|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लेखकांनी विचार व उगमाच्या तळाशी जाण्याचे धैर्य बाळगावे

लेखकांनी विचार व उगमाच्या तळाशी जाण्याचे धैर्य बाळगावे 

प्रतिनिधी/ फोंडा

साहित्य व कला क्षेत्रातील नवोदितांनी सुरक्षित मर्यादांच्या कक्षेत समाधान न मानता  मुक्त आकाशाकडे झेप घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. कला व साहित्याला मर्यादांचे कुंपण घालता येत नाही. नवनिर्मितीसाठी मूलभूत विचार करण्याचे, उगमाच्या तळाशी जाण्याचे ध्येय व धैर्य बाळगले पाहिजे. समन्वयाचा धागा पकडून परंपरा व नवतेचा समन्वय साधीत पुढे गेले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध साहित्यिका अश्लेषा महाजन यांनी केले.

फोंडा येथील शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेतर्फे आयोजित 17 व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. ढवळी येथील भास्कर सभागृहात रविवारी हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटन गोमंतकीय लेखिका अंजली आमोणकर यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलीत करुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष ममता बदामी, कार्याध्यक्ष डॉ. नूतन देव, संस्थेच्या अध्यक्ष मेघना सावईकर आदी मान्यवर उपस्थित होत्या.

आपल्या अध्यक्षीय भाषणात अश्लेषा महाजन यांनी लेखनामागील प्रेरणा, माणूस व निसर्गामधील गूढ नाते, सांस्कृतिक व वाड्.मयीन इतिहासाचा मागोवा घेतला. स्त्रीयांमधील अंत:प्रेरणांचा वेध घेताना स्त्री ही मुळातच सर्जनशिल व निसर्गाशी एकरुप होणारी आहे, असे त्या म्हणाल्या. स्त्रीची विविध रुपे स्वत: स्त्रीयांनी व पुरुषांनीही समजून घेतली पाहिजे. साहित्यनिर्मिती हा एकांताचा उत्सव व लोकांताची मैफल असते. व्यक्त होणे म्हणजे स्वशोधाचा प्रवास आहे, असेही त्यांनी नमूद केले.

गोव्याविषयी बोलताना येथील निसर्ग हा साहित्य निर्मितीमागील प्रेरणास्थान असल्याचे सांगून गोमंतकीयांनी येथील निसर्गाला कवेत घेतले आहे. येथील भाषेला मुळातच मातीचा गंध आहे. जगाच्या कलाविश्वाला या प्रदेशाने अनेक प्रतिभावंत  दिले. हीच या प्रातांची खरी श्रीमंती आहे. गोव्यात कोकणी व मराठी या भाषामध्ये वाद असला तरी सुसंवादही आढळतो. साहित्य व कला क्षेत्रामुळेच गोवा व महाराष्ट्र सांस्कृतिक प्रवाहाने जोडला गेले आहेत.

कलेत परंपरा आणि नवता यांचा समन्वय साधणे महत्वाचे आहे. एकारले पणाने केलेली गोष्ट किंवा कलाकृती कालांतराने कंटाळवाणी होते. स्फोटक कलाकृती समाजाच्या मानसिक स्वास्थ्याला हानीकारक ठरु शकते. सतत समाजाच्या डोळय़ात अंजन घालण्यापेक्षा अधूनमधून त्याच्यावर मोरपिसही फिरवायला हवे. समाजाला कलामाध्यमातून वेळोवेळी सकारात्मकतेकडे वळविणे हा कलाकाराच्या निर्मितीमागील मुख्य हेतू आहे. कला हे माध्यम आहे. हत्यार नाही. जगण्याचे बोट धरुन कलेतून रसपूर्ण आनंद घ्यायचा असतो, हेच संमेलनाच्या व्यासपीठावरुन उमगते.

अभिव्यक्तीचे लोकशाहीकरण व जागतिकीकरण व उदारीकरणाचा साहित्य व कलाक्षेत्रावरील परिणामांचा वेधही त्यांनी आपल्या भाषणात घेतला. गतिमान आयुष्याने माणसाचे वस्तुकरण करुन टाकले आहे. शिक्षणाच्या लोकशाहीसह अभिव्यक्तिचीही लोकशाही झाली आहे. लोकशाहीत बहुसंख्येला आवाजी अस्तित्व असले तरी त्यात एक सरसकटीपण असते. माहितीच्या विस्फोटात ललित लेखन काहीसे दुर्लक्षित होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. भाषा व साहित्याला कॅज्युएल घेण्याची वृत्ती बदलली पाहिजे असेही त्या शेवटी म्हणाल्या. अंजली आमोणकर यांचेही शुभेच्छापर भाषण झाले. ममता बदामी यांनी आपल्या स्वागतभर भाषणात संमेलनाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. डॉ. नूतन देव यांनी मागील संमेलनाचा मागोवा व मेघना सावईकर यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला.

संस्कृत विदूषी अपर्णा देवदत्त पाटील यांचा मान्यवरांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. संस्कृती भाषेतून लिहिलेल्या मानपत्राचे वाचन मंजिरी पाटील यांनी केले. अक्षरवृंद या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच डॉ. अरुणा भदौरीया यांनी लिहिलेल्या ‘छोटी स्मृतीया’ आणि माधुरी उसगावकर यांच्या ‘गहिरे स्वप्न’ या पुस्तकांचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले.

आपल्या मनोगतामध्ये अपर्णा पाटील यांनी स्त्रीया या मुळातच सर्जनशिल असल्याचे सांगून प्राचिन संस्कृती वाड्.मयामधील काही स्त्रीयांच्या साहित्य निर्मितीचे संदर्भ वेद व उपनिषदामध्ये सापडत असल्याचे सांगितले. स्त्रीयांना भाषेचा मोह असतो व तिला व्यक्त होण्यास आवडते असेही त्या म्हणाल्या.

ग्रंथदिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या शिकेरकर यांनी तर संगीता अभ्यंकर यांनी आभार मानले. दिवसभराच्या या संमेलनात शब्द लाहित्य हे निवडक ललित लेखांचे वाचन, शब्दवेध या सत्रात स्मार्ट साहित्यिक खेळ, शब्द संवाद ही प्रकट मुलाख व शब्द काव्य ही काव्य मैफल अशी विविध सत्रे झाली.

Related posts: