|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » राज्यात सत्ताकारण… इस्लामपुरचे बदलणार समिकरण !

राज्यात सत्ताकारण… इस्लामपुरचे बदलणार समिकरण ! 

युवराज निकम / इस्लामपुर

राज्यातील सत्ताकारणात अखेर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय काँगेस यांचे अखेर ‘मेथकूट’ जमलं. मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यांच्या समवेत तीन्ही पक्षाच्या सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीतून पहिला मान इस्लामपूर मतदार संघाचे लोकप्रतिनिधी जयंत पाटील यांना मिळाला. या मतदार संघात पुर्वीपासून जयंतराव विरुध्द सर्व विरोधक, असेच समिकरण प्रत्येक निवडणूकीत राहिले. यावेळी तरी त्यांची चारीबाजूनी कोंडी करण्याचा डाव विरोधकांचा होता. पण तो फसला. नगरपालिकेत बहूमत राष्ट्रवादीचे असले, तरी लोकनियुक्त नगराध्यक्ष विरोधकांचे आहेत. पण राज्यातील बदलत्या सत्ताकारणाने येथील काही समिकरणे बदलतानाच सत्ताकेंद्रही बदलले आहे. जयंतराव विरोधक त्यास कसे तोंड देतात, ते पहावे लागणार आहे.

सन 2014 ला महाराष्ट्रात व देशात भाजपा-शिवसेनेची सत्ता आली. त्यापूर्वी सलग 15 वर्षे सत्ता आणि मंत्रीमंडळात असणाऱया ना.जयंत पाटील यांना विरोधात बसावे लागले. इस्लामपूर मतदार संघात भाजपा-सेनेच्या तुलनेत राष्ट्रवादीने या काळातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले. दोन्ही पक्षातील स्थानिक नेतृत्वांना मागे रेटत घटकपक्ष म्हणून भाजपात सहभागी झालेल्या तत्कालीन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेवर जावून कृषीराज्यमंत्री पद मिळवले. या बदलत्या सत्ताकेंद्राने जयंतराव विरोधकांना बळ आले. सन 2016 च्या नगरपालिका निवडणुकीपर्यंत विरोधकांनी चांगलीच एकी दाखवली.

दिवंगत नेते नानासाहेब महाडीक यांनी भाजपा-शिवसेना, शेतकरी संघटना, रिपई यांसह अन्य पक्ष व संघटनांची मोट बांधली. गनिमी काव्याने ना.पाटील यांचे समर्थक असणारे निशिकांत पाटील यांना विरोधकांत आणून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी लढवले. तो प्रयोग यशस्वी होतानाच ना.पाटील किंबहूना राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 वर्षाच्या पालिकेतील सत्तेला सुरंग लागला. जयंतरावांच्या दृष्टीने ही घडामोड जिव्हारी लागणारी व राज्यात कमीपणा देणारी होती. पण त्यांनी हा पराभवही धीराने व संयमाने घेतला. दरम्यान नानासाहेबांचे निधन झाले. आणि विरोधकांत वर्चस्व व अहंकाराचा लढा सुरु झाला. नगराध्यक्ष पाटील व आ.खोत यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. नगराध्यक्ष पाटील यांचे चुलत बंधू विक्रम पाटील यांनी आ.खोत यांच्याशी जमवून घेवून शिवसेनेच्या मदतीने नगरपालिकेत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत हा संघर्ष पराकोटीला गेला. भाजपातून निशिकांत पाटील यांची जयंतरावांविरुध्द उमेदवारी त्यांच्या समर्थकांनी निश्चित मानली होती. पण अखेरच्या क्षणी त्यांना तोंडावर पाडून मतदार संघावर शिवसेनेने हक्क सांगून गौरव नायकवडी यांना मैदानात उतरवले. नगराध्यक्ष पाटील अपक्ष लढले. विरोधकांच्या तीन तिघाडीत व्हायचे तेच झाले. जयंत पाटील विक्रमी मतांनी विजयी झाले. एक महिन्याच्या सत्तास्थापनेच्या खेळात अखेर तीन पक्ष एकत्र येवून जयंतरावांना पहिल्याच सहा जणात मंत्रीमंडळात स्थान मिळाले.

राज्यातील सत्तेच्या चाव्या फिरल्याने काही अंशी इस्लामपूर शहर व मतदार संघातील राजकीय समिकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नगरपालिकेत विकास आघाडी व शिवसेना मित्र पक्षाची सत्ता आहे. शिवसेनेचे पाच नगरसेवक आहेत. आ.खोत, विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचा नगराध्यक्ष पाटील यांना कडाडून विरोध आहे. ते उघडपणे त्यांच्या मनमानी कार्यपध्दतीवर आरोप करीत आहेत. विधानसभा निवडणूकीनंतर हा संघर्ष अधिकच वाढला आहे. परिणामी नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेकडे विकासआघाडी, शिवसेना व विरोधी राष्ट्रवादीने ठरवून पाठ फिरवली. नगराध्यक्ष पाटील यांच्या समवेत सभागृहात अवघे तीनच नगरसेवक उरल्याने कोरम अभावी सभा रद्द करण्याची वेळ आली.

राज्यातील सत्तेचे लोण नगरपालिका राजकारणात येणार काय ? याबाबत शहरात चर्चा सुरु झाली आहे. अगोदरच सर्वांची नाराजी ओढवून घेतलेल्या निशिकांत पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. रत्याची अवस्था बिकट आहे. स्वच्छता व आरोग्याची घडी विस्कटली आहे. साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. अशा काळात बदलते सत्ताकारण आणि समिकरणाचा परिणाम विकास कामांवर होवू नये, हीच अपेक्षा शहरवासीयांची राहणार आहे. यामध्ये ना.जयंत पाटील यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. नगरपालिकेचे स्थानिक राजकारण गुंतागुंतीचे बनले असले तरी इस्लामपूर शहराने विधानसभा निवडणूकीत ना.पाटील यांना चांगली साथ दिली आहे. पाठीमागील अर्थमंत्री पदाच्या काळात त्यांनी भरीव निधी आणून शहरातील विकास कामे मार्गी लावली. या टर्ममध्ये ही त्यांच्याकडून शहरवासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

विरोधी दोऱया कुणाच्या हातात?

बदलत्या सत्ताकेंद्राने इस्लामपूर मतदार संघातील सारीच समिकरणे बदलली आहेत. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात कितपत समन्वय राहतो, हे पहावे लागेल. नानासाहेब महाडीक यांचे पुत्र सम्राट हे यावेळी शिराळयातून लढले. त्यांची व राहूल महाडीक यांची इस्लामपूर मतदार संघात महत्वाची भूमिका असते. निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केल्याने भाजपापासून दुरावले आहेत. भाजपाचे वरिष्ठ नेते त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार, हा औत्सुक्याचा विषय आहे. आ.खोत व विक्रम पाटील हे बॅकफुटवर गेलेल्या भाजपाला बळकटी देणार का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जयंतरावांविरुध्द लढताना विरोधी दोऱया नेमक्या कुणाच्या हातात राहणार याकडेही लक्ष राहणार आहे.

Related posts: