|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » प्रेंचच्या ‘पार्टिकल्स’ चित्रपटाला सुवर्णमयूर

प्रेंचच्या ‘पार्टिकल्स’ चित्रपटाला सुवर्णमयूर 

प्रतिनिधी /पणजी :

सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गुरुवारी गोव्यात शानदार समारोप झाला. प्रेंच स्वीश चित्रपट ‘पार्टिकल्स’ला उत्कृष्ट चित्रपटाचा अव्वल मान प्राप्त झाला. सुवर्णमयुर व रोख 40 लाख रुपयांचे बक्षीस या चित्रपटाला प्राप्त झाले, तर उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून जलीकट्टू चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जोझ पल्लीसरी यांची निवड करण्यात आली. माई घाट मराठी चित्रपटातील अभिनेत्री उषा जाधव यांना उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देण्यात व त्यांना रौप्यमयुर प्राप्त झाला. उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘मनीगेला’ चित्रपटाचे अभिनेते झु शोरेजे यांना देण्यात आला. त्यांना रौप्यमयुर पुरस्कार देण्यात आला. समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यावेळी देशातील शेतकरी, बेकारी, जवानांच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त करून एक विदारक सत्य यावेळी मांडले.

12000 प्रतिनिधींनी लुटला 200 चित्रपटांचा आस्वाद

मागील 8 दिवस राज्यात सुरू असलेल्या सुवर्ण महोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा गुरुवारी समारोप झाला. या महोत्सवामध्ये सुमारे 200 चित्रपट दाखविले गेले. सुमारे 12000 प्रतिनिधींची यावेळी नोंदणी झाली होती. यंदाचा चित्रपट महोत्सव पूर्णपणे यशस्वी झाल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव अमित खरे यांनी सांगितले. 51 वा चित्रपट महोत्सव हा चित्रपट सृष्टीतील बडे निर्माते सत्यजीत रे यांना समर्पित असेल, असेही ते म्हणाले.

मॉन्स्टर्स ठरला पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट

विशेष मानांकनामध्ये ‘हेल्लोरो’ या चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला, तर पदापर्णातील उत्कृष्ट पुरस्कार ‘मॉन्स्टर्स’ या चित्रपटाला देण्यात आला. विशेष ज्युरी पुरस्कार ‘बलून’ या चित्रपटाला देण्यात आला.

आयसीएफटीला युनोस्कोचा विशेष पुरस्कार

उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जलीकट्टू चित्रपटाचे दिग्दर्शक लिजो जोझ पल्लीसरी यांना देण्यात आला. त्यांनाही रौप्यमयुर प्राप्त झाला. सुवर्णमहोत्सवी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजनाबाबत आयसीएफटी युनोस्कोचा विशेष पुरस्कार भारताला देण्यात आला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे व चैतन्य प्रसाद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्याचबरोबर आयसीएफटी विशेष मानांकन पुरस्कार बहात्तर हुरे या चित्रपटाला देण्यात आला.

चित्रपटातून खुप काही शिकता आले : राज्यपाल

चित्रपटातून आपल्याला खुप काही शिकता आले. अनेक चित्रपटांचा संदर्भ देऊन व त्यातील गाणी आणि अभिनेत्री व अभिनेते यांचे संवादही त्यांनी सांगितले. तसेच चित्रपटातील प्रसंगाचे वर्णनही राज्यपालांनी केली. महाभारत मालिकेतील द्रौपदीची भूमिका केलेली अभिनेत्री रुपा गांगुली यांच्या अभिनयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी कौतुक केले. आपण जम्मू काश्मिरमधून गोव्यात आलो आहे. 370 कलम रद्द केल्यानंतर तिथे काय स्थिती आहे हे त्यांनी सांगितले. 370 कलम हटविल्यानंतर आजपर्यंत तिथे गोळीबार करावा लागला नाही, असेही ते म्हणाले. हत्यारे खाली ठेवून आपल्या घरी या व जेवण करा असे आवाहन आपण लोकांना केले. हुर्रीयतने युवकांना कसे चुकीचे संदेश दिले याचाही त्यांनी उल्लेख केला.

समाजाकडे दुर्लक्ष करणाऱया धनिकांवर राज्यपालांची टीका

चौदा मजली इमारतीमध्ये राहणारे काही धनाढय़ लोक आहेत. प्रचंड पैसा कमावतात व सामाजिक कार्यासाठी एक रुपया देत नाहीत. अशा लोकांवर चित्रपट काढा, असे आवाहन त्यांनी केले. देशातील धनाढय़ व्यक्तीवर काही सूचक विधाने त्यांनी केली. देशात आज नोकरीसाठी युवक वणवण करतात. शेतकऱयांची अवस्था वाईट आहे. लोकांची स्थिती वाईट आहे. देशातील जवानांची अवस्था वाईट आहे. जवानांचे पार्थिव येताच अनेक लोक, राजकारणी, दर्शनाला येतात, पण पार्थिव उचलल्यानंतर कोणी त्यांच्या कुटुंबाकडे लक्षही देत नाहीत. धनिक लोक आहेत, पण ते जवानांसाठी, शिक्षण क्षेत्रासाठी काही करायला पाहत नाहीत. त्यामुळे चित्रपटातील लोकांनी या लोकांवर चित्रपट काढून त्यांना उघडे करायला हवे, असेही ते म्हणाले.

चित्रपटासाठी गोवा हे उत्कृष्ट स्थळ : मुख्यमंत्री

चित्रपटासाठी गोवा हे उत्कृष्ट स्थळ आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते की गोवा हे चित्रपटासाठी उत्कृष्ट स्थळ बनावे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. चित्रपट महोत्सवामुळे या क्षेत्रातील दिग्गज लोकांशी चर्चा करता येते. या महोत्सवामध्ये दहा हजारापेक्षा जास्त प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. हा महोत्सव कायमस्वरूपी लोकांच्या स्मरणात रहावा असाच आहे. प्रत्येक प्रतिनिधीने महोत्सवाचा आनंद घेतला. महोत्सव पूर्णपणे प्लास्टिकमुक्त केला. गोव्यातील लोकांपर्यंत चित्रपट पोहोचविले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपली कला दाखविण्यास संधी दिली. केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनीही आपले विचार मांडले. समारोप सोहळय़ाचे सूत्रसंचालन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अभिनेता कुणाल कपुर यांनी केले.

खासदार रवी किरण, रुपा गांगुली, राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मुख्यसचिव परिमल रॉय, संगीतकार इलाही राजा, अभिनेता प्रेम चोप्रा, गोवा करमणूक सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांचीही उपस्थिती होती. यावेळी चित्रपट ज्युरींचा सन्मानही करण्यात आला. इलाही राजा, श्रीमती संजु बोरा, पवनकुमार, प्रेम चोप्रा, अरविंद स्वामी, बिरजू महाराज यांनाही सन्मानित करण्यात आले.

सुवर्णमयुर : पार्टिकल्स (स्वीश फ्रान्स चित्रपट)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : लिजो जोझ पल्लीसरी (मल्याळम चित्रपट – जलीकट्टू)

विशेष ज्युरी पुरस्कार : बलून (चिनी चित्रपट)

पर्दापनातील सर्वोत्कृष्ट चित्रपट : मॉन्स्टर्स (रोमानियन चित्रपट)

विशेष मानांकन : हेल्लोरो (गुजराती चित्रपट)

उत्कृष्ट अभिनेता : झु शोरेज (चित्रपट – मनीगेला)

उत्कृष्ट अभिनेत्री : उषा जाधव (मराठी चित्रपट – माईघाट)

Related posts: