|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा दावा

महाविकास आघाडीचा सत्तास्थापनेचा दावा 

राज्यपालांना 162 आमदारांच्या सहय़ांची यादी सादर

भाजपला रोखण्यासाठी वेगवान हालचाली

मुंबई / प्रतिनिधी

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचे स्पष्ट करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सोमवारी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. आपल्या दाव्याच्या पुष्टार्थ या तीनही पक्षांनी राज्यपालांना 162 आमदारांच्या सहय़ांची यादी सादर केली. तसेच सरकार स्थापन करण्यासाठी तत्काळ निमंत्रण देण्याची विनंती केली. आता या पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या आठवडय़ात शुक्रवारच्या मध्यरात्री भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करत सरकार स्थापन केले. भाजपच्या या खेळीने विरोधी पक्षात संताप आहे. फडणवीस सरकारच्या स्थापनेवरून निर्माण झालेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला असून यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आज (मंगळवारी) निकाल देईल. न्यायालयाने फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला तर सरकारला लगेच अधिवेशन बोलवावे लागेल. यापार्श्वभूमीवर तीनही पक्षांनी आपल्या हालचाली गतिमान केल्या आहेत.

शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यावेळी राज्यपाल राजभवनावर नव्हते. त्यामुळे या तीनही नेत्यांनी राजभवनाचा पत्रव्यवहावर पाहणाऱया अधिकाऱयाकडे आपले पत्र सुपूर्द केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे ते बहुमत सिध्द करू शकत नाहीत. फडणवीस बहुमत सिध्द करण्यास असमर्थ ठरल्यानंतर आम्ही शिवसेना पक्ष सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहोत, असे पत्रात नमूद केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, त्यांनी यापूर्वी विधानसभा सदस्यांचे पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली होती. आताही त्यांना बहुमत सिध्द करावे लागणार आहे. परंतु, आजही पुरेसे संख्याबळ नसल्याने ते बहुमत सिध्द करू शकत नाहीत, असे पत्रात म्हटले आहे.

राज्यपालांसमोर 162 आमदारांची परेड करण्याची तयारी

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडे 162 आमदार आहेत. राज्यपालांनी आम्हाला अनुमती दिल्यास आम्ही 162 आमदारांची परेड घडवून आणू शकतो, अशी माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली. आम्ही तीनही पक्षांनी मिळून किमान समान कार्यक्रम निश्चित केला आहे. शिवसेनेच्या पुढाकाराने आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार आहोत, असेही पाटील म्हणाले.

Related posts: