|Friday, December 13, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » मालमत्तेचा आधार ज्येष्ठांसाठी लाभदायक

मालमत्तेचा आधार ज्येष्ठांसाठी लाभदायक 

गुंतवणूक हा सर्वांसाठी जिव्हाळय़ाचा आणि विशेषत: आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा विषय. नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक, पेन्शनर आदी प्रकारातील मंडळी आपापल्या परीने गुंतवणूक आणि बचत करत असतात. काही वर्षांपूर्वी सोने आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचा ओघ अधिक होता. या तुलनेत आज असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. असे असले तरी निवृत्तीनंतरच्या सुखकर जीवनासाठी मालमत्तेतली गुंतवणूक आजही फायद्याची मानली जाते. दुसरीकडे उत्पन्न मिळवण्याच्या काळात घरासाठी कर्जाचे हप्ते भरणे कितपत योग्य आहे, हा देखील प्रश्न पडतो. मग घर घ्यायचे कधी, हा पण उपप्रश्न निर्माण होतो. एकंदरित बाजारातील वातावरण आणि गरज पाहून आर्थिकसंदर्भात निर्णय घेणे उपयुक्त ठरते.

जसजसे वय वाढत जाते, तसतसे मालमत्तेतील गुंतवणूक ही अधिक फायद्याची वाटू लागते. जेव्हा आपण आपलं करियर सुरू करतो त्याचवेळी आपण मालमत्तेत गुंतवणुकीची तरतूद केली तर निवृत्तीच्या काळात ही केलेली गुंतवणूक उपयुक्त ठरू शकते. सध्याच्या काळात मालमत्ता किंवा इमारतीच्या भाडय़ाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. आठ ते दहा हजारावर टू-बीएचके फ्लॅट भाडय़ाने मिळत आहेत. मात्र याउलट जर का हेच घर खरेदी करायचे झाल्यास त्यासाठी तब्बल 50 ते 60 लाख रुपये मोजावे लागत आहेत. म्हणूनच जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे मालमत्तेतील गुंतवणुकीची रक्कमही वाढली आहे. अशा स्थितीत घराच्या भाडय़ापासून मिळणाऱया रक्कमेपेक्षा बाँड किंवा शेअरमधून मिळणारा परतावा अधिक मिळत असल्याचे चित्र आहे. अन्य गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळत असताना मालमत्तेत गुंतवणूक का करावी, असा प्रश्न निर्माण होतो. सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्पन्न थांबते. अशा स्थितीत स्टॉक मार्केटसारख्या चढउतार असलेल्या जोखमीच्या गुंतवणूकीपासून काही जण दूर राहतात. म्हणून गुंतवणुकदारांची पसंती ही मासिक उत्पन्न देणाऱया मुदत ठेवीला असते. त्याचा थेट संबंध हा चलनवाढीशी जोडलेला असतो. त्याचवेळी भाडय़ाची वाढ ही काही प्रमाणात का असेना ती निश्चित स्वरुपाची असते.

सध्याच्या काळात गुंतवणुकीचे हस्तांतरण करणे गरजेचे झाले आहे. याचा अर्थ भौतिक मालमत्तेच्या ठिकाणी आर्थिक मालमत्ता असणे हा सर्वोत्तम पर्याय वाटू लागतो. सततच्या बदलीमुळेही गुंतवणुकीच्या पर्यायात बदल करावे लागतात. म्हणूनच सेवानिवृत्तीच्या काळात गुंतवणूक हस्तांतरण करणे ही मोठी समस्या राहत नाही. दुसरीकडे निवृत्तीनंतर एखादी मोठी मालमत्ता खरेदीऐवजी दोन किंवा त्यापेक्षा अधिक लहानसहान मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करता येतो. यातून भाडय़ापासून मिळणाऱया उत्पन्नातही वाढ होऊ शकते. अर्थात मालमत्ता अशी खरेदी करावी, की ती कुलूपबंद करता येईल. जेणेकरून त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घ्यायला हवी. याचा अर्थ नोकरीत असताना मालमत्तेत गुंतवणूक करु नये असा नाही. नोकरीच्या काळात नियमित किंवा भाडय़ाच्या उत्पन्नाच्या तुलनेत अधिक परतावा देणाऱया मालमत्तेत गुंतवणूक करणे श्रेयस्कर ठरू शकते. याचाच अर्थ गुंतवणूक अशा ठिकाणी करावी की त्यातून उत्पन्नापेक्षा भांडवली फायदा अधिक व्हावा. कारण या काळात नियमित उत्पन्न सुरू असल्याने काही काळापूरती का असेना अन्य नियमित स्रोतांची गरज भासत नाही.

रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक ही भविष्यात मुलांच्या विवाहासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र रोकडची गरज भागविण्यासाठी पूरक स्रोत असणे गरजेचे आहे. कारण कदाचित आपण केलेल्या गुंतवणुकीला रोख स्वरुपात बदल करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. जमीन किंवा घर ही अशी मालमत्ता आहे की जी तात्काळ निधीच्या स्वरुपात प्राप्त होऊ शकत नाही. जमीन ही मालमत्ता चल प्रकारात मोडत नाही. त्यामुळे ती कधीही ‘इनकॅश’ करता येत नाही. या प्रकाराला गुंतवणुकीच्या श्रेणीला टाकता येत नाही. मग प्रश्न असा राहतो की, करियरच्या प्रारंभी आपण स्वत:चे घर घ्यावे की नाही. त्याचा संबंध भावनेशी जोडलेला असतो. आपण स्वत:च्या हक्काच्या घरात राहण्याचा आनंद घेऊ शकतो. फरक एवढाच की भविष्यासाठी आपण सध्याचे भांडवल हे अचल मालमत्तेत गुंतवत आहात, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण घर खरेदी करण्यासाठी आपण आपल्या भविष्यातील उत्पन्नावर कर्ज घेतो. म्हणूनच आजकाल अनेक युवक भाडय़ाच्या घरात राहणे पसंत करत आहेत आणि जमवलेल्या पैशाचा उपयोग हा अनुभव मिळवण्यासाठी करत आहेत.

Related posts: