|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » हवा बदलली महाराष्ट्रात परिवर्तन

हवा बदलली महाराष्ट्रात परिवर्तन 

हीच ती वेळ’ म्हणत शिवसेनेचे ‘सूर्ययान’ अनेक अडथळे बाजूला करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सुखरूप उतरलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी गोरज मुहूर्ताला शपथ घेतली. शिवतीर्थावर जमलेल्या विराट जनसमुदायाच्या साक्षीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. जयंत पाटील, छगन भुजबळ, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, नितीन राऊत, बाळासाहेब थोरात यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आणि हवा बदलली आहे असा संदेश हिंदुस्थानला दिला. हीच वेळ आहे म्हणत शिवसेनेने वेळ साधली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांना मुख्यमंत्री करण्यात यशस्वी ठरली आहे.

24 ऑक्टोबरला विधानसभेचे निकाल जाहीर झाले तेव्हा ‘युतीने सत्ता राखली पण हवा बदलली आहे’ असा निकालाच्या विश्लेषणाचा लेख अक्षरयात्रेत दिला होता. राष्ट्रपती राजवट लागू झाली तेव्हा ‘पिक्चर अभी बाकी है’ असा लेख दिला होता. पण ही हवा वादळ बनेल आणि पिक्चर इतका सस्पेन्स ठरेल असे वाटले नव्हते. जनतेने भाजपा-शिवसेना युतीला सत्तेचा आणि काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीला विरोधी बाकावर बसण्याचा जनादेश दिला होता. पण, राजकारणात काहीही होऊ शकते याचा प्रत्यय आला आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व मित्रपक्षांची भाजप विरोधी ‘महाराष्ट्र महाविकास आघाडी’ तयार झाली. बैठका मागून बैठका झाल्या. पत्रे येण्यास उशीर झाला, सहय़ाची पत्रे पळवण्यात आली. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मध्यरात्रीचा खेळ झाला. अजित पवार भाजपाच्या तंबुत शिरले ‘मी पुन्हा येईन’ म्हणणारे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासोबत अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पवार कुटुंबियात फूट पडली. राष्ट्रवादीला चिर पडली. पाठोपाठ ती चिर पुन्हा सांधली गेली. भाजपबरोबर गेलेले अजित पवार शरद पवारांच्या घरी पुन्हा परतले. त्यांनी व पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे दिले. शरद पवारांनी तिन्ही पक्षांच्या 162 आमदारांची मोट बांधली. पंचतारांकीत ग्रँड हयात वर आमदारांची शक्तीपरेड झाली. तिन्ही पक्षांचे धोरण ठरले. बैठकामागून बैठका झाल्या. कोर्टकचेरी झाली, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाला, संजय राऊत, आशिष शेलार पत्रकार परिषदा घेऊन किल्ला लढवत होते आणि महिना उलटला तरी राज्याला मुख्यमंत्री मिळत नव्हता, अखेर ही कोंडी फुटली. ‘महाशिवआघाडी’चे नाव ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ असे झाले. तिन्ही पक्षांनी आपले जाहीरनामे बाजूला ठेवत किमान समान कार्यक्रम निश्चित केला. खाती वाटून घेतली सत्तेचे वाटप ठरवले आणि गुरुवारी गोरज मुहूर्तावर उद्धव ठाकरे यांनी तिन्ही पक्षातील सहा कॅबिनेट मंत्र्यासह शपथ घेतली आणि महाराष्ट्रात सत्तांतर झाले.

मतमोजणी झाली आणि कुणा दोघा किंवा तिघा पक्षांना एकत्र आल्याशिवाय अथवा एखादा पक्ष फुटल्याशिवाय कोणताही पक्ष सत्तेवर येणार नाही असा जनादेश दाखवत होता. शिवसेनेकडे भाजपाला बार्गेनिंग करावे असे संख्याबळ आले होते आणि शिवसेनेने या शक्तीचा उपयोग तर करून घेतलाच पण सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपाला विरोधी बाकावर बसवले. युतीच्या काळात शिवसेनेच्या मनोहर जोशींनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. आणि त्यानंतर दीर्घ काळाने गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनेच्या दृष्टीने हा खूप मोठा क्षण होता. आनंदाचा दिवस होता. उद्धव ठाकरे यांच्या जीवनातील सर्वोच्च विजय होता आणि विरोधी बाकावर बसायच्या तयारीत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला विशेषतः भाजपा विरोधकाना नवी ताकद देणारा हा प्रसंग होता. या साऱया घडामोडांच्या उत्सवमूर्ती वेगवेगळय़ा असल्या तरी त्यामागे शरद पवार यांची शक्ती, योजना आणि रणनिती होती. थकलेल्या काँग्रेसला आणि महाभरतीत शक्तीपात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी केवळ बळच दिले असे नाही तर नवा विश्वास दिला आणि भाजपाच्या वारूतील हवा काढण्यात ते यशस्वी झाले. ‘अभी तो मै जवा हूँ’ म्हणत त्यांनी जे यश मिळवले आणि राज्यातली नव्हे देशातली जी हवा बदलली त्याची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल. सोशल मीडियावर तऱहेतऱहेच्या राजकीय पोस्ट, चित्रे, व्यंगचित्रे, विनोद यांची गेला महिनाभर रेलचेल सुरू आहे. राजकीय पक्षांनी त्यासाठी यंत्रणाच उभारली आहे. पण, एक व्हायरल झालेली पोस्ट खूप बोलकी होती. एका दगडात एक पक्षी कुणीही मारते, दोन पक्षी काहीजणच मारतात पण, एका दगडात अवघा पक्षीथवा मारून दगड पुन्हा हातात घेणारा एक आणि एकच आणि ते म्हणजे शरद पवार.

शरद पवारांचे या विधानसभा निवडणुकीतील कामगिरी आणि यश मोजायचे तर अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले होते, त्यानंतरही त्यांनी निवडणुकीत आमदारांचे अर्धशतक गाठले. रोहित पवार यांना विजयी करून राष्ट्रवादीत स्थान दिले. सुप्रिया सुळेंचे नेतृत्व बळकट केले. भाजपा शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षात फूट पाडली. काँग्रेसला आणि भाजपा विरोधकाना आपणच विरोधी आघाडीचे नेतृत्व करू शकतो हे दाखवून दिले. एन.डी.ए. मध्ये फूट पाडण्यात ते यशस्वी झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा पक्ष असूनही भाजपाला विरोधी बाकावर बसवण्यात आणि ऐंशी तासाचा मुख्यमंत्री अशी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची फजिती करण्यात ते यशस्वी झाले. त्यांचे हे यश हवा बदलली आहे हे सांगणारे आहेच पण, महाराष्ट्राचा हा फॉर्म्युला आगामी विविध राज्याच्या निवडणुकीत राबवण्यासाठी त्यांनी पायाभरणी केली आहे आणि भाजपाच्या दृष्टीने ही मोठी चिंतेची बाब ठरावी. ‘संकट ही संधी मानावी’ हा सुविचार शरद पवारांनी कृतीत आणला. इडीची नोटीस आल्यावर ते स्वतः इडीकडे गेले. पाऊस आल्यावर त्यांनी पावसात भिजत भाषण केले आणि उद्धव ठाकरे महायुतीवर संतापले आहेत हे लक्षात येताच त्यांनी संजय राऊत यांना सोबत घेऊन अडीच वर्षेच का पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊदे असे धोरण ठेवून भाजपा-शिवसेना युतीची आणि जनतेने त्यांना दिलेल्या कौलाची वाट लावली. ओघानेच या साऱया परिवर्तनाचे ते शिलेदार झाले आहेत आणि पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाला महत्त्व आले आहे. शरद पवारांनी निवडणुकीआधी ट्विट करून ‘मला आता काही नको पण मी महाराष्ट्र सुरक्षीत हाती सोपवणार आहे’ असे म्हटले होते आणि त्यांनी ‘समोर मल्लच नाही, अबकी बार 220 पार’ म्हणणाऱया भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना आस्मान दाखवत ते खरे करून दाखवले.

भाजपावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही वेळ का आली यांचेही विश्लेषण झाले पाहिजे. भाजपाचे चिंतन होईलच पण, अति आत्मविश्वास आणि टीमवर्कचा अभाव, नितीन गडकरींसह अनेकांना निवडणुकीपासून दूर ठेवणे, धोरणात लवचीकता नाही आणि चंद्रकांत पाटील यांनी केलेली महाभरती अशी सर्वसाधारण कारणे ठळकपणे दिसत आहेत. त्याचबरोबर दिल्लीत 2024 चे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून फडणवीस यांच्या नावाची चर्चाही त्यांच्या पतनाला कारणीभूत झाली असे मानले जात आहे. नरेंद्र मोदी-अमित शहा ही जोडी बाजिगर म्हणजे हरलेली लढाई जिंकणारी जोडी म्हणून ओळखली जाते. पण, महाराष्ट्रात ही जोडी करिष्मा दाखवू शकली नाही, यामागची कारणेही तपासली पाहिजेत. अमित शहानी ठाकरेना फोनही केला नाही असे म्हटले जाते. महाराष्ट्राच्या जनतेने गेली पाच वर्षे आणि या निवडणुकीत पुन्हा पाच वर्षे महायुतीला सत्ता दिली होती. भाजपाने पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगले. अडीच वर्षे ठाकरेंना मुख्यमंत्रीपद दिले असते आणि शेवटची अडीच वर्षे फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिले असते तर फारसे बिघडले नसते. पण, तसे झाले नाही. कुणाचे सत्य खरे यावरून वाद झाला. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे असे ठरवून ‘सूर्ययान’ मोहीम सुरू केली. पण भाजपा-सेना संवाद संपला. युती तुटली. एन.डी.ए. मध्ये फूट पडली आणि सारे भाजपा विरोधक एकत्र येऊन त्यांनी सरकार स्थापन केले, हे वास्तव आहे.

शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरेंचे खरेच कौतुक केले पाहिजे. सेना अनेक अर्थानी बदलली आहे. पण सेना आपले ध्येय सोडत नाही हे यानिमित्ताने अधोरेखीत झाले आहे. हा हिंदुत्ववादी पक्ष सेक्युलर पक्षांसोबत गेला.

 

ठाकरे कुटुंब मातोश्रीवरून रिमोट कंट्रोलचे काम करायचे ते स्वतः सरकार झाले. मुख्यमंत्री झाले. निवडणुकीत ठाकरे उमेदवार म्हणून कधीही उतरायचे नाहीत. आदित्य ठाकरे मैदानात उतरले, विजयी झाले. ठाकरे मातोश्री सोडायचे नाहीत. ठाकरे सगळीकडे हिंडले ‘सिल्व्हर ओक’वर तर त्यांनी अनेक चकरा मारल्या आणि ही सर्व घालमेल सुरू असताना त्यांनी अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या शेतकऱयांचे अश्रू पुसायलाही सवड काढली. सेना बदलली आहे सेनेची धोरणे बदलली आहेत सेना कणखर असली तरी लवचीकही आहे यांचे ते निदर्शक आहे. विविध नेत्याना पक्षाना त्यातून खूप शिकता येईल. नवीन सरकारचे भवितव्य काय आणि किती असे अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. सत्तेची चव आणि शक्ती आघाडीतील सर्वच पक्षाना माहीत आहे सेनाही नवखी नाही. तथापि काँग्रेसच्या इतिहास वेगळा आहे. आणि भाजपा महाराष्ट्रासारखे राज्य हातातून गेल्यावर शांत राहणार नाही. गोवा, कर्नाटक, हरियाणा अशी अनेक उदाहरणे आहेत. ठाकरे व मोदींचे बडा भाई छोटा भाई हा सिलसिला सुरूच आहे. राजकारणात काहीही होऊ शकते आणि अस्थिर कौल असेल तर सिनेमा बंद होत नाही. गेले महिनाभर झालेला खेळ संपलेला नाही. ‘पिक्चर अभी बाकी है’ चा भाग एक झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विश्रांतीनंतर याच पिक्चरचा उर्वरीत भाग केव्हाही होऊ शकतो.

नवीन महाआघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर लगेच शेतकऱयांचे सारे कर्ज माफ होईल, शेतकरी आत्महत्या थांबतील, बेरोजगार मुलांना नोकऱया मिळतील, मंदी संपेल, भ्रष्टाचार निपटेल, कायदा सुव्यवस्था चोख होईल, असा कुणाचा समज असेल तर तो भ्रम असेल. शेवटी सत्ता आणि सत्ताधारी त्यांच्या चालीने चालतात. राजकारणात तोरण वेगळे असते, घोषणा वेगळय़ा असतात आणि खरे धोरण वेगळे असते पण, उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिमत्व आगळे, वेगळे, निर्धारी आहे. ते चांगले काही करून दाखवतील अशी अपेक्षा आहे. मराठी माणसाला न्याय, सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि शेतकऱयांची कर्जमाफी यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले तरी पुरेसे होतील. नव्या मंत्रीमंडळात अनुभवी, तरबेज व कसलेले मंत्री असणार आहेत. त्यांच्या सोबत जमवून घेणे ही कसरत असणार आहे. ‘भाजपा नको सत्ता हवी’ या मुद्यावर झालेली ही महाविकास आघाडी महाराष्ट्राला फलदायी व्हावी इतकीच अपेक्षा आहे. भाजपाचा मुखभंग झाला आहे. ‘पार्टी वईथ डिफरन्स’ अशी त्यांची बिरूदावली धुळीला मिळाली आहे. या पक्षाला आत्मचिंतन करून नवे संघटन बांधावे लागेल. हवा बदलली आहे यांचे भान ठेवावे लागेल.

मंगेश मंत्री

मो. 9325403234

Related posts: