|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणकोणातील चार रस्ता – माशे महामार्गाचे लोकार्पण

काणकोणातील चार रस्ता – माशे महामार्गाचे लोकार्पण 

प्रतिनिधी/ काणकोण

काणकोणातील चार रस्ता ते माशे या 6.21 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग-66 चा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी मोठय़ा थाटात झाला. या रस्त्याच्या उद्घाटन सोहळय़ाला केंद्रीय वन व पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, वीजमंत्री नीलेश काब्राल, उपसभापती इजिदोर फर्नांडिस व नगराध्यक्षा नीतू देसाई यांची उपस्थिती होती.

या नव्या महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी तो माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांना अर्पण करताना त्याचे नामकरण ‘स्व. मनोहर पर्रीकर बगलरस्ता’ असे करून टाळय़ांच्या गजरात ते जाहीर केले. या कार्यक्रमाला काणकोण तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी एकच गर्दी केली होती. व्यासपीठावर स्व. मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर, माजी मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार विजय पै खोत, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, डॉ. पुष्पा अय्या, सरपंच सुमन गावकर, गणेश गावकर, उमेश गावकर, शैलेश पागी, उपनगराध्यक्ष हेमंत ना. गावकर, नगरसेवक दिवाकर पागी, प्रार्थना ना. गावकर, दयानंद पागी, किशोर शेट, एमव्हीआर कंपनीचे वेंकटराव, सल्लागार विजय, अधीक्षक अभियंता उमेश कुलकर्णी, भाजपाचे काणकोण मंडळ अध्यक्ष महेश नाईक, उपजिल्हाधिकारी विकास कांबळी हेही हजर होते.

अंतर 14 किलोमीटरांनी कमी

सदर रस्ता आणि गालजीबाग, तळपण व माशे या तीन पुलांच्या बांधकामाला 6 डिसेंबर, 2015 रोजी सुरुवात झाली होती. या प्रकल्पावर 294 कोटी रुपये इतका खर्च झालेला असून या नव्या पुलांमुळे आणि महामार्गामुळे काणकोण-कारवार अंतर 14 किलोमीटरांनी कमी झाले आहे. या उद्घाटन सोहळय़ाला केंद्रीय भूपृष्ठ आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र या प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त त्यांनी पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

पर्रीकर हे गोव्याचे विकास पुरुष : पाऊसकर

सार्वजनिक बांधकाममंत्री पाऊसकर यांनी स्व. मनोहर पर्रीकर हे गोव्याचे विकास पुरुष असून राज्यातील महामार्गाची कामे येणाऱया काळात पूर्ण होतील, असे सांगितले. वीजमंत्री काब्राल यांनी निसर्गाचा समतोल न बिघडविता गोव्याचा विकास साधण्याकडे हे सरकार लक्ष देत असल्याचे सांगितले. भूमिगत वीजवाहिन्यांची सुविधा उपलब्ध करण्याकडेही लक्ष देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपसभापती फर्नांडिस यांनी या महामार्गाचे सर्व श्रेय स्व. पर्रीकर यांना जात असल्याचे सांगितले. काणकोणच्या शॅक्सचालकांच्या तसेच माशे व गालजीबागवासियांच्या समस्यांकडे त्यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपा च्यारी यांनी केले. अधीक्षक अभियंते कुलकर्णी यांनी स्वागत केले, तर नगराध्यक्षा देसाई यांनी आभार मानले. यावेळी दाखविण्यात आलेल्या संपूर्ण प्रकल्पाची चित्रफीत पाहून उपस्थितांनी टाळय़ांच्या गजरात प्रकल्पाचे स्वागत केले. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री, अन्य मंत्री व अधिकाऱयांनी माशेपर्यंत जाऊन रस्ता व पुलांची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी माशे येथे स्थानिकांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस, उपअधीक्षक सेराफीन डायस, पोलीस निरीक्षक राजू राऊत देसाई, प्रबोध शिरवईकर, संतोष देसाई, तुकाराम चव्हाण हे स्वतः हजर होते

Related posts: