|Sunday, January 19, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गगन कोंदलें तिही बाणीं

गगन कोंदलें तिही बाणीं 

रुक्मिणी हरण प्रसंगी झालेल्या युद्धाचे वर्णन करताना एकनाथ महाराज पुढे म्हणतात –

राय चलिले मुगुटांचे । थोर बळ गवेषणाचें ।

सैन्य पातलें मागधाचें । युद्ध त्याचे दारुण ।

वेगीं धनुष्या वाहिला गुण । शितीं लावूनियां बाण ।

शस्त्रे। झळकती दारुण । रणकंदन करूं आले ।

राजे चालिले प्रबळ । यादव उठवले सकळ ।

दुमदुमलीं दोन्ही दळे । एकमेळें मिसळले ।

गगन कोंदलें तिही बाणीं । तळीं खिळिली धरणी ।

मागें पाय न ठेविती कोणी । वीर रणीं खवळले ।

वीर वीरातें हणित । लोहधुळोरा उसळत ।

वरिया वाट न चले तेथे । वीर अद्‍भुत मातले ।

शस्त्रे सहित तोडिती कर । मुगुटेंसहित पाडिती शिर ।

गजांसहित मारिती वीर । सपिच्छ शर भेदिले ।

चरण तोडिले गजांचे ।  रजे पाडिले ब्रीदांचे ।

खुर छेदिले अश्वांचे । आंख रथांचे भेदिले ।

अनेक राजे युद्ध करू लागले. गवेषण हा बलाढ्य होता. त्याचे व मागध सैन्याचे दारूण युद्ध झाले. आकाश बाणांनी कोंदले. वीरांना रणमद चढला. शस्त्रासह हात तोडले. मुकुटासह शिरे तोडली. घोडय़ांचे खूर छेदले. रथांचे आस मोडले.

राजे विनटले अनेक । यांवरी उठावला श्वफल्क ।

बाणीं त्रासूनिया देख । एकें एक खिळियेले ।

वीर भिडिन्नले पडिपाडें । यादवांचे बळ गाढें ।

गवेषण चालिला पुढें । गुणीं कुऱहाडे लाविले ।

श्वफल्क विंधिला पांच बाणी । रथ छेदूनि पाडिला धरणीं ।

कंक सात्यकी हे दोन्ही । विसां बाणीं विंधिलें ।

यादवांचा श्वफल्क व मागधाचा गवेषण यांचे तुंबळ युद्ध चालले. त्यांनी श्वफल्काला पाच बाण मारले. कंक व सात्यकीला वीस बाण मारले.

बाण अनिवार निर्व्यंग । भेदिलें वीरांचे अष्टांग ।

गवेषण योद्धा चांग । न करी पांग दुजयाचा ।

चक्रदेव चालिला रागें । एकें बाणें विंधिला वेगें ।

रथासहित घातला मागें । रणभूमि सांडविली ।

देखोनि चालिला अतिदंत । कोपें खवळला अद्‌भुत ।

दहा वीस पांच सात । बाण शत वरुषला ।

बाणीं निवारिले बाण । हांसिन्नला गवेषण ।

येरु कोपला दारुण । आठ बाण सोडिले ।

दारुण बाण आले आठ । अनिवार अति उद्भट ।

रथसारथी केला पीठ । शिरिंचा मुगुट पाडिला ।

एक खडतरला बाण । गगना गेला गवेषण ।

क्रमूनियं ग्रहगण । ध्रुवमंडळ उडविला ।

घयासरसी आली भवंडी । पडत पडत आवरली मुरकुंडी ।

रणांगणीं घातली उडी । मूर्च्छा गाढी सांवरिली ।

गवेषण पराक्रमी होता. त्याने अतिदंतावर चढाई केली. अतिदंताने त्याचा रथ मोडला, त्याच्या डोक्मयावरचा मुकुट खाली पाडला आणि गवेषणाला घायाळ केले. गवेषणाला मूर्च्छा येऊन तो रणांगणावर पडत असतानाच त्याने कसेबसे स्वतःला सावरले.

Related posts: