|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Agriculture » गळीत हंगामापूर्वीच तुरे आल्याने ऊस उत्पादन घटणार 

गळीत हंगामापूर्वीच तुरे आल्याने ऊस उत्पादन घटणार  

अभिजीत जाधव / इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील महापूर, अवकाळी पावसानंतर रब्बी पेरणीला वेग आला असताना ऊस दराचे घोंगडे भिजत पडले आहे. महापूराने ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे अतिपावसाने ऊसाची वाढ खुंटली आहे. आडसाल, खोडवा व सुरुच्या लागणीला देखील तुरे आले आहेत. यंदा साखर कारखाने एक महिना उशिरा सुरु झाले आहेत. गळीत हंगाम सुरु होण्यापुर्वीच ऊसाला तुरे आल्याने ऊस उत्पादनात मोठी घट होणार आहे. शेतकऱयांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्याच बरोबर साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम यशस्वी करताना नाकात दम येणार आहे.

 गतवर्षी मे व जून महिन्यापुर्वी दुष्काळजन्य परिस्थिती होती. जुलै महिन्यानंतर सलग चार म†िहने पावसाने झोडपले. कृष्णा-वारणा नदीकाठावरील ऊस कित्येक दिवस पाण्यात होता. तर अनेक गावातील ओढया-नाल्यांना पूर आल्याने तेथील देखील ऊस शेतीत पाणी साचून राहिले. त्याच बरोबरच येथील भात शेती, सोयाबिन, भुईमुग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता शेतकऱयांनी ही पिके काढून रब्बी पेरणी-टोकणीसाठी कंबर कसली आहे. महापूराने अगोदरच पेरणीला विलंब झाला आहे. शेतकऱयांच्या हाताला खरीप लागला नाही. रब्बीची पिके मागास होणार असल्याने पुढील सर्वच हंगामांचे चक्र बिघडत जाणार असल्याची भिती व्यक्त होत आहे. 

महापुरात ऊस शेतीचे ही मोठे नुकसान झाले. प्रामुख्याने नदीकाठावरील ऊस कुजून गेला आहे. तर महापूर व अवकाळीतून काही प्रमाणात वाचलेला ऊस शेतकऱयांनी पशुधनाच्या वैरणीसाठी वापरला आहे. अनेक कारखान्याकडे यावर्षीच्या हंगामासाठी ऊसाची चांगली नोंद झाली होती. त्यामुळे गळीत हंगामास कसलीही अडचण येणार नव्हती. पण अचानकच्या अस्मानी संकटाने ऊस क्षेत्रावर पाणी फिरले. ऊस पिक हातचे जातानाच सोयाबीन, भुईमुग, भाजी-पाला याचेही मोठे नुकसान झाले. अलिकडील काही वर्षात तालुक्यातील वाळवा गावासह परिसरात द्राक्षबागा वाढत आहेत. या बागांनाही निसर्गाने मोठा फटका दिला आहे.

  वाळवा तालुक्यात शेतकरी अन्य पिकांकडे वळला असला तरी येथील मुख्य व हुकमी पिक म्हणून ऊसाकडे पाहिले जाते. हे पिक विनानाशवंत व निसर्गाशी दोन हात करणारे आहे. पण यावेळी या पिकानेही निसर्गापुढे गुडघे टेकले. कृष्णा व वारणा नदीकाठावरील हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊसाच्या तोटीपर्यंत पाणी आल्याने पूर्ण नुकसान झाले. त्यामुळे यंदा ऊस गाळपाचे प्रमाण घटणार आहे. पुरापासून दूर असणाऱया ऊसाची अतिपावसाने वाढ खुंटली आहे. पूर्ण वाढ होण्यापुर्वीच तुरे आले आहेत. ऊसाच्या पांढऱयामुळया कमी झाल्याने हे दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे उतारा व उत्पादन घटणार आहे.

अनेक साखर कारखान्यांनी बॉयलर अग्निप्रदीपन करुन ठेवले आहे. काही मोजक्या कारखान्यांनी मोळी टाकली आहे. सर्व कारखान्यांची ऊस तोड यंत्रणा सज्ज झाली आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराचे हत्यार उपसून जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेत ऊसाला एफआरपी अधिक 200 रुपये दराचा नारा दिला आहे. निसर्गाचा कोप आणि शेतकरी संघटनांचा दरासाठी प्रकोप या दोन्हीला साखर कारखानदारांना तोंड द्यावे लागणार आहे.

गतवर्षीच्या एफआरपीसाठी बहुतांशी कारखान्यांनी बँकांकडून कर्जे उचलली आहेत. अशातच या गळीत हंगामाला सामोरे जाताना संकटांची मालीका सुरु आहे. ही मालीका तोडून गळीत हंगाम यशस्वी करावे लागणार आहेत. शिवाय उत्पादन घटल्याने ऊस पळवा-पळवीला वेग येणार आहे. राज्यात सरकार अस्तित्वात नाही. पाठीमागील पिकांची भरपाई मिळालेली नाही. शेतकरी उत्पादन खर्च वाढीने कर्जबाजारी झाला आहे. अशावेळी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना प्रतिनिधी यांनी तातडीने दराचा तोडगा काढून शेतकऱयांना दिलासा देण्याची गरज आहे.

चाऱयाचा तुटवडा

महापूर व अवकाळीने शेतकऱयांचे पूर्ण कंबरडे मोडले आहे. शेतातील पिक गेले. राहत्या घरांचे नुकसान झाले. पशुधन वाहून जातानाच महापूर काळात आजारपणाने संपून गेले. उरल्या-सुरल्या पशुधनाला जगवताना शेतकऱयांसमोर आव्हान आहे. महापूरग्रस्त भागातील ऊस गेला. उरलेल्या ऊसाला तुरे आल्याने ऊसाचे वाडे शिल्लक न राहिल्याने ओला चारा दुर्मिळ झाला आहे. तर पशुखाद्य महागले आहे. त्यामुळे स्वतःच्या हाता-तोंडाची गाठ घालता-घालता पशुधन वाचवावे लागणार आहे. वातावरणामुळे दुग्धोत्पादनात घट होतानाच जनावरे आजारी पडत असल्याने शेतकऱयांच्या त्या उत्पादन खर्चातही वाढ झाली आहे. अशावेळी लोकप्रतिनिधी सत्तेत मश्गुल असल्याने शेतकऱयांतून नाराजी व्यक्त होत आहे.

Related posts: