|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » शत्रूराष्ट्रांना रोखण्यासाठी भारत सज्ज

शत्रूराष्ट्रांना रोखण्यासाठी भारत सज्ज 

‘अग्नि-3’ची यशस्वी चाचणी, पाकिस्तान-चीनही टप्प्यात : ‘डीआरडीओ’ची माहिती

बालासोर / वृत्तसंस्था

भारताने ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम तळावरील बालासोर चाचणी केंद्रामधून अणूहल्ल्याची क्षमता असणाऱया स्वदेशी क्षेपणास्त्र ‘अग्नि-3’ची पहिली चाचणी शनिवारी रात्री घेण्यात आली. या चाचणीवेळी क्षेपणास्त्राने आपली पूर्वनिर्धारित सर्व लक्ष्ये गाठली. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानातील कोणत्याही ठिकाणाला एका क्षणातच नष्ट करू शकते. काही दिवसापूर्वी ‘अग्नि-2’ची चाचणी घेतल्यानंतर या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.

अणू क्षमतेने सज्ज असणाऱया अशा या वैविध्यपूर्ण अग्नि-3 क्षेपणास्त्रात पुष्ठभागावरून पुष्ठभागावर मारा करण्याची क्षमता असून, हे मध्यम श्रेणीचे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. अग्नि-3 अगोदरपासूनच सैन्याचा एक भाग आहे. मात्र, पहिल्यांदाच मध्यरात्री याची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. यामुळे पाकिस्तानसह चीनसारख्या शत्रूराष्ट्रांना रोखण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.

3,500 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता

मध्यरात्रीदेखील शत्रूशी सामना करणाऱया अग्नि-3 चे महत्वपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे याची सर्वाधिक मारक क्षमता. हे क्षेपणास्त्र 3 हजार 500 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. ‘अग्नि-3’चे वजन सुमारे 50 टन असून, दीड टनापर्यंतची अणू हत्यारे वाहून नेण्याची क्षमता यात आहे. या क्षेपणास्त्रामध्ये ऑन-बोर्ड संगणकासह नियंत्रण पॅनलशी जोडले गेले आहे. याची लांबी 17 मीटर आणि व्यास 2 मीटर इतका आहे, असे भारतीय सैन्याच्या पथकासह डीआरडीओकडून सादर केलेल्या अहवालातून सांगण्यात आले आहे.

Related posts: