|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नु शी नलीनी जहाज प्रकरणी मुरगावच्या नगरसेवकाची चौकशी करण्याची मागणी

नु शी नलीनी जहाज प्रकरणी मुरगावच्या नगरसेवकाची चौकशी करण्याची मागणी 

प्रतिनिधी/ वास्को

गोव्यातील सागरी संपत्तीला धोका ठरलेल्या नु शी नलीनी या नाफ्तावाहू जहाज प्रकरणात मुरगावचे नगरसेवक निलेश नावेलकर यांच्यावर संशय व्यक्त करून त्यांची चौकशी करावी अशी मागणी नावेलकर यांच्या प्रभागातील नागरिक व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

सोमवारी सकाळी बोगदा येथील मुरगाव पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सहाच्या नगरसेवक निलेश नावेलकर यांच्या प्रभागातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने जमून नावेलकर यांची चौकशी व्हावी या मागणीसाठी मोर्चा काढून मुरगावचे उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई यांना निवेदन सादर केले. त्यांनी हार्बरच्या सागरी पोलीस निरीक्षकांनाही या प्रकरणी निवेदन दिले आहे. नु शी नलीनी हे नाफ्तावाहू जहाज मुरगाव बंदरात आणण्यास आपल्या प्रभागाचे नगरसेवक निलेश नावेलकर हेच जबाबदार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. निलेश नावेलकर हे बार्बाडोस मरीन कंपनीचे शिपिंग एजेंन्ट असून इतर बंदरानी परत पाठवलेले हे जहाज मुरगाव बंदरात आणण्यास नावेलकर यांनीच प्रमुख भुमिक बजावल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्यामुळेच पर्यावरणाला धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे त्यांची व त्यांच्या एजेन्सीचे सखोल चौकशी करावी व आवश्यक कायदेशीर कारवाई त्यांच्याविरूध्द करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मुरगावचे नगरसेवक निलेश नावेलकर हे मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्री मिलिंद नाईक यांच्यापासून फुटून त्यांच्या विरोधात गेले होते. मुरगाव पालिका मंडळातही ते मंत्री मिलिंद नाईक यांच्या गटाच्या विरोधात आहेत. त्यामुळे यासंबंधी खुलासा करताना मुरगावचे नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी नगरसेवक नावेलकर हे आपले समर्थक असून त्यांना त्रास देण्यासाठी तसेच आपल्यापासून त्यांना दूर करण्यासाठी हे राजकीय दबावतंत्र वापरण्यात येत असण्याची शक्यता व्यक्त केली.

Related posts: