|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महापौरपदी राष्ट्रवादीच्या ऍड. सुरमंजिरी लाटकर

महापौरपदी राष्ट्रवादीच्या ऍड. सुरमंजिरी लाटकर 

43 विरुद्ध 32 मतांनी मिळविला विजय

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  कोल्हापूर महानगरपालिकेच्या नूतन महापौरपदी राष्ट्रवादीच्या नगरसेविका ऍड. सुरमंजिरी लाटकर तर उपमहापौरपदी काँग्रेसचे नगरसेवक संजय मोहीते विजयी झाले. त्यांनी विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या महापौरपदाच्या उमेदवार भाग्यश्री शेटके आणि उपमहापौरपदाचे उमेदवार कमलाकर भोपळे यांचा 43 विरुद्ध 32 अशा मतांनी पराभव केला.

  राष्ट्रवादीच्या नगरसेविका माधवी गवंडी आणि काँग्रेसचे नगरसेवक भूपाल शेटे यांनी महापौर व उपमहापौर पदाचा राजीनामा दिल्याने हि दोन्ही पदे रिक्त झाली.  रिक्त पदांसाठी पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात मंगळवार 19 रोजी सकाळी 11 वाजता निवडणुक प्रक्रीया पार पडली. 

  महापौर, उपमहापौर पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून ऍड. सुरमंजिरी लाटकर आणि संजय मोहिते यांनी तर भाजप-ताराराणी आघडीकडून भाग्यश्री शेटके, कमलाकर भोपळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. नेहमीप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयातून सकाळी पावणे अकराच्या सुमारास खाजगी बसने महापालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात दाखल झाले. त्यांनी सप्तरंगी फेटे परिधान करुन राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात प्रवेश केला. यानंतर भाजत-ताराराणी आघाडीचे सदस्य विजयाच्या घोषणा देत सभागृहात दाखल झाले.

   यानंतर निवडणूक प्रक्रीयेस प्रारंभ झाला. प्रथम नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नामनिर्देशन पत्राचे वाचन केले. यानंतर महापौर पदासाठी निवडणुक घेण्यात आले. जिल्हाधिकारी दौलत देसाई महापौर पदासाठी आलेले दोन्ही अर्ज वैध ठरवले. यानंतर माघार घेण्यासाठी 15 मिनिटांची वेळ देण्यात आली. मात्र यावेळेत दोन्ही उमेदवारांनी माघार न घेतल्याने सदस्यांचे हात उंचावून मतदान घेण्यात आले. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार ऍड. सुरमंजिरी लाटकर यांना 43 तर भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री शेटके यांना 32 मते मिळाली.

  उपमहापौर पदाच्या निवडीसाठी सत्ताधारी आघाडीकडून आलेला संजय मोहिते यांचा आणि विरोधी आघाडीकडुन आलेला कमलाकर भोपळे यांचा अर्ज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी वैध ठरवला. यांनंतर दोन्ही उमेदवारांना माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. मात्र माघार न घेतल्याने उपमहापौरपदासाठीही मतदान घेण्यात आले. यामध्येही काँग्रेसचे संजय मोहिते यांना 43 तर ताराराणी आघाडीचे कमलाकर भोपळे यांनी 32 मते मिळाली. निवडणुक्र प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी महापौर पदी ऍड. सुरमंजिरी लाटकर यांना तर उपमहापौर पदी संजय मोहिते यांना विजयी घोषित केले.  

 शिवसेनेचे सदस्य अनुपस्थिती

 महापालिका सभागृहात शिवसेनेचे नियाज खान, राहूल चव्हाण, प्रतिज्ञा उत्तुरे आणि अभिजीत चव्हाण हे चार नगरसेवक आहेत. महापौर निवडी दरम्याना शिवसेनेने नेहमीच तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे. नेहमीप्रमाणे शिवसेनेचे चार सदस्य या महापौर निवडीवेळी अनुपस्थित राहिले.  

  ताराराणीच्या तेजस्विनी इंगवले गैरहजर

  शिवसेनेचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्या पत्नी ताराराणी आघाडीच्या नगरसेविका तेजस्विनी इंगवले महापौर निवडीच्या विशेष सभेस गैरहजर राहिल्या. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना निवडणुकीत 33 ऐवजी 32 मते मिळाली. नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली.  

  संभाजी जाधव, जयश्री जाधव यांच्याकडे लक्ष

  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत जाधव यांचे भाऊ संभाजी जाधव व पत्नी जयश्री जाधव भाजप-ताराराणी आघाडीचे सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीनतंर होणाऱया या महापौर निवडणुकीत काँग्रेसचे आमदार यांचे भाऊ व पत्नी काय भुमिका घेणार याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष होते. त्यामुळे संपूर्ण सभागृहाच्या नजरा त्यांच्याकडे लागून राहिल्या होत्या. मात्र भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांना मतदान करत एकप्रकारे त्यांनी भुमिका स्पष्ट केली.

  49व्या महापौर, 45वे उपमहापौर

 महापौर-उपमहापौर निवडीनंतर नगरसेविका ऍड. सुरमंजिरी लाटकर यांना 49व्या महापौर तर नगरसेवक संजय मोहिते यांना 45वे उपमहापौर बनण्याचा बहुमान मिळाला.

  आमदार ऋतुराज पाटील यांनी केले सारथ्य

  सकाळी पावणे आकराच्या सुमारास महापौर पदाच्या उमेदवार ऍड. सुरमंजिरी लाटकर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार ऋतुराज पाटील चारचाकी वाहनाने अजिक्यतारा येथून महापालिका चौकात आहे. या वाहनाचे सारथ्य आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार चंद्रकांत पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार होते.

 तुळशीचे रोप देवून अभिनंदन

 महापौर-उपमहापौर निवडणुक प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी नूतन महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर आणि उपमहापौर संजय मोहिते यांना तुळशीचे रोपटे भेट देवून अभिनंदन केले. 

  निवडीनंतर लगेचच कार्यालय प्रवेश

 नूतन महापौरपदी ऍड. सुरमंजिरी लाटकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी लगेचच  महापौर कार्यालय प्रवेश केला. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते फित कापून त्यांनी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी आमदार जाधव यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या. 

  समस्त लाटकर परिवाराची उपस्थिती

 महापौर निवडी दरम्यान समस्त लाटकर परिवार महापालिकेत उपस्थित होते. महापौरपदी निवड झाल्यानंतर ऍड.लाटकर यांचे सासरे भरत लाटकर, सासू अंजली लाटकर, वडील सुरेंद्र बसगौडर, आई चंद्राक्का बसगौडर यांनी सभागृहातच पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी समस्त लाटकर परिवार उपस्थित होते.  

Related posts: