|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोध 

भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे

प्रतिनिधी/ मुंबई

राज्याच्या 14 व्या विधानसभा अध्यक्षपदावर महाराष्ट्र विकास आघाडीचे आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. भाजपने आपले उमेदवार किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेतला. शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळावरील विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार होती. महाराष्ट्र विकास आघाडीकडून काँग्रेसचे भंडारा जिल्हय़ातील साकोलीचे आमदार नाना पटोले तर भाजपकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रविवारी सकाळी 10 वाजण्यापूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यापूर्वी कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने पटोले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केली.

पटोले यांच्या निवडीनंतर हंगामी अध्यक्ष वळसे-पाटील यांनी पदभार सोडला आणि पटोले यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले यांना सन्मानाने अध्यक्षपदाच्या खुर्चीत आसनस्थ केले. शनिवारी सकाळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याला दिल्लीहून पक्षश्रेष्ठींची मंजुरी घेण्यात आली.

विधानसभा अध्यक्षपद हे स्थायी व अत्यंत मानाचे असते. सभागफह चालवण्यात व कामकाज करण्यासंदर्भात अध्यक्षांची भूमिका कळीची असते. त्यामुळेच हे पद राष्ट्रवादीला हवे होते. मात्र, या पदावर काँग्रेसकडून दावा करण्यात येत होता. तसेच अशोक चव्हाण आणि पफथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अखेरीस पटोले यांचे नाव निश्चित करण्यात आले.

नाना पटोले यांचा अल्प परिचय

 नाना पटोले 1999 ते 2014 पर्यंत आमदार होते. मात्र, 2014 मध्ये ते भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारची शेतकरीविरोधी भूमिका न पटल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भंडारा-गोंदिया ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने पटोले यांनी पोटनिवडणूक लढविली नाही. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक त्यांनी नागपूरमधून नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढविली. मात्र, त्यांचा पराभव झाला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मंत्री परिणय फुके यांचा पराभव केला. सध्या ते राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

Related posts: