|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » अजित पवार द्विधा मनस्थितीत?

अजित पवार द्विधा मनस्थितीत? 

उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार अद्याप स्वीकारला नाही

राष्ट्रवादीकडून मनधरणी सुरूच

मुंबई / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार द्विधा मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या पवार यांनी सोमवारी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला नाही. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून अजितदादांची मनधरणी सुरू आहे. अजित पवार भेटायला येणाऱया प्रत्येक नेत्याशी चर्चा करत आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या बंडखोरीविषयी संदिग्धता कायम आहे.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अजित पवार सोमवारी विधानभवनात आले. तेथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यशवंतरावांच्या प्रतिमेला अभिवादन केले. विधानभवनातील अभिवादनाचा कार्यक्रम आटोपून देवेंद्र फडणवीस मंत्रालयात आले. त्यांनी सहाव्या मजल्यावरील दालनात जाऊन पदभार स्वीकारला आणि कामकाजाला सुरुवात केली. मात्र, अजित पवार यांनी विधानभवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारण्याचे टाळले.

अजित पवार सोमवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारतील आणि पत्रकारांशी बोलतील असे सांगितले जात होते. मात्र, अजित पवार मंत्रालयात न जाताच निघून गेले. त्यामुळे अजितदादा वेगळय़ा मनस्थितीत आहेत की काय? अशी शंका उपस्थित होत आहे.

मनधरणी सुरूच

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी विधानभवनात येऊन अजित पवार यांची भेट घेतली. या नेत्यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या दालनात चर्चा केली. ही चर्चा तब्बल चार तास सुरू होती. या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बहुतांश आमदार पक्षात परतल्याने आपणही परत या, अशी गळ घातल्याचे समजते. मात्र, त्याला अजित पवारांनी

प्रतिसाद दिला नसल्याचे कळते. याबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना वळसे-पाटील यांनी अजितदादांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे सांगितले

Related posts: