|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » उद्धवपर्व!

उद्धवपर्व! 

महाराष्ट्रात उगवणारा आजचा सूर्य उद्धव ठाकरे यांचा असणार आहे. आजच्या दिवसावर त्यांचे नाव कोरलेले आहे. मुख्यमंत्री या बिरूदासह ठाकरे महाराष्ट्राच्या संवैधानिक नेतृत्वाला सिद्ध झाले आहेत. राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभापासूत घनघोर राजकीय संघर्ष, डाव-प्रतिडावाचा सामना करत, त्याचा परिणाम स्वतःच्या आरोग्यावर झाला तरी न थकता कार्यरत राहिलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांच्या मुलासह सर्वपक्षीय नव्या तरूणांची फौज सुद्धा दाखल झाली आहे आणि त्यांनी आमदारकीची शपथही घेतली आहे. या सर्वांना आपल्या कार्यातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर सीमाभागातील मराठी जनतेचेही भले होवो अशा शुभेच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे यांना आम्ही व्यक्तीशः अनेक वर्षे जाणते. ते शांत, संयमी पण योग्य प्रश्नांसाठी योग्यवेळी आक्रमक होणारे, ठाम भूमिका घेणारे असे  नेतृत्व म्हणून. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी झटणाऱया शिवसेनेचे त्यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर नेतृत्व स्वीकारले असले तरी त्यांच्या हयातीतच अंतिम काळात शिवसेनेला नवी दिशा उद्धवजीच देत होते. राज्यातील शेतकरी, कामगारांच्या हितासाठी झटतानाच सीमाभागातील मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून सीमामेळावे घेतलेले आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवशी संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि सीमाप्रश्नासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांची, कामगारांची, शेतकऱयांची आठवण काढून आम्ही त्यांना सीमावासियांच्यावतीने शुभेच्छा देत आहोत. हा लढा तुमचाही होता आणि यापुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुम्हालाच तो सर्वोच्च न्यायालयापासून केंद्र सरकारपर्यंत सर्वत्र सक्षमपणे लढावा लागेल याची आठवणही आम्ही त्यांना करून देत आहोत. शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ 26 जून 1966 रोजी शिवाजी पार्कवरील कदम मॅन्शनमध्ये फुटला. तो नारळ फोडताना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होते, संस्थापक बाळासाहेब होते तसेच त्या नारळातील पाण्याचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर पडले त्यात बाल्यावस्थेतील उद्धव ठाकरेही होते. त्यामुळे शिवसेनेचे जे प्रश्न ते सर्व उद्धव ठाकरेंच्याही आयुष्याला लागू पडलेले आहेत. नियतीने त्यांच्यावर या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावून महाराष्ट्राच्या कक्षा विस्तारण्याच्या, महाराष्ट्राच्या नकाशाला सीमाभाग जोडण्यासाठीच्या प्रयत्नांची जबाबदारी आणून सोडली आहे. या लढय़ातील एक सर्वोच्च सेनानी शरदराव पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार येण्यात मोठी भूमिका बजावलेली आहे आणि काँग्रेसही या सरकारमध्ये सामील होत आहे. तेव्हा इतिहासातील चूक सुधारण्याची जबाबदारी काँग्रेसवरही येऊन ठेपलेली आहे. ते सर्वच जण आपली जबाबदारी पार पाडतील अशी आशा महाराष्ट्राला आणि सीमाभागाला आहे. शिवाजी पार्क…ज्याने शिवसेना आणि व्यंगचित्रकार बाळ केशव ठाकरे यांचा इतिहास रचताना पाहिला. ज्या मैदानात रणगर्जना घुमल्या आणि सात वर्षांपूर्वी शिवसेनेचा तोच जन्मदाता मावळत्या सूर्याच्या साक्षीने ज्या मैदानावर अग्नीच्या स्वाधीन झाला त्याच भूमीवर शिवसेनेच्या आणखी एका मुख्यमंत्र्याचा शपथविधी होत आहे. नवा इतिहास घडणार आहे. हा केवळ जल्लोषाचा काळ नाही हा महासत्तांतराचा काळ आहे. जे कधी घडेल असा स्वप्नातही कोणी विचार केला नसेल असे घडताना दिसते आहे. त्याचा लाभ इथल्या मातीला व्हायला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत यावेळी लिहिणे अत्यंत गरजेचे आहे. कारण शिवशाहीचे सरकार जेव्हा अस्तित्वात आले तेव्हा ते आज आदित्य ठाकरे ज्या वयाचे होते साधारण त्याच वयाचे होते आणि बाळासाहेबांचे उत्तराधिकारी ते नव्हे तर राज ठाकरे होतील असेच बोलले जात होते. तेव्हा ‘सामना’च्या कचेरीत आणि शिवसेनेच्या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये स्वतःला गुंतवून घेतलेल्या उद्धव यांच्या ध्यानीमनीही तेव्हा नसेल की कधीकाळी बाळासाहेबांनी उभा केलेले हे विश्व आपल्याला सांभाळावे लागेल. पण, 1997-98 दरम्यान स्थिती बदलत गेली. राज ठाकरे भलत्याच विषयात गुंतत गेले आणि बाळासाहेबांना आपल्या कुटुंबातील हे तिसरे अस्त्र बाहेर काढावे लागले. बाळासाहेबांनी उद्धव यांच्यावर व्यक्त केलेला विश्वास आज सार्थ वाटतो तो यामुळेच. आक्रमक शिवसेनेचा हा मवाळ नेता अशा टीका झाली. त्यातच 2002 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत ‘मी मुंबईकर’सारखी सर्वसमावेशक भूमिका राज यांनीच हाणून पाडली. पण, मुंबईतील सेनेची गेलेली सत्ता उद्धव यांनी राखली. त्यांच्या वाटय़ाला संघर्ष येणार हे दिसू लागले. बाळासाहेबांच्या अमृतमहोत्सवात शरद पवार यांनी पुढील आयुष्याच्या आणि संघर्षाच्याही शुभेच्छा दिल्या होत्या. त्या शुभेच्छा प्रत्यक्ष दिसू लागल्या. भाजपची माया पातळ झाली. राणेंनी उद्धव ठाकरेंवरच आरोप करत शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना बाळासाहेबांकडून हाकलून लावण्यात आले. पण, खुद्द राज ठाकरे यांनी जेव्हा बंड केले तेव्हा बाळासाहेबही हतबल दिसले. पण, हे वास्तव मान्य करून उद्धव ठामपणे पुढे आले. उभा-आडवा महाराष्ट्र पिंजून काढत राहिले. पुन्हा एकदा शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवेन असा शब्द घेऊन बाळासाहेबांनी जगाचा निरोप घेतला. 2014 च्या मोदी लाटेनंतर शिवसेनेला भाजपने दाबण्यास सुरूवात केली. पण, या लाटेतही वेगळे लढण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांनी दाखवली. कारण तोपर्यंत त्यांना स्वतःचा आणि स्वतःच्या पक्ष संघटनेचा अंदाज आला होता. गेली पाच वर्षे त्यांनी भाजपच्या नेतृत्वाने केलेल्या प्रत्येक डावाला प्रतिडावाने मात दिली. प्रसंगी चार पावले मागे घेत तडजोड केली. पण, संयम सुटू दिला नाही. जेव्हा आपली वेळ आली तेव्हा त्यांनी योग्य खेळी केली. शेवटच्या क्षणीही भाजपने चकवा दिला. मात्र त्यावरही त्यांनी मात केली. आता ते मुख्यमंत्री होत आहेत. सत्तेची पायरी चढताना शिवसेनेचा जो पाया आहे त्या प्रश्नांनी त्यांच्याकडे हात उंचावलेले आहेत. ते प्रश्न त्यांच्या याच पंचवार्षिक कारकिर्दीत सुटोत अशा उद्धवपर्वाला शुभेच्छा!

Related posts: