|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ओणी शिक्षण संस्थेची लाखाची फसवणूक

ओणी शिक्षण संस्थेची लाखाची फसवणूक 

राजापूर पोलीस स्थानकात तक्रार  

 वार्ताहर/ राजापूर

प्रशालेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देतो, असे सांगून राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संस्थेची जवळपास 1 लाख 35 हजार रूपयांची फसवणूक झाल्याचे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी संस्थाध्यक्ष ऍड. वासुदेव तुळसणकर यांनी राजापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पुणे येथील सक्षम विपणन संस्था, एम. आय. भुर्के (वाटूळ) आणि हेमेश शेनॉय (मुंबई) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळातर्फे नूतन विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज तसेच इंग्लिश स्कूल अशा दोन प्रशाला चालवल्या जातात. या प्रशालेला आवश्यक असलेल्या भौतिक सोयी, मुलभूत गरजा तसेच शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने अद्ययावत करणे, यासाठी निधी मिळवून देण्यासाठी पुणे येथील सक्षम विपणन संस्थेमार्फत प्रयत्न करतो, असे वाटूळ येथील एम. आय. भुर्के यांनी संस्थाचालकांना सांगितले. त्यानुसार ओणी संस्थेने नोंदणी शुल्क म्हणून 1 लाख रूपये सक्षम विपणन संस्थेच्या खात्यात चेकद्वारे जमा केले. त्यानंतर संबंधित संस्थेने प्रशालेच्या गरजा पाहून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून कंपनी अथवा संस्थेकडे सादर करण्याचे ठरले.

दरम्यानच्या काळात सक्षम विपणन संस्थेने ओणी संस्थेला वाकोला, मुंबई येथील हेमेश शेनॉय यांच्याशी एक करारपत्र करण्यास सांगितले व त्यांना मध्यस्थ म्हणून नेमण्यात आले. त्यानंतर हेमेश शेनॉय यांनी संबंधित प्रोजेक्टची कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी म्हणून संस्थेकडून 35 हजार रूपये घेतले. करारपत्रात ठरल्यानुसार, संबंधित प्रस्तावित संस्थेकडून अगर कंपनीकडून कोणत्याही रकमेबाबत मंजुरी पत्र न आणता संस्थेकडून घेतलेल्या रकमेचा अपहार केला असून संस्थेची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार संस्थाध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी केली आहे.

Related posts: