|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सावईवेरे अनंत देवस्थान जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

सावईवेरे अनंत देवस्थान जत्रोत्सवाला आजपासून प्रारंभ 

वार्ताहर /सावईवेरे :

सावईवेरे येथील श्री अनंत देवस्थानचा वार्षिक सुप्रसिद्ध जत्रोत्सवाला आज शुक्रवार 29 नोव्हे. पासून प्रारंभ होत असून उत्सवाची सांगता शुक्रवार 6 डिसें. रोजी वघ दशमीने होणार आहे.

त्यानिमित्त शुक्रवार 29 रोजी कालोत्सवानिमित्त सकाळी श्रीस अभिषेक नैवेद्य, दुपारी आरत्या, तीर्थप्रसाद सायं. श्रीस गंधपूजा व त्यानंतर श्रीची पालखीतून गावागावातून मिरवणूक काढण्यात येईल. पालखी मिरवणूकीचा प्रारंभ श्री सातेरी देवस्थानहून होणार असून सातेरीभाट लक्ष्मीनारायण देवस्थानाला जत्रोत्सवाचे निमंत्रण देऊन परतीच्या वाटेत येत असताना सुवासिनीकडून ओवाळणी स्वीकारली जाईल. याचवेळी गावातील भक्तगण पोफळीची रोपे हातात घेऊन वाद्यांच्या तालावर नाचत ‘हरी रे माझ्या पांडुरंगा, सखे हरी माझ्या पांडुरंगा’ गजरात मंदिरापर्यंत येतील. या मिरवणूकीत अबलावृद्धांचा सहभाग प्रामुख्याने असतो. पालखी मंदिरात प्रवेशल्यानंतर आरत्या व तिर्थप्रसाद त्यानंतर दशावतारी काला सादर करण्यात येतो.

नौकाविहार, गरूडासन, विजयरथ, सिंहासन, अंबारी व शेषासन खास आकर्षण

शनिवार 30 रोजी सकाळी धार्मिक विधी, रात्री 9.30 वा. भजन व त्यानंतर श्रीची प्राकारात मिरवणूक तसेच तळीत श्रीच्या मुर्तीसह नौकाविहार (सांगोडोत्सव) त्यानंतर आरत्या व तिर्थप्रसादानंतर नाटय़प्रयोगाचे सादरीकरण.

रविवार 1 डिसेंबर रोजी गरूडासन, उत्सवानिमित्त सकाळी धार्मिक विधी, सायंकाळी श्रीस गंधाची पूजा, रात्री 9.30 वा. गरूडासनातून भजनासह प्राकाराभोवती भव्य मिरवणूक निघेल. त्यानंतर मंदिरात श्रीस आरत्या व तिर्थप्रसाद व त्यानंतर नाटयप्रयोग होईल.

सोमवार 2 डिसें. रोजी देवस्थानच्या महाजन मंडळातर्फे विजयरथोत्सवानिमित्त सकाळी श्रीस अभिषेक नैवेद्य तसेच अन्य धार्मिक विधी, दुपारी आरत्या, तिर्थप्रसाद होईल.सायंकाळी श्रीस गंधपूजा, रात्री 9.30 वा. भजन तसेच त्यानंतर विजयोत्सवाने ठिकठिकाणी भजनी पारांसह श्रीची प्राकाराभोवती भव्य मिरवणूक व त्यानंतर नाटय़प्रयोगाचे सादरीकरण होईल.

मंगळवार 3 रोजी सिंहासननिमित्त सकाळी अभिषेक, नैवेद्य, दुपारी आरत्या, तिर्थप्रसाद सायंकाळी श्रीस गंधपूजा रात्री 9.30 वा. भजनासह श्रीची सिंहासनातून प्राकाराभोवती मिरवणूक त्यानंतर मंदिरात आरत्या, तिर्थप्रसाद व नाटय़प्रयोगाचे सादरीकरण होईल.

बुधवार 4 रोजी हत्ती अंबारीनिमित्त धार्मिक विधी, सायंकाळी हत्ती अंबारीतून प्राकाराभोवती भव्य मिरवणूक त्यानंतर नाटय़प्रयोगाचे सादरीकरण होईल.

गुरूवार 5 रोजी शेषासनानिमित्त प्राकाराभोवती मिरवणूक निघेल. शुक्रवार 6 रोजी वघ दशमीनिमित्त रात्री 9 वा. श्रीची प्राकाराभोवती भव्य मिरवणूक निघेल, त्यानंतर मंदिरात आरत्या, तिर्थप्रसाद होऊन जत्रोत्सवाची सांगता होईल. सर्व भाविकांनी तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे देवस्थान समितीतर्फे कळविण्यात आले आहे.

Related posts: