|Sunday, January 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अखेर कणकवलीतील अंडरपासचे काम सुरू!

अखेर कणकवलीतील अंडरपासचे काम सुरू! 

दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱयांकडून भाजपच्या शिशीर परुळेकरना माहिती : महामार्गावरील वाहतूक आजपासून दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडने वळविणार

वार्ताहर / कणकवली:

कणकवली शहरातील गांगो मंदिर येथील महामार्गाच्या अंडरपासचे काम रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे. सध्याचा वाहतूक सुरू असलेला महामार्ग रविवारीच रात्रीपासून बंद करून दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडने वाहतूक वळविण्यात येणार आहे. 10 मीटर रुंद व 5 मीटर उंच अशी या अंडरपासची रचना आहे, अशी माहिती दिलीप बिल्डकॉनचे अभियंता आयुष्यमान चौधरी यांनी रविवारी तेथील नागरिकांची भेट घेत दिली.

अंडरपासचे काम सुरू झाल्याशिवाय गांगो मंदिर भागातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम करू देणार नसल्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला होता. त्यानंतर चौधरी यांनी ही माहिती दिली.

शहरातील गांगो मंदिर येथे महामार्गावर अंडरपास नसल्याने या भागातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी मार्ग बंद होणार होता. तेथील नागरिकांनी याबाबत सहा महिन्यांपूर्वी आमदार नीतेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार व नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे लक्ष वेधले होते. राणे यांनी या मुद्यावर तत्कालीन उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यासोबत न.पं.मध्ये बैठक घेऊन अंडरपासचा तातडीने केंद्राकडे प्रस्ताव करण्याची सूचना दिली होती. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाला प्रस्ताव सादर केला होता. मात्र, हे काम मंजुरीचे आदेश येण्यापूर्वीच गांगो मंदिर भागातील महामार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे भाजप वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष शिशीर परुळेकर, महेश सावंत, प्रदीप मांजरेकर यांच्यासह नागरिकांनी हे काम रोखले होते.

अडिच कोटीचा प्रस्ताव

त्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांनी काम मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून अडिच कोटीचा प्रस्ताव करण्यात आल्याचे स्पष्ट केले. दिलीप बिल्डकॉनचे प्रकल्प व्यवस्थापक के. के. गौतम यांनी अंडरपासचे काम मंजूर करण्यात आल्याचे यापूर्वी सांगितले. रविवारी याबाबत दिलीप बिल्डकॉनचे अभियंता आयुष्यमान चौधरी यांनी गांगो मंदिर येथे नागरिकांची भेट घेत व गौतम यांनी नागरिकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधत रविवार रात्रीपासूनच अंडरपासचे काम सुरू करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सर्व्हिस रोडने वाहतूक करणार!

या अंडरपासच्या कामासाठी सध्याच्या जुन्या महामार्गावरून सुरू असलेली वाहतूक रविवारी रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. जानवली पुलापासून हॉटेल मंजूनाथपर्यंत दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडने ही वाहतूक वळविण्यात येणार आहे. अंडरपासच्या कामासाठी दिलीप बिल्डकॉनची कामगारांची टिम नागपूरहून येणार असून त्यांच्यामार्फत दिवस-रात्र हे काम करण्यात येणार आहे. येत्या 20 ते 30 दिवसात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिल्याचे परुळेकर यांनी सांगितले.

नागरिकांकडून समाधान

गांगो मंदिर भागात मसुरकर किनईकडून येणारा व टेंबवाडीच्या दिशेने जाणारा असे दोन रस्ते एकत्र येत आहेत. न.पं.च्या डीपी प्लानमध्ये हे रस्ते रिंगरोडमध्ये असल्याने उड्डाणपुलाच्या कामात गांगो मंदिर येथील भागात बॉक्सेल भाग येत असल्याने हे दोन्ही रस्ते महामार्गापर्यंत येऊन बंद होणार होते. मात्र, याबाबत आमदार नीतेश राणे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पाठपुरावा केल्याने या कामाला आता अंतिम मंजुरी मिळणार असून काम सुरू होत असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. गेले सहा महिने या मुद्यावर वारंवार पाठपुरावा करत आंदोलने छेडल्यावर हा विषय मार्गी लागत असल्याबाबत परुळेकर यांनी समाधान व्यक्त केले. शिशीर परुळेकर, प्रदीप मांजरेकर, महेंद्र अंधारी, रामदास मांजरेकर, सचिन म्हाडगूत, नीलेश गोवेकर, प्रसन्ना देसाई, सतीश सामंत आदी उपस्थित होते.

Related posts: