|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाई न.प. च्या मैला व्यवस्थापन प्रकल्पाला बांग्लादेशी उच्च पद्स्थांची भेट

वाई न.प. च्या मैला व्यवस्थापन प्रकल्पाला बांग्लादेशी उच्च पद्स्थांची भेट 

प्रतिनिधी/ वाई

वाई शहर स्वच्छ व हागणदारी मुक्त होण्यासाठी वाई नगरपरिषद सदैव कार्यरत आहे. वाईकरांसाठी अभिमानाची बाब अशी की, कालबद्ध रीतीने शौच टाक्या उपसण्याचा प्रकल्प यशस्वीपणे राबविणारे वाई हे देशातील आदर्श शहर आहे. सेप्ट विद्यापीठ आणि टाईड टेक्नोक्रॅट्स यांच्या मदतीने आणि बिल व मिलिंडा गेट्स फौंडेशन यांच्या अनुदानातून वाई नगरपरिषद मैला प्रक्रिया प्रकल्प व कालबद्ध रीतीने शौच टाक्या उपसणे हे काम यशस्वीपणे राबवीत आहे. वाई शहरातील या स्तुत्य उपक्रमाला भेट देण्यासाठी देशी तसेच परदेशी पाहुणे आवर्जुन येत असतात. भारतातील प्रायोगिक तत्वावरील या प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेल्या बांग्लादेश मधील पाहुण्यांचे वाई न.प. मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी स्वागत केले.

आज दिनांक 20/11/2019 रोजी एस. एन. व्ही. नेदरलंडस डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जीनैदा व कुश्तीया या बांग्लादेशमधील दोन शहरांच्या नगरपालिकांच्या वतीने वाई शहरातील मैला व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देण्यात आली. यावेळी या नगरपालिकांचे महापौर मो. सैदुल करीम मिंतू तसेच नगरपालिकेचे सचिव मो. मुस्ताक अहमद, कर निरीक्षक मो. अफताब उद्दीन, मो. अमान उल्लाह, कार्यकारी अभियंता मो. रबिऊल ईस्लाम, शहर समन्वयक मो. अब्दुल हलीम, मो. फैजूर रेहमान, सरकारी सल्लागार मो. शाहीदुल ईस्लाम, आय सी टी प्रमुख साद अहमद व न.प. सदस्य मो. हेलाल उद्दीन उपस्थित होते. या भेटीदरम्यान त्यांनी वाई शहरातील कालबद्ध रीतीने शौच टाक्या उपसण्याचे प्रात्यक्षिक पाहिले. मैला प्रक्रिया प्रकल्पाचे कामकाज कशा रीतीने चालते याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला. या दरम्यान त्यांनी वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्याशी संवाद साधून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले. हा प्रकल्प राबविताना कोणत्या अडचणी आल्या, कोणकोणती आव्हानांना सामोरे जावे लागले, त्यावर काय उपाययोजना करण्यात आल्या अशा त्यांच्या विविध शंकांचे निरसन वाई न.प.च्या मुख्याधिकारी यांनी केले. 

नगरपरिषदेच्या चालू असलेल्या कामांमध्ये कोणकोणत्या अडचणी नागरी व्यवस्थेमध्ये आहेत, सदरच्या प्रकल्पाचे आर्थिक व्यवस्थापन नगरापालिकेद्वारे कसे केले जाते तसेच बांग्लादेश मधील परस्थिती आणि भारतातील परिस्थिती यावर सविस्तर चर्चा केली. येणाया अडचणी सोडविण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्यात याबाबत त्यांनीही काही मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी यांनीदेखील पाहुण्यांशी त्यांच्या देशातील मैला व्यवस्थापनाच्या कामाबद्दल संवाद साधला. बांग्लादेश मधून आलेल्या सर्व उच्च पदस्थांनी वाई शहरामध्ये चालू असलेल्या स्वच्छतेविषयक, घनकचराविषयक आणि मैलापाणी व्यवस्थापन विषयक कामाच्या बाबतीत समाधान व्यक्त करून सर्व आरोग्य विभाग कर्मचारी आणि अधिकारी यांचे अभिनंदन केले. जीनैदा शहराचे महापौर मो. सैदुल करीम मिंतू यांचा वाई शहराची ओळख म्हणून गणपती घाटाचा फोटोप्रेम देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी नगरपरिषदेचे कार्यालय निरीक्षक श्री. नारायण गोसावी, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता क्रांती वाघमळे, कर निरीक्षक अभिजित ढाणे, आरोग्य निरीक्षक श्री. गुणवंत खोपडे तसेच सेप्ट विद्यापीठाचे प्रतिनिधी अर्वा भारमल, भूषण टवलारे, जीनल छेडा उपस्थित होते.

Related posts: