|Friday, December 13, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » रेपो दरात कपातीचे संकेत

रेपो दरात कपातीचे संकेत 

बांधकाम क्षेत्रात घर खरेदीदारांच्या सोयीसाठी म्हणून गृहकर्जाचा भार कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने रिझर्व्ह बँकेकडून होताना दिसतोय. याचाच एक भाग म्हणून पुन्हा रेपो दरात कपात होण्याचे संकेत वर्तवले जात आहेत. या निमित्ताने का होईना ग्राहकांना पुन्हा कपातीची आशा लागून राहीली आहे. ती पूर्ण होते का हे येत्या आठवडय़ात कळेलच.

येत्या आठवडय़ात रिझर्व्ह बँकेची रेपो दरासंदर्भात बैठक पार पडणार आहे. या बैठकीत रेपोदरात कपात केली जाणार आहे, असे सध्या तरी बोलले जात आहे. तज्ञांनी याला पुष्टी दिली आहे. पण प्रत्यक्षात ही कपात केली जाणार का, हे पाहावे लागणार आहे. रेपो दर घटल्यास याचा फायदा गृहकर्जधारकांना होणार आहे. त्यांच्या घरासाठीच्या हप्त्यावरचा भार काहीसा हलका होण्यास मदत होणार आहे.

 गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या बैठकीत रेपो दरात 0.25 टक्के इतकी कपात करण्यात आली होती. मागच्या बैठकीआधीही सलग बैठकांमध्ये सातत्याने रेपो दरात घट करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये केलेल्या कपातीनंतर  खरेदीत मात्र ग्राहकांचा म्हणावा तेवढा उत्साह दिसला नाही. त्यामुळे बिल्डरांची चिंता अर्थातच वाढली असून देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱया बांधकाम व्यवसायाच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. सध्याची आर्थिक नाजूक स्थिती पाहता बांधकाम क्षेत्राला उभारी येणे गरजेचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. नुसत्या व्याजदर कपातीचा उपयोग प्रत्यक्षात होत नसल्यास इतर सवलती देण्याचा विचार केंद्राने आता करायला हवा, असाही एक सूर आळवला जात आहे.

 घर खरेदीदारांना योग्य, परवडणाऱया गृहकर्ज व्याजदरात घर घेता यावे यासाठी रिझर्व्ह बँक सातत्याने रेपोदरात कपात करते आहे. परिणामी बँकांना दुसरीकडे ठेवींवरचा व्याजदर कमी करण्याची जोखीम सरसकट उचलावी लागत आहे. यामुळे बँकेतले ठेवीदार काहीसे गोंधळून गेले आहेत. सध्या जीडीपी दरात झालेली घसरण आर्थिकदृष्टय़ा चिंता वाढवणारी असल्याने याचा विचार येणाऱया बैठकीपूर्वी झालेला असेल. सध्याचा रेपो रेट हा 5.15 इतका आहे. यावर्षी रिझर्व्ह बँकेने 135 बेसीस पॉईंटस्ने रेपो दरात कपात केली आहे. हे खरंतर धाडसी पाऊल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अर्थव्यवस्थाही सध्या रुसलेली असल्याने परिस्थितीला सामोरे जात मार्ग काढण्याची गरज व्यक्त होताना दिसते आहे. पुन्हा व्याज दरातील कपातीने बांधकाम क्षेत्रात नवचैतन्य परतेल का याबाबत काही तज्ञांना विचारलं असता पैकी अनेकांनी व्याजदर कपातीचा काही नोंद घेण्याइतका परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.

पुन्हा 0.25 ची कपात

 येत्या आठवडय़ात रिझर्व्ह बँक रेपो दरात 25 बेसीस पॉइंटस्ची कपात करणार आहे, असे तज्ञांनी भाकीत वर्तवले आहे. त्यामुळे गृहकर्जधारकांना 0.25 टक्के व्याजदर कपातीचा लाभ उठवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कपात केली गेल्यास रेपो दर 4.90 टक्के इतका होईल. ऑक्टोबरमध्ये सलग पाचव्यांदा रेपो दरात कपात केली होती. त्यापूर्वी तर ऑगस्टमध्ये चक्क 0.35 टक्के इतकी कपात केली होती. खरंतर त्यावेळी 0.25 टक्के कपातीचा अनुमान तज्ञांनी काढला होता. सलग चारवेळा रेपो रेटमार्फत व्याजदर 1.10 टक्क्यापर्यंत घटवण्यात आला. दुसरीकडे फेब्रुवारी 2020 मध्ये परत 15 बेसीस पॉइंटस्ने कपातीचे संकेत व्यक्त केले आहेत. अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने हा निर्णय उपयुक्त ठरेल, असे तज्ञांना वाटते आहे. 

 

Related posts: