|Monday, January 27, 2020
You are here: Home » solapur » लातुरात भाजपला धक्का; महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे

लातुरात भाजपला धक्का; महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे 

प्रतिनिधी / लातूर

 अत्यंत चुरशीच्या अशा लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेस पक्षाकडे बहुमत नसताना देखील भाजपच्या दोन नगरसेवकांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे महापौर म्हणून निवडून आले तर उपमहापौरपदी भाजपचे चंद्रकांत बिराजदार हे काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झाले. या निवडणुकीत भाजपचे चंद्रकांत बिराजदार व गिता गौड हे दोन नगरसेवक काँग्रेस पक्षाला मिळाले.

लातूर शहर महानगरपालिकेमध्ये मागील अडीच वर्षांत पहिल्यांदाच भाजपची सत्ता होती. या महापालिकेमध्ये एकूण 70 नगरसेवक आहेत. त्यात भाजपचे 36, काँग्रेसचे 33, इतर 1 असे बलाबल होते. यापैकी भाजपचे शिवकुमार गवळी यांचं निधन झाल्याने व काँग्रेसचे सचिन मस्के अनुपस्थित असल्याने आज सभागृहात सर्व मिळून 68 नगरसेवक उपस्थित होते. यात भाजपचे 35 काँग्रेसचे 32 व इतर 1 असे बलाबल होते.

काँग्रेसकडे खरेतर तीन मते कमी असतानाही काँग्रेसच्या नेतृत्वाने शिस्तबद्धपणे खेळी केली. त्यांनी महापौरपदासाठी विक्रांत गोजमगुंडे यांना उमेदवारी दिली. भारतीय जनता पार्टीने देखील सर्व नगरसेवकांना एकत्र बोलावून महापौर पदासाठी ऍड. शैलेश गोजमगुंडे यांना उमेदवारी दिली. महापौरपदासाठी दोन भावामध्ये झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे 35 मते घेवून विजयी झाले. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ऍड. शैलेश गोजमगुंडे यांना 33 मते मिळाली. विक्रांत गोजमगुंडे हे दोन मताच्या फरकाने विजयी झाले.

उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने खेळी करून भाजपचे असलेले नगरसेवक चंद्रकांत बिराजदार यांना उमेदवारी दिली. तशा आशयाचा व्हीपदेखील काँग्रेस पक्षाच्यावतीने जारी करण्यात आला. याचवेळी भाजपने उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून सौ. भाग्यश्री कौळखेरे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने पाठिंबा दिलेले भाजपचे चंद्रकांत बिराजदार यांना 35 मते मिळाली तर भाजपच्या भाग्यश्री कौळखेरे यांना 32 मते मिळाली.

भाजपच्या नगरसेविका शकुंतला गाडेकर या उपमहापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान सभागृहातून बाहेर गेल्या होत्या. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी महापौर म्हणून काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांना तर उपमहापौर म्हणून चंद्रकांत बिराजदार यांना विजयी घोषीत केले. विक्रांत गोजमगुंडे हे प्रभाग 5 मधून काँग्रेस उमेदवार म्हणून तर चंद्रकांत बिराजदार हे प्रभाग 17 मधून भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले होते.

महापौर पदाच्या निवडीवेळी काँग्रेसचे सचिन मस्के अनुपस्थित होते. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराकडे 32 चा आकडा असताना त्यांनी भाजपच्या गीता गौड व चंद्रकांत बिराजदार या दोघांचा तर राष्ट्रवादीचे म्हणून निवडून आलेले राजा मणियार यांची मते मिळविण्यात ते यशस्वी झाले. काँग्रेसने महापौर पदाच्या निवडणुकीत मोठी खेळी करून महापालिकेत सत्ता पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आहे.

महापौर पदाच्या निवडीवेळी भाजप व काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी आपआपल्या पक्षाने सुचविलेल्या उमेदवारासच मतदान करावे, या संदर्भातील व्हीप जारी केल्याचे वाचन करण्यात आले होते. असे असतानाही भाजपचे चंद्रकांत बिराजदार व गीता गौड यांनी काँग्रेसला मतदान केले. याचा अर्थ त्यांचे नगरसेवकपद धोक्यात येणार; पण व्हीपनुसार कारवाई करण्यासाठी अधिकचा वेळ जाऊ शकतो. लातूरचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी या निवडणुकीत हस्तक्षेप केला होता; पण त्यांना आपल्या पक्षाचे नगरसेवक कायम ठेवता आले नाहीत. भाजपने ऍड. शैलेश गोजमगुंडे यांच्याशिवाय उमेदवार द्यावा, असे भाजपच्या अनेक नगरसेवकांचे मत होते, अशीही चर्चा चालू आहे.

महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या पदाधिकारी निवडीप्रसंगी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे होते तर त्यांना पालिका आयुक्त एम. डी. सिंह, उपायुक्त संभाजी वाघमारे, सतीश शिवणे यांनी साह्य केले. हे सर्व मतदान हात वर करून व त्याची व्हीडीओ शुटींग करून करण्यात आले आहे.

महापौर पदासाठी शैलेश गोजमगुंडे यांनी भाजपचे उमेदवार म्हणून दोन अर्ज, भाजपचेच देवीदास काळे यांचा एक अर्ज व काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांचा एक अशा तीन उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली होती. प्रारंभी अर्जाची छाननी केली. या निवडणूक रिंगणात तीन उमेदवार राहिले. पंधरा मिनीटाचा वेळ उमेदवारी परत घेण्यासाठी देण्यात आला. यावेळी बऱयाच तणावानंतर देवीदास काळे यांनी अगदी शेवटच्या मिनीटात आपली उमेदवारी माघार घेतल्याने या पदासाठी दोन गोजमगुंडे भावंडात ही लढत झाली.

काँग्रेसने व्हीपचे वाचन करत असताना महापौर पदासाठी विक्रांत गोजमगुंडे व उमहापौर पदासाठी चंद्रकांत बिराजदार यांना मतदान करावे, असे आदेश काँग्रेसच्या नगरसेवकांना दिले. याचवेळी सभागृहात अनेकांच्या भुवया उंचावल्या. महापौर, उपमहापौर निवडीच्यावेळी महापालिका परिसरात कार्यकर्ते, हितचिंतक उपस्थित होते. या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठय़ा प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापौरपदी विक्रांत गोजमगुंडे यांच्या निवडीची घोषणा होताच परिसरात कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून ढोल-ताशे वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

Related posts: