|Friday, January 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » महाविकास आघाडी विरुद्धची याचिका फेटाळली

महाविकास आघाडी विरुद्धची याचिका फेटाळली 

नवी दिल्ली:

 शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी महाराष्ट्रात स्थापन केलेल्या महाविकास आघाडी विरोधात सादर करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शिवसेनेने भाजपशी निवडणूकपूर्व युती केली होती. तथापि, निवडणूक निकालानंतर युतीला बहुमत मिळालेले असतानाही शिवसेनेने भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास नकार देऊन विरोधी पक्षांशी आघाडी केल्याने जनादेशाचा अवमान झाला आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.

या याचिकेवर शुक्रवारी न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्यासमोर सुनावणी झाली. निवडणूकपूर्व युती असली तरी निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला अन्य कोणत्याही पक्षाबरोबर नव्याने आघाडी स्थापन करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही, असे खंडपीठाने याचिकाकर्त्यांना स्पष्ट केले. ही याचिका दिल्लीतील वरुणकुमार सिन्हा यांनी याचिकाकर्ते प्रमोद पंडित जोशी यांच्यावतीने सादर केली होती. जोशी हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे नेते आहेत. राजकीय पक्षांच्या घटनात्मक आणि विधिवत अधिकारांमध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे खंडपीठाने ही याचिका फेटाळताना प्रतिपादन केले आहे.

Related posts: