|Monday, January 27, 2020
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » प्रकाशनाचे लोकार्पण

प्रकाशनाचे लोकार्पण 

‘वाचन संस्कृती वेगाने ढासळतेय’ हे सतत कानावर पडत असतां काल एक वेगळीच बातमी वाचायला मिळाली. मराठी साहित्य जगतात गेल्या पंचवीस वर्षांतील सर्वात कमी म्हणजे फक्त साडेआठ हजार पुस्तकं गेल्या वषी प्रकाशित झाली आहेत. सरासरी काढायला गेलं तर हा आकडा दर दिवसाला फक्त चोवीस पुस्तकं इतकाच आहे. वाचन संस्कृतीची काळजी मला कधीच नव्हती, वाचक कागदावर न वाचता मोबाईलवर वाचतोय इतकंच. मी घाबरलो प्रकाशनाचा आकडा वाचून. माझा तर ठाम विश्वास आहे की हा आकडाही अपूर्ण असून फक्त पुण्या मुंबई पर्यंतच मर्यादित असावा. मराठी लेखके उदंड झाली आहेत आणि दोनचार कथा किंवा यमक जोडून केलेल्या काही  कविता लिहून लेखक- कवी  म्हणवून घेणारी काही मंडळी ‘वर्षाला किमान एक तरी पुस्तक काढेनच’ असा पण करून शब्दांचे ढीग कागदावर ओतताहेत. स्वत:च्या पैश्याने पुस्तक काढून त्याचं प्रकाशन करणं, वर श्रोत्यांना गोडाचं जेवण घालणं, किमान चहा, समोसा, वेफर्स खायला देणं, याला ‘कलेजा मंगता है’. पुस्तकाची किमान साठ पानं होतील इतका मजकूर लिहून काढायचा, त्यासाठी पैसे घेणारा का असेना, प्रकाशक शोधायचा, प्रूफांच्या चुका तपासून त्यांना सुधारून घ्यायचं, पुस्तकाच्या विषयाला साजेसं मुखपृ÷ तयार करून घ्यायचं आणि पुस्तकांचे गठ्ठे येण्यापूर्वी त्याच्या प्रकाशन समारंभाची तयारी करायची, हा द्राविडी प्राणायाम मला अजून जरी सोसावा लागला नसला तरी हे सारं मुलीच्या लग्नापेक्षाही अधिक कठीण कार्य आहे हे मी जाणून आहे. 

या संपूर्ण मालिकेतील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा. आजकाल याला ‘पुस्तकाचं लोकार्पण’ म्हणतात आणि मला सामाजिक संबंध टिकवण्यासाठी दर आठवडय़ांत अश्या किमान दोन ‘भव्य’ लोकार्पण समारोहांना हजेरी लावावी लागते. दोन अडीच तास चालणारा हा कार्यक्रम काही अपवाद सोडल्यास बहुतांश वेळी अत्यंत रटाळ असतो हे मी स्वानुभावाने लिहितोय. या कार्यक्रमातील अध्यक्ष, लेखक व मंचावर आसनस्थ इतर यांनी वारंवार तेच तेच बोलल्याने

या वक्त्यांनी घेतलेल्या एकूण वेळापेक्षा अधिक वेळ चाललेल्या आभार प्रदर्शनाने मी आणि माझ्यासारखे इतर अनेक श्रोते कावलेले असतात. त्यातून या पुस्तकांत मला काय म्हणायचंय? हे लिहायला कसं सुचलं? यात कुणाकुणाची मदत झाली? वेळात वेळ काढून मी हे केव्हा लिहिलं? या सर्व प्रश्नांची उकल, लेखक आपल्या लांबलचक उद्बोधनातून करीत असता, मुळात हे पुस्तक या सद्गृहस्थाने लिहिलंच का? या साध्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही. दरम्यान, समोर व्याख्यान चाललं असतां संपूर्ण वेळ मोबाईलवर चॅटिंग करणारे श्रोते, नि:संकोचपणे मिनिटाला दोन जांभया देणारे श्रोते, ही खुर्ची आपल्या सासऱयाने आपल्याला आंदण दिली आहे असं समजून खुर्चीसमोर तंगडय़ा पसरून मस्त झोप घेणारे श्रोते, आपला मेंदू बंद करून ठेवीत या कानाने ऐकलेलं दुसरं या कानाने बाहेर काढणारे श्रोते, विनोदी वाक्मयावर शांत राहून अर्थपूर्ण वाक्मयांवर उगाचच धबाधबा हसणारे श्रोते, आणि सारं

या हॉलला ऐकू जाईल इतक्मया मोठय़ा आवाजांत मोबाईलवर बोलणारे बहुरंगी श्रोते मी याच कार्यक्रमांत कितीतरी वेळा अनुभवलेले आहेत. हे श्रोते कुणाही वक्त्याचा एकही शब्द न ऐकता त्याच्या तोंडावर  ‘तुमचं व्याख्यान फारच अर्थपूर्ण झालं बुवा. मागे खूप वर्षांपूर्वी ते पुल की विंदा आले होते त्यांचे विचारही डीट्टो असेच होते’ असं विधान बिनधास्त कसं काय करू शकतात हे मला कोडंच आहे. मी मात्र दर वेळेला बहुप्रतिक्षित आभार प्रदर्शन एकदाचं संपलं की तिथे चहा, सामोसे, जेवण किंवा तत्सम जे काही असेल त्याचा आस्वाद घेतो, उत्सवमूर्तीला भेटून ‘जेवण मस्त आहे हं’ अशी दाद मनापासून देतो आणि ‘आता सहनशक्तीचा अंत झालाय, आजचा  पुस्तक प्रकाशनाचा माझा हा शेवटला कार्यक्रम’ असं ठरवून कार्यालयाबाहेर निघतो. घरी पोहोचेपर्यंतच कुणा ओळखीच्या, अनोळखी इसमाचा किंवा स्त्रीचा ‘वा वा असं कसं? तुम्हाला तर यायलाच हवं, मोठय़ा हॉटेलमध्ये ठेवलाय कार्यक्रम. वेळही तुम्हाला सोयिस्कर होईल अशीच ठेवलीय. आणि हो, कार्यक्रमानंतर जेवण पण आमच्यासोबत त्याच हॉटेलमध्ये घ्यायचंय हं!’ असा लडिवाळ फोन येतो. या लोकार्पण सोहळय़ास माझ्या जाण्याने माझा एक वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटतो, लेखक किंवा कवीचा एक श्रोता वाढतो आणि त्या दोन तीन तासांत माझ्या कटकटीपासून हिची सुटका होते, अशी तिहेरी सोय म्हणून मीही आग्रहाचे हे निमंत्रण तितक्मयाच नम्रतेने स्वीकारतो, तिथली निरर्थक भाषणं ऐकत पुन्हा आभार प्रदर्शन संपायची वाट बघत बसला राहतो. माझ्यासारखे जेवायला आलेले इतर अनेक श्रोते तिथे भेटतात, मला पाहून उगाचच ‘हँ हँ हँ… तुमचं पहिलं पुस्तक कधी येतंय?’ अशी जखमेवर मीठ चोळणारी चौकशी करतात, ‘आजचा हा शेवटला कार्यक्रम’ असं पुन्हा पुन्हा घोकत पोटावरून हात फिरवत मी घरी येतो.

ही सहसा अशा कार्यक्रमांना येत नाही. ‘घरी तुमचं लिहिलेलं काही आवडललं नाही, पटलं नाही तरीही बायको म्हणून तुमच्या समाधानासाठी खोटं वा वा म्हणावं लागतं आणि तिथे पण मेली तीच नाटकं. हे नसते उपद्व्याप मला नाही जमत’ असं ती माझ्या तोंडावर सांगते. इतकं स्पष्ट बोलून दाखवणाऱया हिच्या धाडसाचं मला कायम कौतुक वाटत आलं आहे. लग्नाला तीस वर्षे लोटल्यानंतरही ‘केस रंगवताना तू काळा रंग न वापरता तांबडा वापरल्यास बरे होईल, काळय़ा मेंदीने तुझे केस डोक्मयावर जांभळं चिरडल्यागत दिसतात’ हे म्हणायचं धाडस माझ्यात अजून नाही.  पण खरं सांगू का, मला हीचं म्हणणं बरेचदा पटतं. या समारंभातील खोटी भाषणं माझ्याही अंगावर येतात. मागे मी, स्वत:ला कवी म्हणवून घेणाऱया  एका मित्राच्या कवितांच्या पुस्तक प्रकाशन सोहळय़ाला गेलो होतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसलेला इसम माझा फेसबुक मित्र होता. याच्या वॉलवर याने ‘साहित्य आहे म्हनून जीवन आहे’ असं बोधवाक्मय लिहून ठेवलंय. फेसबुकवर काही बरं लिहिणाऱया लेखकांची चिरफाड करणं हा त्याचा आवडता छंद आहे. एका लेखांत मी केवळ विनोदनिर्मिती व्हावी या शुद्ध उद्देशाने  ‘सातपुतेच फक्त पुढे जाऊन विसपुते होऊ शकतात’ असं वाक्मय टाकलं आणि यावर मला तीनशे लाईक्स आणि लेख आवडल्याचे शंभर सव्वाशे संदेश आले. या गृहस्थाने मात्र  ‘मायमराठीच्या दोन नावांवर केलेली कोटी वाचून रूदय वीषण्ण झाले. या आशा विनोदामुळे तुमच्या लेखणाचा दरजा दिवसेदिवस कित्ती खालवत चालल्याची प्रचीती येते,’ असे खरमरीत कमेंट्स पाठवले. दरम्यान ‘माझ्यासारख्या प्रसिद्ध साहित्यिकाला …’ असं याने बरेच ठिकाणी लिहून ठेवल्यामुळे हा इसम नुसताच इसम नसून साहित्यिक आहे याचा उलगडा मला एके दिवशी झाला आणि या जगप्रसिद्ध साहित्यिकाचं नाव सुद्धा आपण ऐकलं नाही, या माझ्या अज्ञानाची कीव करण्यात मी दहा दिवस फुकट घालवले.

प्रकाशन सोहळय़ाचे अध्यक्षीय भाषण करीत असतां हा गृहस्थ उत्साहात येत, ‘या कवीच्या कवितांवर महाकवी कालीदास आणि मोरोपंत यांच्या काव्याचे संस्कार झालेले जाणवतात’ म्हणाला. जे ऐकत होते ते तर हादरलेच, खुद्द मंचावर बसलेला माझा कवी मित्रही बुचकळय़ात पडल्याचं अख्ख्या हॉलला जाणवलं. माझा हा कवी मित्र, पीडब्ल्यूडी मध्ये कॉन्ट्रक्टर्सची बिलं पास करणाऱया इंजींनियरच्या हाताखाली कारकून होता. दोन वर्षांपूर्वी लाच घेताना पकडला गेला आणि सस्पेण्ड झाला. जमवलेल्या अफाट मायेचं काय करायचं म्हणून दर वषी पुस्तक काढतो, दणक्मयात प्रकाशन सोहळा साजरा करतो आणि पुस्तकांवर ‘सप्रेम भेट’ लिहून याला त्याला वाटत सुटतो. त्याच्या कुठल्याच कॉन्ट्रक्टरचं नाव कालिदास किंवा मोरोपंत नसल्याने ही नावं त्याने यापूर्वी कधी ऐकण्याची सुतराम शक्मयता नव्हती. मग त्याने शेजारी बसलेल्याच्या कानात काहीतरी विचारलं आणि आपल्या संबोधनांत ‘शेक्सपीयरपेक्षाही मोठा असा जगप्रसिद्ध साहित्यिक आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभला हे माझं भाग्यच म्हणावं लागेल’ असं म्हणून अध्यक्षाचा बाऊन्सर सीमेपार टोलावला.

बहुतांश प्रकाशन सोहळय़ास मी आजही हजेरी लावतो. जमलं तर पुस्तकाचं नाही तर तेथील खाद्य पदार्थांचं, सोबत लेखकाच्या धाडसाचं कौतुक करतो. त्याने ‘सप्रेम भेट’ दिलेलं पुस्तक घेत, त्याला शुभेच्छा देऊन घरी येऊन आजच्या दिवसातील घडामोडी विसरून जाण्याचा प्रयत्न करतो. शेवटी, सारं काही समाधानासाठी………..         

स्वत:ला साहित्यिक समजणाऱया

या लेखकाच्या आणि माझ्याही.

Related posts: