|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » अजितदादांचे बंड फसण्याची चिन्हे

अजितदादांचे बंड फसण्याची चिन्हे 

बेपत्ता आमदार स्वगृही परतले :

दौलत दरोडा, अनिल पाटील, झिरवळ यांची दिल्लीतून सुटका

शरद पवारांचे प्रयत्न यशस्वी

मुंबई / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जाणारे चार आमदार सोमवारी स्वगृही परतले. 23 नोव्हेंबरपासून बेपत्ता झालेल्या आमदारांपैकी चार जण आज हॉटेल ग्रॅण्ड हयातवर दाखल झाले. त्यामुळे अजित पवार एकाकी पडले असून त्यांचे बंड फसण्याची चिन्हे आहेत. तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या आमदारांनी आपण पक्षासोबत असल्याची ग्वाही दिली आहे.

गेल्या आठवडय़ात शुक्रवारी राज्यात मोठे सत्तानाटय़ घडले. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली. त्यांनी पक्षाच्या 54 आमदारांच्या सहीचे पत्र राज्यपालांना देऊन राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला असल्याचे दाखवले आणि राज्यात एका रात्रीत सरकार बनले.

अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी राजभवनावर आपल्या 10 ते 15 समर्थक आमदारांना नेले होते. तेथे शपथविधी झाल्यानंतर 9 आमदारांना दिल्लीत हलविण्याची योजना होती. मात्र, यापैकी धनंजय मुंडेसह राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर, सुनील शेळके, सुनील भुसारा आदी आमदार काही तासातच राष्ट्रवादीत परतले. तर संजय बनसोडे यांना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. मात्र, अनिल पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी झिरवळ या आमदारांना दिल्लीला नेण्यात आले होते.

आमदार बेपत्ता झाल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीकडून बेपत्ता आमदारांचा शोध सुरू होता. भाजपने आपल्या आमदारांना नवी दिल्लीतील गुडगाव येथील ओबेरॉय हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या नवी दिल्लीतील कार्यकर्त्यांना कामाला लावले. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची सुटका करून मोहीम फत्ते केली. अनिल पाटील, दौलत दरोडा आणि नरहरी झिरवळ हे सोमवारी सकाळी मुंबईत आले आणि त्यांनी माध्यमांना सुटकेचा थरार सांगितला.

राजभवनावर शपथविधी झाल्यानंतर आम्हाला दिल्लीला नेण्यात आले. इतरही आमदार दिल्लीत पोहचतील, असे सांगण्यात आले. आम्हाला गुडगावमधील ओबेरॉय हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. नवी दिल्लीतील हॉटेलमध्ये आमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांसह भाजपचे कार्यकर्ते तैनात हेते. आम्ही शरद पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कानावर ही बाब टाकली. त्यांनी आम्हाला घाबरू नका, तुमची लवकरच सुटका होईल, असे पवारांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या नवी दिल्लीतील कार्यकर्ते हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही हॉटेलमधून बाहेर पडलो, अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार वगळता सर्व आमदार पक्षात परतल्याचे सांगितले. बेपत्ता असलेले कळवणचे आमदार नितीन पवार परतले आहेत. गडचिरोली जिल्हय़ातील आमदार धर्मरावबाबा अत्राम आजारी आहेत तर पिंपरीतील अण्णा बनसोडे हे पुण्यात असून या दोघांशी संपर्क झाल्याचे पाटील म्हणाले.

अजित पवारांची पाठराखण करणारे आमदार स्वगृही परतल्याने राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह आहे. संशयित आमदारांनी अजितदादांची साथ सोडल्याने ते पक्षात एकटे पडल्याचे चित्र आहे.

Related posts: