|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » देशाच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ केल्यास सोडणार नाही !

देशाच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळ केल्यास सोडणार नाही ! 

केंदीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानला इशारा

पुणे/ प्रतिनिधी

भारताने कधी कोणत्या देशाची जागा बळकावण्याचा प्रयत्न केला नाही अथवा कुणाच्या अंतर्गत बाबीत ढवळाढवळही केली नाही. “लेकीन, किसीने हमको छेडा, तो हम छोडेंगे नही,’’ अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी शनिवारी येथे सज्जड दम भरला.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 137 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, दहशतवादाला कधीच भारताची सहानुभूती नव्हती ना राहील. छुप्या युद्धाच्या माध्यमातून पाकिस्तानने देशात दहशतवाद पसरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता सीमेवर नाही, तर सीमापारही जाऊन आपण कारवाई करू शकतो. 2016 चा सर्जीकल स्टाईक व 2019 चाबालाकोट तळहल्ला ही त्याचीच उदाहरणे आहेत. जगाला आम्ही हे दाखवून दिले आहे.

दहशतवादाचा आज सगळय़ा जगाला धोका आहे. 9/11 व 26/11 ही त्यातील काही उदाहरणे आहेत. दहशतवाद फैलावणाऱया देशाला भारताने कधीच सहानुभूती दाखविली नाही. पाकिस्तान छुप्या युद्धाद्वारे देशात दहशतवाद पसरवित आहे. मात्र, देशाच्या सेनेने त्याला प्रत्येक वेळी सडेतोड उत्तर दिले आहे, असे सांगून ते म्हणाले, एनडीएतील प्रशिक्षणातून शारीरिक, मानसिक कणखरता येते. येथील शिक्षण हे उत्तमच आहे. या संस्थेला मोठी परंपरा असून, त्याचे अनुकरण आता तुम्ही करणार आहात. सध्याची तरुण पिढी पैसा, नावाच्या मागे धावत असताना तुमच्यासारखे तरुण देशसेवेसाठी जात असल्याने तुम्ही आदर्श निर्माण करत आहात. सेवा परमो धर्म: या एनडीएच्या ब्रीदवाक्यानुसार तुम्हाला देशसेवा व जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. 20 व्या शतकातील पारंपरिक युद्धे तसेच 21 शतकातील आव्हाने या दोन्ही पातळयांवर तुम्हाला सज्ज राहावे लागेल.  सध्याच्या घडीत मिलीट्री लिडरशीप महत्त्वाची आहे. संरक्षण सज्जतेबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता प्रस्थापित करण्यात तुमचा मोलाचा सहभाग राहील. त्यामुळे देशाच्या सुरक्षेबरोबरच संविधानाच्या सुरक्षेचा संकल्पही तुम्हाला करावा लागेल, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

Related posts: