|Sunday, January 19, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अत्याचारानंतर डॉक्टर युवतीला जिवंत जाळले

अत्याचारानंतर डॉक्टर युवतीला जिवंत जाळले 

अमानवी कृत्याने हादरले तेलंगणा : गुन्हेगारांनाही जिवंत जाळण्याची कुटुंबीयांची मागणी

वृत्तसंस्था/ हैदराबाद

पशूचिकित्सक डॉक्टर युवतीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळल्याच्या घटनेने संपूर्ण तेलंगणा राज्य हादरले आहे. या घटनेचे पडसाद देशभरही उमटले असून महिला आयोगाने पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी रात्री बेपत्ता झालेल्या या युवतीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये एका पुलाखाली आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघा ट्रकचालकांना ताब्यात घेतले आहे.

प्रियांका रेड्डी असे या युवतीचे नाव असल्याचे निष्पन्न झाले असून तिच्या कुटुंबीयांनी गुन्हेगारांनाही जिवंत जाळण्याची शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याबाबतही तीव्र नाराजी पसरली असून राजकीय टिकाटिप्पण्णी होऊ लागली आहे. तिचा मृतदेह हैदराबाद शहराच्या जवळ शादनगर भुयारी मार्गाजवळ आढळून आला.

गुन्हेगारांनाही जाळण्याची कुटुंबीयांची मागणी

या घटनेविषयी अधिक माहिती अशी, ही डॉक्टर तरुणी बुधवारी सायंकाळी दवाखान्यातून घरी येण्यास निघाली होती. तथापि तिची दुचाकी बंद पडल्याने तिने तिच्या बहिणीला फोन करुन याची माहिती दिली. मात्र त्यानंतर तिचा फोन बंद होता आणि गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसून आला. मृत्युपूर्वी तिने बहिणीला दिलेल्या माहितीनुसार काही ट्रकचालक घटनास्थळी होते, असे समजले. याची माहिती तिच्या बहिणीने तत्काळ संबंधित पोलीस स्थानकाला कळवली. परंतु पोलिसांकडून तत्पर कार्यवाही न झाल्याने तिला प्राण गमवावे लागले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

ट्रकचालकासह दोघे ताब्यात

पोलिसांनी याप्रकरणी ट्रकचालक व त्याच्या मदतनीसाला ताब्यात घेतले असून ते दोघेही आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासत आहेत. पोलीस उपायुक्त प्रकाश रेड्डी यांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस विविध बाजू लक्षात घेऊन तपास करत आहेत.

गृहमंत्र्यांच्या वक्तव्याने तीव्र नाराजी

दरम्यान, तेलंगणाचे गृहमंत्री मोलाना महमूद अली यांनी मात्र त्या युवतीने घरी फोन करण्याऐवजी 100 नंबर डायल करायला हवा होता, असे वक्तव्य केल्याने राज्यात तीव्र नाराजी उफाळून आली आहे. मात्र नंतर सारवासारव करत त्यांनी सदर घटना दुःखद असल्याचे म्हटले आहे. पोलीस याप्रकरणी वेगाने कारवाई करुन गुन्हेगारांना पकडतील असे सांगितले.

महिला आयोगाची संतप्त प्रतिक्रिया

राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अत्यंत दुर्दैवी अशी घटना असून रस्त्यांवर लांडगे आपल्या भक्ष्याचा शोधात असल्याचे या घटनेने वाटत असल्याचे म्हटले आहे. दोषींना लवकरात लवकर पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी. पिडीत परिवाराला आयोग सर्वतोपरी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: