|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नुने – नेत्रावळी येथील वन हक्क कायद्याखालील 25 प्रकरणे निकालात

नुने – नेत्रावळी येथील वन हक्क कायद्याखालील 25 प्रकरणे निकालात 

प्रतिनिधी /सांगे :

दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय आणि सांगेचे उपजिल्हाधिकारी अजय गावडे यांनी सागे तालुक्यातील नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रातील नुने येथील वन हक्क निवासी कायद्याखालील जमिनीची 25 प्रकरणे निकालात काढली असून संबंधितांना जमिनीचे हक्क देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी काढले आहेत, अशी माहिती सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी नुने येथील कार्यक्रमात बोलताना दिली.

यामुळे खऱया अर्थाने अनुसूचित जमातींतील लोकांना न्याय मिळाला आहे. गोवा मुक्त होण्याच्या पूर्वीपासून हे लोक वन खात्याच्या जमिनीत काजूची लागवड करून त्या उत्पन्नाच्या आधारे आपली उपजीविका चालवत आले आहेत. त्यांना काही महिन्यांतच जमिनीच्या सनदा व आराखडे दिले जातील, असे गावकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी रॉय व उपजिल्हाधिकारी गावडे यांचे अभिनंदन केले. गावडे यांनी हे दावे निकालात काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे त्यांनी सांगितले.

सोमवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या शासकीय अधिकाऱयांच्या बैठकीत हे दावे निकालात काढण्यात आले. नुनेतील 78 दाव्यांपैकी अजून 53 दावे निकालात काढणे बाकी आहे. मागील आठवडय़ात उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी मडगावात बैठक घेऊन जलदगतीने दावे निकालात काढण्याची सूचना केली होती.

उपजिल्हाधिकारी गावडे यांचा सत्कार

यावेळी गावच्या नागरिकांनी उपजिल्हाधिकारी गावडे यांचा ज्येष्ठ नागरिक रमेश गावकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू प्रदान करून सत्कार केला. गावडे बोलताना म्हणाले की, वन हक्क दावे निकालात काढण्यासाठी ग्रामसभेची मान्यता महत्त्वाची असते. राहिलेल्यांना पुढील काही दिवसांत सोपस्कार पूर्ण करून मालकी हक्क दिले जाणार आहेत. वन हक्क समितीचे अध्यक्ष विठ्ठल गावकर यांनी याकामी खूप मेहनत घेतलेली आहे. गावकऱयांनी आपला जो सत्कार केला आहे तो केवळ आपला नसून शासकीय सेवेचा व अन्य अधिकारी, कर्मचाऱयांचा आहे.

गावचे पंच विठ्ठल गावकर यांनी वन हक्क समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना उपजिल्हाधिकारी व त्यांच्या कार्यालयाचे उत्तम सहकार्य मिळाल्याचे सांगितले. यावेळी गावचे बुधवंत रमेश गावकर, अर्जुन गावकर, बाळू गावकर, पंच उमेश गावकर, मळकर्णेचे पंच संदेश गावकर हजर होते. सूत्रनिवेदन उदय गावकर यांनी केले.

Related posts: