|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणकोणातील नवीन महामार्गाचे आज उद्घाटन

काणकोणातील नवीन महामार्गाचे आज उद्घाटन 

प्रतिनिधी /काणकोण :

काणकोणातील चार रस्ता ते माशे या चौपदरी महामार्गाचे उद्घाटन आज 29 रोजी सकाळी 11 वा. होणार आहे. या तालुक्यातील गालजीबाग, तळपण पूल, माशे खाडीवरील पूल याबरोबरच नवीन महामार्गाचे स्वप्नही शेवटी साकार झालेले असून उद्घाटन सोहळय़ाची आणि मंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी गुरुवारी चालू होती.

या महामार्गाचे उद्घाटन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार होते. पण मिळालेल्या माहितीनुसार, ते आज काही कारणांस्तव पोहोचणार नसून त्याऐवजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक खात्याच्या राज्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, स्थानिक आमदार असलेले उपसभापती इजिदोर फर्नांडिस, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, वाहतूक खात्याचे सचिव संजीव रंजन, मुख्य सचिव परिमल राय हे हजर राहणार आहेत.

उपसभापती फर्नांडिस यांनी या कित्येक वर्षांपासून मागणी केल्या जाणाऱया भव्य प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळय़ाला काणकोणातील जिल्हा पंचायत सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच, भाजप कार्यकर्ते आणि अन्य नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. नगराध्यक्षा नीतू देसाई यांच्या कक्षात त्यांनी खास बैठक घेऊन आजच्या कार्यक्रमाची माहिती दिली. काणकोणच्या महामार्ग विभागाचे साहाय्यक अभियंता सुभाष पागी, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत नाईक यांनीही या उद्घाटन सोहळय़ाची जय्यत तयारी केली असून उपसभापती फर्नांडिस यांनी नजरेस आणून दिलेल्या बहुतेक त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने लक्ष देण्यात आलेले आहे, असे पागी यांनी स्पष्ट केले.

सदर पुलांच्या उभारणीत मोलाचे योगदान दिलेले माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची उणीव मात्र यावेळी भासते, अशी प्रतिक्रिया माशे येथील सामाजिक कार्यकर्ते निशांत प्रभुगावकर यांनी व्यक्त केली.

Related posts: