|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आधी महाराष्ट्राला दिलेली आश्वासने पूर्ण करा

आधी महाराष्ट्राला दिलेली आश्वासने पूर्ण करा 

त्यानंतरच गोव्यात येऊन सत्तास्थापनची स्वप्ने पाहा

प्रतिनिधी/ मडगाव

महाराष्ट्रात एक नको असलेली युती बनवून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मिळून सरकार स्थापन केलेले आहे. शिवसेनेच्या संजय राऊत यांनी आधी महाराष्ट्रात जी काही आश्वासने दिलेली आहेत ती सर्व पूर्ण करावीत. त्यानंतरच गोव्यात येऊन सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने बघावीत, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी मडगावात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हाणला.

मडगावातील दक्षिण गोवा भाजप कार्यालयात घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेला नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, माजी खासदार नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक व सदानंद तनावडे उपस्थित होते.

राऊत एका रात्रीत आपली वक्तव्ये विसरले

महाराष्ट्रात शिवसेनेला आघाडी सरकार स्थापन करता आल्याने आता त्यांचे नेते संजय राऊत मिळेल तसे बोलू लागले आहेत. शिवसेना हा छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने चालणारा पक्ष आहे असे ते म्हणायचे. जेव्हा शिवसेना व भाजपाची युती होती तेव्हा ते सतत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर एक विदेशी महिला देशावर राज्य करू पाहत असल्याची टीका करायचे. हे सर्व ते एका रात्रीत विसरले असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा त्यांनी आपण काय बोलतो ते लक्षात ठेवावे, असे तेंडुलकर म्हणाले.

शिवसेनेकडून महाराष्ट्राचा विश्वासघात

शिवसेनेने महाराष्ट्राचा ज्या प्रकारे विश्वासघात केलेला आहे तशा प्रकारचा विश्वासघात अजूनपर्यंत कुणीही केलेला नव्हता, अशीही टीका त्यांनी केली. भाजपने गोव्याच्या हिताची अनेक प्रकारची कामे केलेली आहेत. तसेच शिवसेनेने व राऊत यांनी महाराष्ट्रात जी काही आश्वासने दिलेली आहेत ती सर्व पूर्ण करावीत. शेतकऱयांच्या समस्यांचे निराकरण करावे व युवकांना नोकऱया द्याव्यात. नंतरच गोव्यात येऊन सत्ता स्थापन करण्याची स्वप्ने बघावीत, असे तेंडुलकर म्हणाले.

गोव्यात भाजपाकडे 27 आमदार आहेत हे राऊत यांनी लक्षात ठेवावे. तसेच शिवसेनेचा राज्यात एकही आमदार नाही. राज्यात पूर्ण बहुमताचे स्थिर सरकार आहे. गरज पडल्यास भाजपाचे संख्याबळ 30 वर सुद्धा नेण्यास आम्ही तयार आहोत, असे तेंडुलकर यांनी पुढे बोलताना सांगितले.

Related posts: