|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री

उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री 

राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक

मुंबई / प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी घ्या आणि त्याचे लाईव्ह टेलिकास्ट करा असा निर्णय दिल्यानंतर बहुमत नसल्याने भाजपचे पितळ उघडे पडले. त्यामुळे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला. हा महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचा विजय असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.

भाजपला साम, दाम, दंड, भेद याचा वापर करुन तसेच नियम कायद्याचा भंग करुन कोणत्याही परिस्थितीत सत्ता कायम ठेवण्याचा फाजील आत्मविश्वास होता. मात्र, कालच शरद पवारांनी सांगितले होते की हा कर्नाटक नाही; हा गोवा नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या मनसुबे फसले असून महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची तसेच समर्थन दिलेल्या अपक्ष आमदारांची आता नेता निवडीसाठी बैठक होणार आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांनाच नेता निवडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. त्यामुळे आता जनतेच्या मनातील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत जात, धर्म समानता मानणारे रयतेचे आदर्श राज्य लवकरच राज्यात येईल. काही भाजपची नेते मंडळी हे तीन पक्षांचे तीन वेगळ्या विचारधारांचे राज्य असून हे जास्त दिवस चालणार नसल्याचे सांगत आहेत. मात्र, त्या भाजप नेत्यांनी आता तरी आपला अहंकाराची भूमिका बाजूला ठेवावी, असा टोला मलिक यांनी भाजपला लगावला.

Related posts: