|Friday, December 13, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » फार्मसीत उच्च शिक्षणासाठी जीपॅट महत्त्वाची

फार्मसीत उच्च शिक्षणासाठी जीपॅट महत्त्वाची 

आरोग्य क्षेत्रात करिअर बनवणाऱयांना अनेकविध संधी चालून येतात. त्यातलीच एक वाट आहे ती फार्मसीची. फार्मसीत पदवी, डिप्लोमा केल्यानंतर उद्योग, हॉस्पिटल, रिटेल आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. पण त्याही पुढे जाऊन एमफार्म पदवीनंतर अनेकविध उत्तम वेतनाच्या संधी खुल्या होतात. संशोधन व विकास क्षेत्रात भरीव कामगिरी करता येते. फार्मसीसह संबंधीत विषयात उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवायचा असेल तर जीपॅट -2020 परीक्षा देणे अनिवार्य असते. पाहुया या परीक्षेविषयी…

 

वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस, बीडीएस या पदव्या महत्त्वपूर्ण असल्या तरी फार्मसी क्षेत्रातही योग्य शिक्षण घेत भविष्य उज्ज्वल घडवता येते. या क्षेत्रात आपल्याला आरोग्य शास्त्र व रसायन शास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. औषधांची निर्मिती, विकास, वितरण व संशोधन अशा विविध उपक्षेत्रांमध्ये नोकरीची संधी शिक्षणानंतर उपलब्ध होते. आरोग्याशी निगडीत क्षेत्रात फार्मसिस्टची भूमिका महत्त्वाची असते. ही व्यक्ति रूग्णांना योग्य तो सल्ला, सूचना देऊन मदत करत असते. रूग्णाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी फार्मसिस्टकडे आपल्या क्षेत्राचे सखोल ज्ञान असावे लागते, कौशल्य तर हवेच हवे. फार्मसीतील पदवीनंतर आपल्याला औषधांचा वापर कसा करायचा हे चांगल्या पद्धतीने समजते. पण या क्षेत्रात आणखी प्रगती साधायची असल्यास मात्र उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय योग्य मानला जातो. संशाधन व विकास या क्षेत्रात अधिक रस घेता येतो. हॉस्पिटल फार्मसिस्ट, रिटेल फार्मसिस्ट, इंडस्ट्रियल फार्मसिस्ट आणि रिसर्च फार्मसिस्ट म्हणून करिअर घडवता येते.

 फार्मसिस्ट म्हणून करिअर करायचे असेल तर आपल्याला फार्मसीत पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक असेल. आपल्याला दोन वर्षाचा (डीफार्म) किंवा चार वर्षाचा बॅचलर ऑफ फार्मसी (बीफार्म) पदवी अभ्यासक्रम करता येतो. यानंतर 6 महिन्याची इंटर्नशिप घेण्याची गरज असते. पदवी अथवा डिप्लोमा मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेला असावा. बीफार्मनंतर मास्टर ऑफ फार्मसी (एमफार्म) अभ्यासक्रम करता येतो. यानंतर संशोधन व विकास, ऍनालिसीस व टेस्टिंग, प्रोडक्शन, मार्केटिंग आणि हॉस्पिटलसारख्या क्षेत्रात करिअर बनवता येते. अभ्यासादरम्यान जीवशास्त्र (बायोलॉजी), रसायनशास्त्र (केमिस्ट्री) आणि अभियांत्रिकी (इंजिनियरिंग) या विषयांचे सखोल ज्ञान घेतल्यास याचा फायदा हेल्थकेअर, एफएमसीजी, एज्युकेशन, ऍग्रीकल्चर, केमिकल, कॉस्मेटीक्स या क्षेत्रात नोकरीसह आणि सरकारी नोकरी मिळण्यातही होतो.

 या मास्टर्स अभ्यासक्रमासह इतर संबंधीत क्षेत्रातील विषयात अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर मात्र जीपॅट परीक्षा द्यावी लागते. देशभरात जीपॅट अर्थात ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टीटय़ूड टेस्टचे आयोजन केले जाते. ही परीक्षा पुढील वर्षी 28 जानेवारी 2020 रोजी दु. 2.30 ते 5.30 या वेळेत आयोजीत करण्यात आली आहे. परीक्षेनंतर उमेदवारांना देशभरातील प्रतिष्ठीत संस्थांमध्ये एमफार्म व ंइतर संबंधीत अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकणार आहे. यासाठीच्या अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही परीक्षा आयोजीत करणार आहे. देशभरातील 800 संस्था जीपॅटचा स्कोर ग्राहय़ मानतात.

पात्रता

अर्ज करणाऱया उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था, विद्यापीठाची फार्मसीतील चार वर्षे कालावधीची पदवी असावी किंवा समकक्ष शिक्षण घेतलेले असावे. बीफार्मच्या शेवटच्या वर्षात असणारे उमेदवारही जीपॅट परीक्षा देऊ शकतात. परीक्षेचे स्वरूप कॉम्प्युटर बेसड् अर्थात ऑनलाइन असणार आहे. बीटेक (फार्मास्युटिकल अँड फाइन केमिकल टेक्नॉलॉजी किंवा समकक्ष शिक्षण) केलेले उमेदवार या परीक्षेस पात्र नसतील.

परीक्षेचे स्वरूप

जीपॅट ही परीक्षा तीन तासांची कॉम्प्युटरवर आधारीत असणार आहे. यात 125 बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत. प्रत्येक बरोबर उत्तराला चार गुण मिळणार आहेत आणि चुकीच्या उत्तरामागे एक अंक कापला जाणार आहे. परीक्षा इंग्रजी माध्यमातून होणार आहे.

परीक्षेकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 नोव्हेंबर 2019

अर्जाचे शुल्क- 1600 रुपये (इतरांना सवलत)

शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख- 1 डिसेंबर 2019

प्रवेश परीक्षेची तारीख- 28 जानेवारी 2020

परीक्षेची वेळ- 2.30 ते 5.30

परीक्षेच्या निकालाची तारीख- 7 फेब्रुवारी 2020

अधिक माहितीसाठी वेबसाइट-
https://gpat.nta.nic.in

 

Related posts: