|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सिंचन घोटाळय़ाची चौकशी बंद!

सिंचन घोटाळय़ाची चौकशी बंद! 

नव्या फडणवीस सरकारचा पहिल्याच दिवशी निर्णय

अजित पवारांशी संबंध नसल्याचा खुलासा

मुंबई / प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात केल्यानंतर अवघ्या काही तासात वादग्रस्त सिंचन घोटाळय़ातील काही प्रकरणांची चौकशी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत ज्या ज्या 9 सिंचन प्रकल्पांची उघड चौकशी सुरू होती ती बंद करण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केले. हे प्रकल्प वाशिम, यवतमाळ, अमरावती जिल्हय़ातील आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी सोमवारी एका पत्राद्वारे अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना यासंदर्भात कळवले. अमरावती विभागातील लघु पाटबंधारे प्रकल्प, उपसा सिंचन योजनांशी संबंधित चौकशीची फाईल बंद करण्यात आल्याचे समोर आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांन दिलासा मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र, अजित पवारांशी संबंधित कोणत्याही प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली नसल्याचा खुलासा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे.

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या सिंचन

प्रकल्पाच्या चौकशीची फाईल बंद करण्याबाबतच्या अंतिम चौकशी अहवालाचे अवलोकन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी केले आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास, सरकारने काही नियम केल्यास किंवा न्यायालयाने आदेश दिल्यास या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. महासंचालकांच्या निर्देशानुसार उघड चौकशीची निविदा प्रकरणे फाईल बंद केल्याबाबत अभिलेखावर नोंद घेऊन या प्रकरणाची कागदपत्रे योग्य रितीने जतन करावीत, असेही पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, या 9 प्रकरणांमध्ये अजित पवार यांचा कुठेही संबंध आढळून आला नाही, असे आम्ही तीन महिन्यांपूर्वीच स्पष्ट केले होते. तथापि, त्यांच्याशी संबंधित अन्य प्रकरणांची चौकशी पुढे सुरूच राहणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी म्हटले आहे.

भाजपकडून 70 हजार कोटीच्या सिंचन घोटाळय़ाचा आरोप

दरम्यान, 2012 मध्ये भाजपने तत्कालीन आघाडी सरकारवर 70 हजार कोटी रूपयांचा सिंचन घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तेव्हा भाजपच्या निशाणावर अजित पवार आणि सुनील तटकरे होते. 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळय़ाच्या मुद्यावर वातावरण तापवत भाजपने निवडणूक जिंकली होती. आता सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने अजित पवारांना जवळ केल्याने त्यांच्या विरोधात सुरू असलेली चौकशी गुंडाळली जाईल, अशी चर्चा आहे.

Related posts: