|Friday, December 13, 2019
You are here: Home » Agriculture » भाजपने विधानसभेची ग्रामपंचायत केली : राजू शेट्टी

भाजपने विधानसभेची ग्रामपंचायत केली : राजू शेट्टी 

प्रतिनिधी /  जयसिंगपूर  

राज्यातील शेतकरी संकटात आहे. महिना झाला तरी सरकार स्थापन होवू शकले नाही. शनिवारी मध्यरात्री सरकार स्थापन केले सरकार स्थापन करण्याची हिम्मत होती तर रात्रीचा खेळ करुन विधीमंडळाची ग्रामपंचायत केली असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. अजून किती दिवस जनतेला फसवणार असा सवाल करीत शेतकऱयांना फसवण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा, तुमच्या छाताडावर बसून जाब विचारु असा इशाराही त्यांनी ऊस परीषदेत केला.

  गेल्या 17 वर्षात बरेच कांही शेतकऱयांना मिळवून दिले आहे. चळवळीचे महत्व कमी झाल्याने निसर्गाने धडा शिकवला. महापुराने होत्याचे नव्हते झाले. कर्जमाफी होणार की नाही माहिती नाही. रिकव्हरी कमी येणार आहे. महापूर ही नैसर्गिक आपत्ती नव्हती तर सरकारचा बेजबाबदारपणाच याला जबाबदार आहे. वेधशाळेच्या इशाऱयाकडे फडणवीस यांनी दुर्लक्ष केल्याने शेतीचे नुकसान झाले. शेतकऱयांचा फायदा झाला नाही तरी चालेल पण नुकसान झाले नाही पाहिजे. उसाची चिप्पाडे किती दिवस सांभाळायची असा प्रश्न त्यांनी केला.

  माजी खासदार राजू शेट्टी यांच्या चळवळीमुळेच शेतकऱयांना न्याय मिळाला आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वाभिमानीला धक्का लागणार नाही. राजू शेट्टी यांचा शिलेदार म्हणून काम करायचे आहे. निवडणूक संपली, युती तुटली, शेतकऱयांना एफआरपी रक्कम मिळालीच पाहिजे. यासाठी रस्त्यावरची लढाई करण्यास कोठैही मागे पडणार नाही असा विश्वास आम. देवेंद्र भुयार यांनी यावेळी बोलताना दिला.

यावेळी बोलताना प्रा. जालंदर पाटील म्हणाले की, चळवळीची भक्ती आणि लढवय्यांची शक्ती याचा मिलाप कोल्हापूर जिह्यातून उस उत्पादकांच्या परीषदेतून पहायला महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे. सालवार उत्पादन आणि विक्री याची आकडेवारीही पाटील यांनी विषद केली. निवडणूकीत खर्च करायला पैसा आहे मात्र शेतकऱयाला द्यायला पैसा का नाही असा सवाल उपस्थित करून इथेनॉल प्रकल्पच उस उत्पादकांना तारू शकतो असे सांगितले. साखर निर्यातीची संधी मिळालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. सरकारने धोरणात्मक बदल केले पाहिजेत असेही ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात सतिश काकडे म्हणाले की, शेतीमालाला भाव सरकार देणार नसेल तर आत्ता आक्रमक होण्याची वेळ आली आहे. अन्यथा उस उत्पादकांचे कुत्रे हाल खाणार नाही. नव्या मंत्रीमंडळात कृषा राज्यमंत्री हे खाते राजू शेट्टी यांना  मिळालेच पाहिजे तसेच आम. भुयार यांना महामंडळ मिळावे अशी रणनिती वापरावी असे सुतोवाच्च केले.

वस्त्राsद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी भाजपा सरकारचा समाचार घेत खरंच महाराष्ट्रात जन्मलोय का असा सवाल उपस्थित केला. स्थापन झालेले सरकार केवळ दहा दिवसच टिकेल असे बोलून माजी खासदार शेट्टी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत असे आश्वासनही दिले. शेतकऱयांना न्याय देण्याचे काम गेली 17 वर्षे राजू शेट्टी यांनीच केले आहे. महापुरामुळे पश्चिम महाराष्ट्राचे नुकसान झाले. तर परतीच्या पावसाने मराठवाडा आणि विदर्भाचे वाटोळे झाले. चळवळीशिवाय शेतकऱयांना न्याय मिळू शकत नाही. आत्ताचे मुख्यमंत्री सात दिवसांचे आहेत. राजू शेट्टींनी कमळाबाईवर तणनाशक मारलेच आहे. काळजीचे कारण नाही. शेट्टींचे राजकीय निर्णय चुकले असले तरी शेतकऱयांना वाऱयावर सोडता येणार नाही. प्रथम चळवळ मग राजकारण ही निती अवलंबून शेतकऱयांना न्याय मिळवून देवू असा विश्वास दिला.

दीपप्रज्वलनाने परीषदेची सुरवात झाली. प्रारंभी शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कै. महेश पाटील यांच्या वारसास  16 लाख 94 हजार रू. खर्च करून बांधण्यात आलेल्या घराची चावी प्रदान करण्यात आली.

स्वागत शिरोळ तालुका अध्यक्ष आदिनाथ हेमगिरे यांनी केले. प्रास्ताविकात बोलताना पै. विठ्ठल मोरे यांनी गेल्या 17 वर्षाचा शेतकरी चळवळीचा आढावा घेतला. राजू शेट्टी सांगतील तोच दर मागायचा असा संदेशही त्यांनी दिला. यावेळी आमदार देवेंद्र भोयर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महेश खराडे, रसिकाताई ढगे, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्डय़ाण्णावर, प्रकाश पोफळे, आदींची भाषणे झाली.

   चालू गळीत हंगामासाठी संपूर्ण एफआरपी. एकरकमीसह अधिक 200 रू. प्रतिटन पहिली उचल देण्यात यावी. या प्रमुख मागणीसह 18 व्या उस परीषदेत करण्यात आलेले ठराव असे आहेत.

1- महापुरात बुडालेल्या उसाची विनाकपात प्राधान्याने तोड देण्यात यावी. महापुराने बाधीत पिकांची कर्जमाफी झालेल्या शेतकऱयांच्या खात्यावर रक्कम त्वरीत वर्ग करण्यात यावी.

  1. ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही त्या कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. त्यांच्या मालमत्तेवर टाच आणून शेतकऱयांची थकित देणी देण्यात यावीत. राज्य सहकारी बँकेकडून साखर कारखान्यांना देण्यात येणारी साखरेवरील कर्ज स्वरूपातील उचल 90 टक्के करण्यात यावी.
  2. अवकाळी व अतिवृष्टी पावसाने उध्वस्त झालेल्या पिकाला राज्यपालांनी केलेली हेक्टरी 8 हजार रूपयांची मदत तोकडी असून महापुरातील नुकसानग्रस्त शेतकऱयांचे कर्ज ज्या पध्दतीने माफ करण्यात आले त्याच पध्दतीने अवकाळी ग्रस्त शेतकऱयांची कर्जे माफ करण्यात यावीत.
  3. शेतकऱयांचा सातबारा विनाअट कोरा करावा. ग्रीनहाउस, पॉलीहाउस, शेडनेट तसेच मायक्रो फायनान्समध्ये अडकलेल्या महिलांची थकीत कर्जे त्वरीत माफ करण्यात यावीत.
  4. शेतीपंपाचे होणारे भारनियमन त्वरीत रद्द करून शेतीपंपाला विनाकपात दिवसा बारा तास वीज देण्यात यावी. तसेच प्रलंबीत वीजपंपांचे कनेक्शन ताबडतोब मिळावे. वीजबिल माफ करावे. कृषीपंपांना प्रतियुनिट रू. 1.10 प्रमाणे दर निश्चित करावा.
  5. साखरेचा किमान विक्री दर 35 रू. करावा. साखरेची जीएसटी एक वर्ष माफ करावी. केंद्र सरकारने तातडीने साखर कारखान्यांची थकित निर्यात सबसिडी कारखान्यांकडे वर्ग करावी.
  6. महापुरात नुकसान झालेल्या शेतीपंप, विद्युत पोल, विद्युत वाहिन्यांची तात्काळ दुरूस्ती करावी. ज्यांची घरे पडली आहेत त्यांची घरे त्वरीत विनाअट बांधून देण्यात यावीत.

सभेला उपस्थित सर्वांनीच चळवळ टिकली पाहिजे असा संदेश देणाऱया टोप्या डोक्यावर परिधान केल्या होत्या. खासदार राजू शेट्टींचे भले मोठे पोस्टरवर आप मुझे पहचानते हो बस इतनाही काफी है अशा आशयाच्या मजकुराने उपस्थितांचे लक्ष वेधले.

शेतकऱयांचा खरा वाली राजू शेट्टीच आहे. कारखानदारांचे रडगाणे सुरूच राहणार आहे. संघर्षाशिवाय आपल्या पदरात कांहीच पडणार नाही. चळवळ टिकली तरच शेतकरी टिकणार आहे. उसाच्या सोन्याच्या कांडीचे रक्षण करा. असा संदेश अनेक वक्त्यांनी दिला.

Related posts: