|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Agriculture » म्हशींवर ‘आयव्हीएफ’चा प्रयोग

म्हशींवर ‘आयव्हीएफ’चा प्रयोग 

पुण्याजवळ वडगांव रसाईमध्ये प्रयोग, देशातील पहिला उपक्रम, ऑगस्टमध्ये जन्माला येणारी वासरे

म्हशींवर आयव्हीएफ तंत्रज्ञानाने उपचार करून नऊ गर्भधारणा करवून आणण्यात जेके ट्रस्ट या संस्थेला यश आले आहे. पुण्यानजीकच्या शिरूर तालुक्यातील वडगांव रसाईतील एका शेतामध्ये ऑगस्ट 2020 मध्ये भारतातील ही पहिली आयव्हीएफ वासरे जन्माला येणार आहेत. या उपक्रमामुळे आनुवंशिकदृष्टय़ा उच्च गुणवत्तेच्या देशी म्हशींच्या उत्पादनात क्रांती घडून येईल आणि दुधाच्या उत्पादनात कित्येक पटींनी वाढ होणार आहे. 

 शेतकऱयांच्या घरी जाऊन ही उच्च तंत्रज्ञानयुक्त सेवा पुरविण्याचा उपक्रम भारतात पहिल्यांदाच करण्यात आला आहे. तसेच यापूर्वी गाईंवर आयव्हीएफचा प्रयोग करण्यात आला होता. त्याला यशही मिळाले. मात्र, यावेळी देशात पहिल्यांदाच म्हशींवर हा प्रयोग करण्यात आला आहे.

रेमंड लिमिटेडच्या जेके ट्रस्टअंतर्गत असलेल्या जेके बोवाजेनिक्स या सामाजिक संस्थेने हा उपक्रम राबविला आहे. कंपनीचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. श्याम झंवर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. विनोद पाटील, डॉ. अमोल सहारे, डॉ. कैलास कदम आणि रमाकांत साहू यांच्या पथकाचा यात समावेश आहे. गाईंवर देखील अशा प्रकारचा प्रयोग डॉ. झंवर यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आलेला असून, त्याला यश मिळाले आहे. याविषयी बोलताना डॉ. झंवर म्हणाले, या वर्षाच्या सुरुवातीला ‘गौरी’ या गिर गाईपासून फक्त सहा महिन्यात 56 आयव्हीएफ गर्भधारणा घडवून आणल्या आहेत. त्यानंतर आता आयव्हीएफ आणि ईटी (एम्ब्रायो ट्रान्सफर) तंत्रज्ञान वापरत म्हशींवर हा प्रयोग करण्यात आला आहे. आनुवंशिकदृष्टय़ा उच्च गुणवत्तेच्या देशी म्हशी आणि दुधाच्या उत्पादनात वाढ ही दोन्ही उद्दिष्टय़े यामुळे साध्य होणार आहेत. पुण्याच्या जवळ वडगांव रसाई येथील सोनावणे बंधूंच्या मालकीच्या गोठय़ामध्ये हा प्रयोग केला गेला. त्यांच्याकडे जवळपास 1500 जनावरे असून, त्यातील 50 म्हशींमध्ये आयव्हीएफ करण्यात आले आहे. आता ही वासरे ऑगस्ट 2020 मध्ये जन्माला येतील, अशी अपेक्षा आहे.

 ट्रस्टने 2016 साली पशूंसाठी उच्च तंत्रज्ञानयुक्त ईटी-आयव्हीएफ प्रयोगशाळा आणि चार मोबाईल कॅटल ईटी-आयव्हीएफ प्रयोगशाळा स्थापन केली. त्यानंतर 2017 साली आयव्हीएफ भ्रूणापासून भारतातील गाईद्वारे पहिले नर वासरू ‘कृष्णा’ जन्माला आले. आजवर 132 आयव्हीएफ वासरे जन्माला आली आहेत.

प्रतिनिधी,  पुणे

Related posts: