात्मक असेल. दुपारी 3.30 ते 4.30 या कालावधीत सुर्य अस्ताकडे जात असताना सीमर्स अधिक नुकसान पोहोचवू शकतात. पण, भविष्यात आणखी दिवस-रात्र स्वरुपाचे कसोटी सामने खेळवायचे असतील तर फिरकीपटूंचे योगदान महत्त्वाचे ठरेल’, असे हरभजन सिंग पुढे म्हणाला.

2016 दुलीप चषक स्पर्धेत कुलदीप कसा प्रभावी ठरला होता, याचा उल्लेख करताना भज्जी म्हणाला, ‘दुलीप चषक स्पर्धेत कुलदीपची गोलंदाजी कोणालाच व्यवस्थित खेळता आली नव्हती. लेगस्पिनर्सनी त्या आवृत्तीत बरेच यश संपादन केले होते. अर्थात, गुलाबी चेंडूवर सातत्याने यश संपादन करण्यासाठी अभ्यासपूर्ण सरावाची खूप गरज आहे. दुलीप चषक स्पर्धेतील सामने यापुढेही गुलाबी चेंडूवर खेळवता येतील. मात्र, यासाठी भारताच्या स्टार खेळाडूंनी त्या स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे ठरेल. तसे झाले तरच मूळ उद्देश सफल होऊ शकतो’.

Related posts: