|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » लोकसभेकडून विशेष सुरक्षा विधेयक संमत

लोकसभेकडून विशेष सुरक्षा विधेयक संमत 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

विशेष सुरक्षा गट कायद्यात सुधारणा करणारे विधेयक लोकसभेत संमत करण्यात आले आहे. या सुधारणेनुसार यापुढे या गटाची सुरक्षा केवळ पंतप्रधान आणि त्यांच्या निकटच्या नातेवाईकांनाच मिळणार आहे. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान आणि त्यांच्यासह त्यांच्या घरात राहणारे त्यांचे निकटचे नातेवाईक यांनाही ही सुरक्षा मिळू शकेल. माजी पंतप्रधान व त्यांचे नातेवाईक यांना ही सुरक्षा त्यांनी पंतप्रधानपद गमावल्यानंतर 5 वर्षांच्या कालावधीपर्यंत मिळणार आहे.

यापूर्वी ही विशेष सुरक्षा (एसपीजी) काँगेसच्या अस्थायी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. मात्र काही आठवडय़ांपूर्वी ती काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. याऐवजी त्यांना आता झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे. काँगेसने केंद्र सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला होता.

लोकसभेत या विधेयकाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जोरदार समर्थन केले. सरकारने ही सुधारणा करून या कायद्याला त्याचे मूळ स्वरूप प्राप्त करून दिले आहे. मूलतः हा कायदा पंतप्रधान आणि माजी पंतप्रधान यांच्यासाठीच होता. तथापि, काँगेसप्रणित सरकारने तो सौम्य करून त्याचे महत्व कमी केले. त्यामुळे गांधी कुटुंबियांना याअंतर्गत सुरक्षा देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

काँगेस सदस्यांकडून निषेध

सोनिया गांधी व त्यांच्या कुटुंबियांचा धोका कमी झालेला नाही. त्यामुळे सरकारने त्यांना विशेष सुरक्षा प्रदान केली पाहिजे. गांधी कुटुंबाचा धोका कमी झाल्याचा निष्कर्ष सरकारने कोणत्या आधारावर काढला, असा प्रश्न काँगेस सदस्यांनी केला. मात्र, सरकार पक्षाने आक्षेप फेटाळले.

Related posts: