|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » नियोजन विभागाचे कामकाज होणार पेपरलेस

नियोजन विभागाचे कामकाज होणार पेपरलेस 

1 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी
पुणे / प्रतिनिधी :
जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1 एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात फिरवण्याची गरज भासणार नाही. ही सर्व काम आता एका क्लिकवर होणार असल्याने नियोजन विभागाच्या कामकाजात गतिमानता व पारदर्शकता येण्यासोबतच पेपरलेस होण्यास मदत होणार आहे.
नियोजन विभागातील कामकाज पेपरलेस करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी इंटिग्रेटेड प्लानिंग ऑफीस ऑटोमेशन प्रणाली विकसित करण्यात आली आहे.   आय- पास नावाची संगणकीय यंत्रणा राज्यभरात कार्यान्वयीत केली जाणार आहे. नियोजन विभागातील टपालांचे व्यवस्थापन, कामांचे संनियंत्रण, कामाचे भौगोलिक स्थान, कामांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते पुर्ण होईपर्यंतची अद्ययावत स्थिती, निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरांवरील डॅशबोर्ड यांचा समावेश या प्रणालीत असणार आहे. 
लोकप्रतिनिधी आणि कार्यान्वयीन यंत्रणा इंटरनेटव्दारे जोडल्या जाणार आहेत. जनतेसाठी प्रत्येक जिल्हयाचे स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात येणार आहे.त्यामुळे जिल्हयातील कामकाज संगणकीकृत होवून सुलभ, लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे. जिल्हयात ही प्रक्रिया येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रणालीव्दारे जिल्हा नियोजन समितीचे सर्व कामकाज पार पाडले जाणार असून जानेवारी 2020 अखेर विभाग तसेच राज्य पातळीवरून या प्रणालीचे सनियंत्रण होणार आहे.

Related posts: