|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सारण कोंडिला महावीर

सारण कोंडिला महावीर 

यादव पक्षातील सारण याचे रणप्रवीण वंगराजाशी तुंबळ युद्ध चालले होते. सारणाने त्याच्यावर बाणांचा पाऊस पाडला. त्यामुळे वंगराजा वैतागून गेला. सारणाने वंगराजाचा सारथी मारला, घोडे मारले, त्याच्या सैन्याला झोडपून टाकले.

विरथ केला वंगराजा । सवेंचि चढे पट्टगजा ।

धनुष्य वाहोनियां वोजा । बाण पैंजा घेतले ।

शर सोडिले सारणावरी । सारण बाणांतें निवारी ।

गजें रथ केला चुरी । दांत उरिं लाविले ।

रथाखालीं घातली उडी । गज धरिला शुंडादंडीं ।

सारण सोंडतें मुरडी । गजाबुडीं रिघाला ।

गज मारावया एकसरें । सारण गजातळीं फिरे ।

वंग वर्षताहे शस्त्रें । सारणा बाहेर निघों नेदी ।

सारणाने वंगराजाला विरथ केले त्यावेळी तो त्याच्या हुकमी हत्तीवर धनुष्य बाणांसह आरूढ झाला. त्याने तेथून सारणावर बाण टाकले. ते सारणाने दूर सारले. मग वंगराजाच्या हत्तीने सारणाच्या रथाचा चुराडा केला. तेव्हा सारणाने रथाखाली उडी घेतली व त्याने हत्तीची सोंड धरून पिरगाळली. हत्तीला मारण्यासाठी तो हत्तीच्या पोटाखाली शिरला. त्यावेळी वंगराजाने असा काही बाणांचा वर्षाव केला की सारणाला हत्तीच्या पोटाखालून निघता येईना.

सारण कोंडिला महावीर । यादवदळीं हाहाकार ।

ऐकोनि पावला बळिभद्र । वृक्ष थोर उपडिला ।

राहें साहें म्हणे वंगातें । तेणें विंधिला बाणें शतें ।

मुसळ घेऊनि डावे हातें । त्या बाणातें निवारिलें ।

दक्षिणहातीं होता वृक्ष । एकेचि घायें कपाळमोक्ष ।

गज निमाला नि:शेष । अधोमुख पडियेला ।

आडवा धांविन्नला केशिक । राजा उठावला मुख्य ।

झाला बळिभद्र सन्मुख । दोघे देख खवळले ।

केशिकावरी हलायुध । मारा पेटला सुबुद्ध ।

येरिकडे राजे सन्नद्ध । यादवांवरी उठावले ।

केशिक राजा अतुर्बळी । राम मारील निजहळीं ।

गवेषण राजा रणकल्लोळीं । घेईल समफळी यादवांसी ।

तेव्हां राम माजवील रणनदी । तेथें चहूं पुरुषार्था मोक्षसिद्धी ।

कृष्णदृष्टीचिया प्रबोधीं । सायुज्यपदीं निजयोद्धे ।

श्रीकृष्णाचिया दृष्टींपुढें । रणा येतां सायुज्या चढे ।

निधडिया वीरां भाग्य चोखडें । सायुज्य रोकडें साधिती ।

तेथें द्वंद्वयुद्ध अतितुंबळ । रणीं माजेल रणकल्लोळ ।

एका जनार्दनीं रसाळ । कथा कलिमलनाशिनी ।

सारण कोंडला गेला म्हणून यादव सैन्यात हाहाकार उठला. तो ऐकून बलरामदादा तेथे धावत आले. त्यांनी एक भव्य वृक्षच मुळासकट उपटून काढला व तो हातात घेऊन ते वंगराजावर चाल करून गेले. वंगराजाने त्यांच्यावर बाण मारले, ते त्यांनी डाव्या हातातील मुसळाने अडविले. उजव्या हाताने झाड वंगराजाच्या डोक्मयावर घालून त्याचा कपाळमोक्ष केला व त्याचा हत्तीही मारला. मग केशिक बलरामावर धावला. केशिक व बलरामाचे घनघोर युद्ध झाले. केशिक अतिशय बलवान होता. त्याचे व बलरामाचे युद्ध रोमांचकारी झाले. जरासंध पक्षातील इतर राजे यादवांवर तुटून पडले.

Ad.  देवदत्त परुळेकर

Related posts: