|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शहरात नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी

शहरात नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहर परिसरात सायंकाळी अचानक पोलीस दलाकडून नाकेबंदी करुन वाहनांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामुळे वाहनधारकांची चांगलीच धावपळ उडाली होती. पोवईनाक्यासह राधिका चौक, मोळाचा ओढा परिसरात नाकेबंदी करुन करण्यात आलेल्या वाहनतपासणीत सुमारे 100 वाहनांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी चार ठिकाणी नाकाबंदी करुन वाहतुकीला शिस्त लावत कारवाईचा धडाका केला. यावेळी भारत सरकार लिहिलेली कारही पोलिसांच्या तावडीतून सुटली नाही. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.

शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट असून पोवईनाक्यावरील ग्रेडसेपरेटरच्या कामामुळे वाहतूक बेशिस्त झाली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरुच असतो. तर सध्या शहर व परिसरात वाढलेल्या घरफोडय़ा, चेनस्नेचिंग, मोबाईल चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी सायंकाळी राधिका चौक, बॉम्बे रेस्टॉरंट, पोवई नाका व स्टॅन्ड परिसरात बुधवारी पोलिसांनी चार पथकाद्वारे बेदरकार, फॅन्सी क्रमांक, कागदपत्रे नसणे याप्रकरणी वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. पोलिसांनी अचानक कारवाईला सुरुवात केल्यानंतर दुचाकी, कार चालकांमध्ये खळबळ उडाली.

पोवईनाक्यावर एका (एमएच- 11- बीके- 0198) या क्रमाकांच्या सरकारी कारला ब्लॅक फिल्मींग असल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, हवालदार अंकुश यादव यांनी ती कार बाजूला घेण्यास सांगितले. या कारवर भारत सरकार लिहिलेले होते. पोलिसांना शंका आल्याने त्यांनी चालकाकडे कागदपत्रे मागून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत त्याबाबत चौकशी सुरु होती. या कारवाईत सुमारे 100 च्या वर वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेवरून प्रतापगंजपेठ, राधिका चौक परिसरात सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांच्यासह पोलीस हवालदार हिमंत दबडे- पाटील, मोहन पवार मोहिते, सूर्यवंशी, पोलीस हवालदार कुमठेकर, जाधव, पोलीस नाईक पांढरपट्टे, एक वाहतूक महिला पोलीस यांच्या पथकाने नाकाबंदी केली होती.

यावेळी दुचाकी-चारचाकी 100 वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहन चालवण्याचा परवाना, पीयूसी, गाडीची कागदपत्रे तपासण्याअंती 15 वाहन चालकांकडे चालवण्याचा परवाना नसणे, कागदपत्र नसणे अशा कारणांमुळे त्यांच्यावर 4 हजार 900 रुपये दंडात्मक कारवाई केली. सुमारे दीड तास ही मोहीम सुरू होती. 

शैक्षणिक परिसरात तंबाखू विक्रीस बंदी

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात बुधवारी पोलिस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी बंदी घातली आहे. शैक्षणिक परिसरातील किराणा दुकान, पानटपऱयांची पाहणीसाठी त्यांनी हवालदार हिंमत दबडे-पाटील, मोहन पवार, मोहिते, सूर्यवंशी, हवालदार कुमठेकर, जाधव, पांढरपट्टे, यांच्या पथकाला पाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ आढळले त्यांच्यावर कारवाई करून यापुढे विक्री झाल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

Related posts: